• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण -२९

२९. प्रभावी नेतृत्व – ना. वसंतराव नाईक

यशवंतरावजींची स्वातंत्र्यपूर्व काळातील महनीय कामगिरी मी ऐकून होतो. एक झुंजार व नेकजात स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढयात हिरीरीने भाग घेतला होता. ते सामान्य जनतेतून वर आले होते. गरीब माणसांच्या सा-या वेदना त्यांना माहीत होत्या. जनसामान्यात वावरल्यामुळे जनतेच्या आशा आकांक्षांची त्यांना पूर्ण जाणीव होती. त्यामुळेच बेचाळीसच्या क्रांतीमध्ये कार्य केलेल्या व लहान वयात एका मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारलेल्या यशवंतरावजींचा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोण कसा असेल याची काहीशी कल्पना मी मनाशी बाळगली होती. हा तरूण नेता पुरोगामी विचारसरणीचा, बुद्धिनिष्ठ असूनही भावनांना पारखा न झालेला, व्यवहारी दृष्टीचा व फार कर्तबगार असावा अशी माझी अटकळ होती. यशवंतरावजींबरोबर काम करू लागल्यावर ती तंतोतंत खरी असल्याचा मला पडताळा आला. पंडित जवाहरलाल नेहरू व यशवंतरावजी यांच्यामध्ये जे एक साधम्र्य आढळून येते, त्याची या ठिकाणी आठवण होते. वाटचाल   करणा-या पांथस्थाला ज्याप्रमाणे वाटेवरील वडाचा आधार वाटावा तसा राजकारणात काटेरी वाटचाल करणा-या कार्यकर्त्याना पंडितजींचा मोठाच आधार वाटत असे. हीच गोष्ट यशवंतरावजींनाही लागू पडते. राष्ट्राच्या एकंदर जीवनावर पंडितजींच्या विचारांचा आणि विशाल व्यक्तिमत्त्वाचा ठसा ज्याप्रमाणे उमटलेला होता त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकीय व वैचारिक जीवनावर यशवंतरावजींच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव प्रकर्षाने  पडला असल्याचे दिसून येते. यशवंतरावजींच्या नेतृत्वाचे जे आणखी वैशिष्ट्य आढळून येते ते हे की, ते कार्यकर्त्याना मार्गदर्शन तर करीतच,पण लायक कार्यकर्ताला पुढे येण्याची संधीही देत. म्हणून नव्या कार्यकर्ताला यशवंतरावजी हे आपले मित्र व मार्गदर्शकच वाटतात. सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याच्या यशवंतरावजींच्या गुणामुळेच त्यांच्या सहका-यांना त्यांच्याबद्दल आदर, प्रेम आणि आपलेपणा वाटावा हे स्वाभाविक आहे.

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. कित्येक वर्षे एकत्र राहिलेली महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये अलग झाली. मराठी भाषिकांचे एक राज्य व्हावे ही जनतेची इच्छा फलद्रूप झाली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रिपद यशवंतरावजींकडे सोपविण्यात आले. महाराष्ट्र निर्मितीच्या कार्यात खुद्द यशवंतरावजींनी किती महत्त्वाची कामगिरी बजावली होती, हे सर्वश्रुत आहे. त्या कामगिरीचे मूल्यमापन इतिहास करीलच, महाराष्ट्र व गुजरात ही दोन वेगळी राज्ये अस्तित्वात येण्यापूर्वी जी परिस्थिती निर्माण झाली होती ती यशवंतरावजींनी मोठ्या चातुर्याने व संयमाने हाताळली. कोणतीही बाब असो, ती कटुता निर्माण होऊ न देता सामोपचाराने सोडविली जावी अशी त्यांची भूमिका असे. विरोधकांशी सौजन्याने वागण्याची व त्यांच्या मतांचा योग्य आदर करण्याची त्यांची मनोधारणा वाखाणण्यासारखी आहे. या वृत्तीमुळेच त्यांनी महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या वेळची सारी परिस्थिती कुशलतेने हाताळली. त्यांच्यातील श्रेष्ठ शासकीय कौशल्य त्या वेळी पणाला लागले होते. महत्वाच्या प्रत्येक बाबतीत ते आपल्या सहकार्यांना विश्वासात घेत असत. सहका-यांवर विश्वास टाकून आणि त्यांना वाढत्या जबाबदारीची कामे करण्याची संधी देऊन त्यांच्यातील शासकीय आत्मविश्वास वाढीला लावण्याचे त्यांचे धोरण मला तरी फार महत्वाचे वाटते.

आज महाराष्ट्र राज्याची भव्य प्रतिमा सर्वांच्या नजरेसमोर दिसत आहे. तिला उजाळा देण्यात यशवंतरावजींनी अशा प्रकारे फार मोलाचा हातभार लावला आहे. महाराष्ट्राच्या मातीवर, महाराष्ट्राच्या संस्कृतीवर, मराठी भाषेवर आणि मराठी जनतेवर त्यांचे अपरंपार प्रेम आहे, पंरतु हे प्रेम केवळ प्रांतीय स्वरूपाचे नाही. भारताला बलवान करावयाचे झाल्यास त्याचा विकास झाला पाहिजे, अशी त्यांची निष्ठा होती. ती निष्ठा महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नाही तर भारतातील प्रत्येक घटक राज्याची एकत्रित शक्ती हीच भारताची संघशक्ती, अशी त्यांची व्यापक धारणा होती. याच राष्ट्रीय दृष्टिकोणातून ते महाराष्ट्राकडेही पाहात असत.

यशवंतरावजींच्या व्यक्तित्वाची जडणघडण ही अशी एका राष्ट्रीय व तात्त्विक विचारसरणीतून झालेली आहे. प्रत्येक विषयाचा मुलभूत दृष्टिकोणातून ते विचार करतात. राजकारणात मुद्देसूद व तत्त्वनिष्ठ विचार कसा करावा, हे आपण मानवेन्द्रनाथ रॉय यांच्यापासून शिकलो, हे त्यांनी जाहिरपणे मान्य केलेले आहे. कोणत्याही प्रश्नाची उकल करताना ते व्यवहाराचे सूत्र जसे सोडीत नाहीत तशीच तत्त्वापासून फारकतही स्वीकारत नाहीत. औद्योगिक विकास, शेतीमालाचे उत्पादन, नियोजन, सहकारी चळवळ, राष्ट्रीय एकात्मता व समाजवाद यासारखा कोणताही गुंतागुंतीचा विषय असो, यशवंतरावजींचे त्यावर खास चिन्तन चालू असे. त्या प्रत्येक विषयाचा ते मुलभूत दृष्टीने ते सर्वांगीण विचार करीत असत. आपला देश संपन्न कसा होईल, त्याचे एक्य कसे वाढीला लागेल व देशातील सर्वसामान्य जनता कशी सुखी होईल, याचाच ते निरंतर वेध घेताना आढळत. लहान पातळीवरील संकुचित विचार त्यांच्या मनाला स्पर्श करीत नाही. त्यामुळेच यशवंतरावजींच्या प्रत्येक विचारांची, विधानाची व विश्लेषणाची दखल सर्वांना घ्यावी लागते. शब्दांच्या वारेमाप उधळपट्टीपेक्षा यशवंतरावजी कृतीला महत्त्व देत. त्यांच्या कृतीला भक्कम वैचारिक अधिष्ठान असे.