४. शुद्ध चारिर्ताचा प्रज्ञावंत राजकारणी – तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री
भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा कालखंड हे भारताच्या इतिहासातील प्रज्ञावंत पुरुषांना, शुद्ध चारिर्ताच्या त्यागी वीरांना जन्म देणारे आणि भारताला आदर्श नेतृत्व मिळवून देणारे युग होय. त्या स्वातंत्र्य आंदोलनात ज्यांच्या जीवनाचा अर्थ समजून घ्यावा, महत्ता जमावण्याचा प्रयत्न करावा, अशा अनेक व्यक्ती होऊन गेल्या. राष्ट्रीय जीवनात व समाजजीवनात समाजाच्या अत्यंत खालच्या थरापासून तो वरच्या थरापर्यंत चमकणा-या अगणित व्यक्ती झाल्या. त्यांपैकी काही थोड्या व्यक्ती अशा झाल्या की, त्यांच्या जीवनात वर्तमानयुगाचा अर्थ भरलेला दिसतो. वर्तमानयुगाच्या प्रेरणा, ध्येयवाद, स्थित्यंतरे आणि महत्त्वाच्या घडामोडी त्यांचा ध्वन्यर्थ उमटलेला त्यात दिसतो. अशा थोड्या व्यक्तींपैकीच यशवंतराव चव्हाण होत.
महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या देशात परकीय पारतंर्ताविरुद्ध तीन मोठी देशव्यापी वादळे १०-१२ वर्षांच्या अंतराने निर्माण झाली. शेवटच्या वादळाचे फळ ब्रिटिश साम्राज्यशाहीचा अंत. पहिले वादळ असहकारितेचे, ते १९२० साली सुरू झाले, १९२३ च्या सुमारास शमले. १९३० साली दुसरे अधिक मोठे सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाचे वादळ उठले. या वेळी यशवंतराव (वय वर्षे १६) माध्यमिक विद्यालयाच्या शालान्त परीक्षेचा अभ्यास करीत होते. या वादळात ते सामील झाले, त्या वेळी ते यौवनाच्या पहिल्या उन्मेषात होते. भारतीय राष्ट्रवाद त्यांच्या जीवनाचा कायमचा मार्गदर्शक तेव्हाच ठरला. मनाची कवाडे खुली ठेवल्यामुळे इकडे विद्यालयीन पुस्तकी शिक्षण चालू असतानाच भोवतालचे राष्ट्रीय जीवन आणि जागतिक उलाढाली यांचेही पडसाद त्यांच्या बुद्धीत उमटू लागले. भोवतालची वैचारिक आंदोलनेही त्यांच्या विचारांना चालना देत होती. १९३० ते १९४५ या कालखंडात त्यांनी विश्वविद्यालयीन शिक्षण पुरे केले. त्याबरोबरच स्वातंर्ताच्या आंदोलनात वारंवार कारावासाच्या शिक्षा भोगून राजकीय आणि सांस्कृतिक विषयाचे धडे गिरवले. बंदिशाळा ही त्यांचे विद्यापीठ बनले. अभ्यासाने त्यांची बुद्धी व विचार संपन्न व समर्थ बनले. लो.टिळक, म.गांधी, जवाहरलाल नेहरू, एम.एन.रॉय इत्यादींचे परिशीलन त्यांनी मोठ्या आस्थेने केले. त्याबरोबरच पश्चिमेकडील क्रांत्यांच्या मुळाशी असलेली विचारसरणी तुलनात्मक रीतीने अभ्यासली. प्रत्यक्ष राजकीय आंदोलनाला मर्यादा पडल्या. परंतु भारतीय वस्तुस्थिती, राजकीय व सामाजिक वस्तुस्थिती व ध्येयवाद आणि तत्त्वज्ञाने यांच्या तुलनात्मक अध्ययनाने समन्वयवादी दृष्टिकोण प्राप्त झाला. तत्त्वांशी तडजोड करणे प्राप्त झाले तरी ध्येयवादाच्या प्रकाशापासून विचार दूर जाऊ दिला नाही.
स्वातंत्र्यप्राप्तीच्या आंदोलनात त्यांनी अनुयायित्व प्रथम निष्ठेने पत्करले. मनोरचना विचारवंताची असल्यामुळे त्यातच विचारपूर्वक भाग घेतला. कोणतीही कृती किंवा कार्यक्रम अंमलात आणणारा माणूस जेव्हा त्या कृतीचा अभ्यास करतो, साधकबाधक दृष्टीने कृती करू लागतो, तेव्हा त्याचे ते जीवन वैचारिक जीवन बनते. त्यातच नेतृत्वाचे बीज रोवले जाते. या अनेक आंदोलनांमध्ये विचारांबरोबर वक्तृत्वाची कला यशवंतरावांना संपादन करता आली. त्यांची भाषणशैली अगदी वेगळ्या प्रकारची होती. त्यात एक खास वैशिष्ट्य होते. स्वातंर्ताच्या चळवळीत ग्रामीण जनतेत वावरत असताना त्यांना सामान्य जनांचे अपार कष्ट दिसत होते. त्याबरोबरच सामान्य जनांचे अथांग प्रेमही ते अनुभवत होते. या जनतेच्या प्रेमाने त्यांच्या वक्तृत्वकलेला अगदी वेगळा असा आकृतिबंध दिला. आपल्या माणसांशी आपण विचारविनिमय करीत असतो तेव्हा हृद्गत बोलतो, हितगुज करतो, भावुकतेने आत्मनिवेदन करतो. अशा त-हेचे त्यांचे वक्तृत्व होते. जिव्हाळ्याच्या माणसांशी बोलणा-यांची रीत त्यात दिसत होती. या मोठमोठ्या आंदोलनांमध्ये देशभर वृद्ध, मध्यमवयीन, तरुण वक्ते आणि प्रवक्ते, सभा-मोर्चे, अधिवेशने यांच्यामध्ये गर्जत आणि गाजत असत. लोकशाहीच्या आवश्यक साधनांपैकी वक्तृत्व ही कला असते. हा लोकशाहीचा वक्ता अनेक वेळा जनतेपेक्षा वेगळा असलेला, जनतेच्या उद्धाराचा बाणा बाळगणारा, तडफदार असतो, पण असा वक्ता म्हणजे यशवंतराव नव्हे. त्यांना फड जिंकायचा नव्हता, जनतेवर मोहिनी टाकून तिला वाहवत न्यावयाचे नव्हते किंवा नादी लावायचे नव्हते. जनतेला शिक्षण देणारा शिक्षक म्हणून यशवंतराव सभा-संमेलनामध्ये बोलत असत. यशवंतरावांना लोकशाहीची जोपासना करायची होती. लोकशाहीचा नेता हा लोकशिक्षक असावा लागतो.