९३. मला उमजलेले यशवंतराव - विनोदराव
प्रशासनाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अगदी प्रारंभापासूनच शासन हे सर्वसामान्य जनतेचे हित साधणारे, कल्याण करणारे साधन आहे अशी भूमिका चव्हाण यांनी स्वीकारली होती. प्रशासनातील गुणवत्ता म्हणजेच प्रजाजनाचे कल्याण आणि सुख असे समीकरण त्यांनी मनाशी पक्के केले होते. त्या काळात प्रशासन यंत्रणेत आय.सी.एस. अधिका-यांचा मोठाच दबदबा होता. या वर्गात त्या वेळी एक प्रकारचा अहंकार असे. परंपरांना चिकटून राहणे हा त्यांचा स्थायिभाव होता. नियमांच्या चाकोरीत राहून निर्णय घेण्याची या वर्गाची वृत्ती असल्याने पूर्वापार चालत आलेल्या प्रशासन पद्धतीत बदल घडवून आणणे तसे फार जिकिरीचे होते. त्यामुळेच मुख्यमंत्री म्हणून नव्याने सूत्रे हाती घेतलेल्या श्री.चव्हाण यांना मोठ्या सावधपणे पावले टाकावी लागली. हे करीत असताना मात्र त्यांनी मनाशी निग्रह केलेला होता. कारण प्रशासनकार्यात सामाजिक जाणीव असल्याशिवाय कोणतेही शासन लोकप्रिय होऊ शकत नाही, हे त्यांनी पुरेपूर ओळखले होते. लोकप्रिय प्रशासन प्रस्थापित करायचे असेल तर मग प्रशासनातील पूर्वापार चालत आलेली विचारपद्धती आणि पूर्वग्रह, तसेच सत्तेचा वापर विशिष्ट मर्यादेत राहून करण्याच्या सवयीमुळे आलेली स्थितिप्रियता ही वैगुण्ये प्रयत्नपूर्वक दूर करणे आवश्यक आहे हे त्यांना पटले होते.
श्री. यशवंतराव प्रशासनातील भाषेला विशेष महत्त्व देत असत. भाषावार प्रांतरचनेच्या सूत्रानुसार राज्यांची पुनर्रचना झालेली असली तरीही भाषा हा केवळ राज्यांच्या सीमा निर्धारित करणारा घटक नसून भाषेला या पलीकडेही फार मोठे महत्त्व आहे, अशी त्यांची धारणा होती आणि हा विचार पटवून देण्याचा ते सतत प्रयत्न करीत असत. या गोष्टींचा त्यांना कधीच कंटाळा येत नसे. नव्याने निर्माण झालेल्या प्रत्येक राज्याने आपापल्या राज्यात प्रचलित असलेली आणि प्रसारात असलेली भाषा राज्यभाषा म्हणून स्वीकारली हे जरी खरे असले तरीही प्रशासनकार्यात ती भाषा केवळ तोंडाने बोलून चालणार नाही. या भाषेचा प्रशासनात वापर करताना त्यामागे संवेदनशील हृदयाची भाषा असायला हवी असे त्यांचे आग्रही प्रतिपादन असे. हा परिणाम जर घडवून आणायचा असेल तर प्रशासनाची कार्य करणारी जी यंत्रणा आहे तिच्या मागे जे मानवी हृदय आहे त्यातही इष्ट ते परिवर्तन घडवून आणायला पाहिजे, असा त्यांचा युक्तिवाद असे. विशेष म्हणजे हा युक्तिवाद त्या काळात वास्तववादी वाटला आणि त्याचा स्वीकार होऊन प्रशासनयंत्रणेतील व्यक्तींना लोकाभिमुख धोरण अंगीकारण्याची अपरिहार्यता पटू लागली.
श्री.चव्हाण यांचे विचार नेहमी मोठे असायचे, परंतु त्यात वादळीपणा नसायचा. त्यांची कल्पनाशक्ती उदंड असली तरीही ती हिंसक नसायची. त्यांच्या कल्पनेला व्यवहाराची किनार असायची तर त्यांच्या विचारात आणि आचारात मात्र कल्पकता आणि योजकता असायची. नेहरूंच्या जवळ असलेली स्वप्न पाहण्याची कल्पकता त्यांच्याजवळ निश्चित नव्हती. नेहरूंची कल्पकता ही परतत्त्वाने भारलेली असल्याने ती पृथ्वीवर आकारूच शकत नसे, तर ती अंतराळातच जमिनीपासून वर धुमारत असे. पण यशवंतरावांच्या बाबतीत परिस्थिती अगदी उलट होती. त्यांच्याजवळ कल्पकता असली तरीही त्यांचे पाय मातीत घट्ट रुतले होते, आणि या पायांची पकड अशी घट्ट होती की इतर सर्वसामान्य माणसांच्या पायापेक्षा त्यांच्या पाऊलखुणा वेगळ्या उमटत गेल्या. मातीशी नातं सांगण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळेच त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व इतरेजनांपेक्षा उंच गेलं होतं. नभाला झाकळून टाकणारं हे व्यक्तिमत्त्व नसले तरीही ते ज्या ज्या क्षेत्रात वावरले त्या त्या क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यानं सर्वांना स्तंभित केले होते. महाराष्ट्राचे नेतृत्व करीत असताना त्यांचा सहवास लाभलेली जी अनेक माणसे आहेत त्यांपैकी मी एक आहे. या सर्व माणसांना यशवंतरावांचा सहवास आणि त्यांच्याबरोबर केलेले जे कार्य होते त्यापासून निश्चितपणे एक आगळा आनंद मिळाला होता. त्यामुळेच त्यांच्याबद्दल आम्हा सर्व मंडळींना नेहमी कृतज्ञताच वाटत आली.