• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ९६

९६. यशवंतरावांचे प्रशासकीय सामर्थ्य – ले. ज. शंकरराव थोरात ( निवृत्त)

हा रूढ पद्धतीचा लेख नसून श्री.यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दलच्या केवळ काही आठवणी आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या काही पैलूंचे आंतरिक आकलन करून देणा-या अशा. यशवंतराव सत्तेवर येण्याच्या आधी थोड्या प्रसंगी त्यांना मी भेटलो असलो तरी त्यांचा माझा खरा परिचय झाला तो १९४६ मध्ये मी ब्रह्मदेशातील युद्धावरून परतल्यावर. कोल्हापुरात माझ्या सत्कारासाठी आयोजित केलेल्या समारंभाचे ते अध्यक्ष होते. समारंभ संपल्यावर त्यांनी मला आपल्याकडे चहाला बोलाविले. मी गेलो. ते सर्किट हाऊसवर उतरले होते. मी तेथे गेलो आणि पाहिले. लोकांची भली मोठी गर्दी त्यांची वाट पाहात थांबली होती. तेव्हा चहा आटोपल्याबरोबर मी जाण्यासाठी उठलो, ते म्हणाले, ‘‘थांबा’’. मी त्यांना सांगितले की, ‘‘फार लोक आपल्याला भेटण्यासाठी थांबलेले आहेत.’’ त्यावर ते हसले व म्हणाले, ‘‘हे आम्हा राजकारण्यांना काही नवीन नाही. हे लोक जे थांबलेले आहेत ते मला भेटण्यासाठी नाही, तर माझ्याकडून काही मिळविण्यासाठी थांबलेले आहेत. तुमच्या बाबत नेमकं उलटं आहे. तुमच्याकडून मला काही मिळवायचं आहे. तेव्हा आणखी थोडंसं थांबा.’’ मी थांबलो, आणि जवळजवळ अर्धा तास आम्ही जपानी युद्धावर बोललो. त्यांच्या चौकसपणाने मी प्रभावित झालो. माझ्या हेही ध्यानात आले की, त्यांच्या सर्व प्रश्नांतून त्यांचे स्वत:चे जागतिक घडामोडीचे सखोल ज्ञान प्रकट होत होते. नेहमी आढळते तसे ते उथळ नव्हते. त्यांचे ज्ञान सखोल व तपशीलवार होते. आणि विशेष म्हणजे बहुतेक बाबींसंबंधी त्यांची स्वत:ची अशी मते होती. बहुविध गोष्टींची चर्चा करताना आपली विद्वत्ता दाखवून छाप पाडण्याचा त्यांचा प्रयत्न नव्हता, की आपली मते मजवर लादण्याचाही प्रयत्न नव्हता, हेही मला जाणवले व चांगले वाटले. मी जायला निघालो तेव्हा मला पोचविण्यासाठी मजबरोबर ते मोटारीपर्यंत चालत आले. सत्तेवर असणा-या राजकारणी व्यक्तीबाबत ही गोष्ट वेगळी वाटावी अशी होती.

अशाच प्रकारची आमची दुसरी बैठक झाली ती मी कोरियाहून परतल्यावर. त्याही वेळी पूर्वीप्रमाणेच कोरियन युद्धाबाबत तसेच युनोमध्ये युद्धाच्या पूर्वी, युद्धकाळात आणि त्यानंतर घडलेल्या राजकीय कारवायांबाबत त्यांचे ज्ञान भांडार प्रकट झाले.

१९६१ मध्ये मी सैन्यातून निवृत्त होऊन स्थायिक होण्यासाठी कोल्हापुरास आलो. एक-दोन महिन्यांच्या अवधीत काही कामानिमित्त यशवंतरावांचे इथे आगमन झाले. त्यांनी मला संध्याकाळी भेटण्यासंबंधी निरोप पाठविला. निरोपात ‘आपल्याला थोडा वेळ असेल तर’ असा शब्दप्रयोग होता. मी गेलो. त्यांनी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचे अध्यक्षपद मला देऊ केले आणि आश्चर्याचा प्रचंड धक्का दिला. मी त्यांना सांगितले की, ‘‘मी आनंदाने स्वीकारीन.’’ मात्र त्यांना हीही जाणीव करून दिली, की मला हे पद देऊन आपण पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंची इतराजी ओढवून घेण्याची शक्यता आहे. कारण माझे आणि कृष्ण मेनन यांचे संबंध ताणले गेले होते व त्याच कारणाने पंतप्रधानांचेही संबंध ताणले जाण्याचे कारण, चीनने हिमालयावर हल्ला केला तर उत्तरेचे आणि नेफा प्रदेशाचे संरक्षण कोणत्या प्रकारे करावे याबाबत माझे व त्यांचे मतभेद होते. प्रत्यक्ष मॅक्मॅहोन रेषेवरच मी संरक्षण फळी उभी करावी असे त्यांचे म्हणणे होते; तर ते धोरण आत्मघातकीपणाचे ठरेल असे माझे मत होते; कारण रस्त्यांचा अभाव, प्रतिकूल हवामान यामुळे सैन्य इतक्या पुढे रेटून सांभाळणे मला कठीण वाटते. हे सगळे सांगून यशवंतरावांना मी म्हटले, ‘‘राज्यातील एवढे महत्त्वाचे पद मला दिल्यामुळे पंतप्रधानांच्या व आपल्या संबंधात पेच निर्माण व्हावा हे मला नको आहे.’’ त्यावर ते हसले आणि म्हणाले, ‘‘मला ते सारं माहीत आहे. संरक्षणमंत्र्यालाच आव्हान देऊन कंमाडर-इन-चीफ होण्याची संधी आपण घालविली हे ही मला माहीत आहे. ते काही असो, पंतप्रधानांच्या बाबत आपण निर्धास्त राहा. माझ्याबद्दल विरोध भावना निर्माण व्हावी इतक्या संकुचित मनाचे ते नाहीत. शिवाय, माझ्या राज्याच्या दृष्टीने चांगलं काय हे अखेरीस मीच ठरविणार. माझी खात्री आहे, की आपण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनवर आल्यानं; कमिशन हे अधिक निर्धास्तपणानं आणि नि:पक्षपातीपणानं काम करील असा दृढ विश्वास महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये निर्माण होईल.’’ अखेरीस मी विचारले, ‘‘मी माझे कर्तव्य पार पाडीत असता कोणाचा हस्तक्षेप होईल काय?’’