• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण -२८

२८. राजकारणाच्या वादळवा-यात हरवलेले यशवंतराव – नरूभाऊ  लिमये

महाराष्ट्रात ‘यशवंतराव’ हे नाव उच्चारल्याबरोबर कृष्णाकाठच्या कराडच्या यशवंतराव चव्हाणांची मूर्ती डोळ्यांसमोर येते. या नेत्याबद्दल मराठी भाषेत इतके लिहिले गेले आहे की, त्यांच्या नावाबरोबर महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणाची वीस वर्षे नजरेसमोर उभी राहतात. ते स्वत: राजकारणात गुंतले गेले आणि इतरांनी त्यांना राजकारणात बुडवून टाकले. इतके की, त्यांच्या ख-या व्यक्तिमत्त्वाचा त्या राजकीय लोंढ्यात मागमूसही राहिला नाही! टीका, स्तुती, निंदा, आरोप, प्रत्यारोप इतके पराकोटीचे झाले आहेत की, ते सर्व सहन करण्याची ताकद किंवा सहनशीलता परमेश्वराने त्यांना किती दिली असेल याचा अचंबा वाटतो. इतरांनी टीकास्त्र सोडावे आणि चव्हाणसाहेबांनी ते हसतमुखाने सहन करावे, हे मराठी सुशिक्षित मनाला इतके अंगवळणी पडलेले आहे की, क्वचित अपवादात्मक परिस्थितीत जरी साहेबांनी कठोर प्रत्युत्तर दिले तरी लोक म्हणतात, ‘‘दुसरा काही बोलला तरी साहेबांनी रागावणे नाही बुवा पटले!’’

अशा शेकडो शब्दबाणांच्या वर्षावात जणू एकाकी लढत राहिलेला हा नेता खरोखरच केवळ राजकारणापुरताच आहे का? भारतात म. गांधी, पं. नेहरू आणि आता इंदिरा गांधी या तीन व्यक्तींवर जेवढे शब्द पडले असतील तेवढी टीका, स्तुती, निंदा, उपदेशाचे शब्द मराठी भाषेत चव्हाण साहेबांबद्दल लिहिले, उच्चारले गेले असतील! आमच्यासारख्या साहेबांच्या पत्रकारमित्रांना तर प्रत्येक वर्षी बारा मार्च अगोदर अनेक पत्रे येतात. ‘‘साहेबांचा वाढदिवस आहे. नरूभाऊ तुम्ही लिहा, त्यांचे राजकारण समजावून सांगा. आम्हीही लिहीत आलो पण यंदा ठरविले होते की, आता हे विश्लेषण पुरे. इतके लिहिले तरी ‘साहेब’ समजले नाहीत. मग कशाला उठाठेव?’’ साहेबांनी या महाराष्ट्राकरता, काँग्रेसकरता आणि देशाकरता काय केले हा इतिहास बोलका आहे आणि त्यातला अबोल मुग्ध भाग आहे तो खुद्द त्यांच्याच
मनोगताने व्यक्त झाला पाहिजे.

मधे एकदा कराडमार्गे सांगलीला जाताना सह्याद्रीच्या प्रतिनिधीकडून कळले. ‘‘साहेब आज कराडला जात आहेत.’’ मी गाडी वळवली. पत्ता सहज सापडला. बंगल्याच्या दारात गाडी उभी राहिली. शामरावनी पुढे होऊन आत सांगितले ‘‘नरूभाऊ आलेत’’ आणि साहेब बाहेर आले, मी वर ‘विरंगुळा’ या बंगल्याच्या नावाकडे आणि साहेबांकडे एकदोनदा पाहिले. वाटले, वनराज आता विश्रांतीसाठी घरी आला आहे. बाहेर राजकारण उन्हाळ्यातल्या चक्रीवादळासारखे गरगरत असताना साहेब आपल्या मित्राच्यासाठी, समारंभासाठी, मुद्दाम आले आहेत. वाटले, त्यांचे मन विरंगुळा शोधते आहे. प्रकृती बरी दिसली आणि माझ्या मित्र मनाला बरे वाटले. तसेच त्यांच्या कठीण समयी शांत राहण्याच्या वृत्तीचाही शोध लागला !

विचाराला एक नवीच कलाटणी मिळाली. एखाद्याचे जीवन फक्त एकाच दिशेने पाहण्याचा सराव झाला की, तो पूर्ण पुरुष समजूनच येत नाही. इतिहासात गाजलेल्या नेपोलियनबाबत असे म्हटले जाते की, त्याने जिंकलेल्या आणि हरलेल्या लढायांच्या वर्णनांनी त्या चरित्राची इतकी पाने खर्ची पडली की, त्याचे इतर गुणदोष अव्यक्तच राहिले! नेपोलियन म्हणजे लढाई, रक्तपात तसे चव्हाण म्हणजे राजकारणी, पण विचाराचा नवा किरण, त्या पैलूदार खड्यावर पडल्याबरोबर मला यशवंतराव नवे दिसू लागले. अनंत आठवणी मनात गर्दी करून पुढे येऊ लागल्या. चव्हाण साहेब ‘‘साहेब’’ होण्यापूर्वी आपल्या सवंगड्यांत कसे मिसळत, हसत, खेळत असत ते आठवले. सोमवार पेठेतल्या त्या मातीच्या कौलारू घरातली पडवी. मित्रांचा मेळा जमावा. अनेक विषयांवर संध्याकाळी सुरू झालेल्या गप्पा पहाटे संपाव्या आणि सर्वांनी तिथेच  फाटक्या सतरंजीवर अंग टाकावे. उशाला दुस-या मित्राचे पोट! एक गोलाकार आकृती तयार व्हायची. चव्हाण साहेब झाले, पण, ‘यशवंता’ म्हणणारे मित्र चुकून एकेरी बोलून जातात. नुसते कराड शहराच्या गल्लीबोळातून हिंडले की, काम भागते. मराठमोळ्या शेतकरी समाजातल्या लेकी-सुना भाऊराया आला असे वाटून साहेबांला पाहतात तर त्यांची आई, आजी पाहिलेल्या वृद्धा ‘‘यशवंता, मोठा झालास, देव तुझे भले करो’’ म्हणून कानशिलावर बोटे मोडून माया काढतात. असे प्रसंग जेव्हा येतात तेव्हा यशवंतरावांना जिवावरचे ओझे केवढे कमी झाल्यासारखे वाटत असेल! त्यांच्या मातृप्रेमाचे आई विठाई हे श्रद्धास्थान असल्याचे वर्णन अनेकांनी केले आहे. पण मित्र, सवंगडी, पोक्त, आप्तेष्ट, यांच्या आशीर्वादात त्यांना मिळणारा दिलासा आणि विरंगुळा सर्वांत मोठा असेल.

मित्रप्रेमाला जिथे राजकारणाचा रंग आला तेथे साहेबांइतके शिव्याशाप दुस-या कुणाला मिळाले नसतील. त्यांच्याकडून सतत काही तरी मिळालेले एखाद्या वेळी नाराजी निराशेचा प्रसंग आला की, खवळून उठतात. साहेबांचा ‘यशवंतराव’ आणि क्वचित ‘येशा’ होतो, पण साहेब सहन करतात. म्हणतात, ‘‘हो, त्यांना हवे ते मी देऊ शकलो नाही!’’ पण हे खरे मित्र नाहीत. राजकारणाच्या मापाने साहेबांना मोजणारे चूक करतात, अन्याय करतात, असे मला वाटते. आशानिराशेच्या लाटेत मीही तसा प्रमाद केला असेल पण साहेबांचे मित्र आणि मातृप्रेम हा त्यांचा विसावा आहे. त्या असंख्य आठवणीत हा ‘विरंगुळा’ आहे.