• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ७७

७७. यशवंतरावजी – मोहन धारिया

राजकीय क्षेत्रात नेतृत्व गाजवणा-या व्यक्तींचे राजकीय दर्शन त्या व्यक्तीचे आचार, विचार, विविध प्रकरणांत घेतलेले निर्णय आणि कृती तसेच सहकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्याबरोबर वागण्याची पद्धत यामधून नेहमी होत असते. वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन आदी माध्यमांच्या द्वारा ती व्यक्ती समाजासमोर जाते आणि जनमानसात या व्यक्तीची विशिष्ट प्रतिमा तयार होते. यशवंतरावजी त्याला अपवाद नव्हते. मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोप-यात त्यांचे नाव गेले आणि चीनच्या आक्रमणानंतर यशवंतरावजी संरक्षणमंत्री झाले तेव्हापासून त्यांच्या कीर्तीचा सुगंध सर्व देशभर दरवळण्यास सुरूवात झाली. अशा प्रकारे जनतेसमोर जाणारी प्रतिमा मोठ्या प्रमाणात बरोबर असली तरी त्या अर्थाने ते बाह्य दर्शनच असते. निकटच्या परिचयातून एखाद्या व्यक्तीचे अंतर्बाह्य स्वरूप आपल्याला समजू शकते. खूप काळ तुरुंगामध्ये असलो तर एखाद्या व्यक्तीचे जे खरे स्वरूप आपण पाहू शकतो तसे दर्शन कित्येक वर्षांच्या बाहेरील सान्निध्यात राहूनही मिळू शकत नाही. यशवंतरावजींबरोबर तुरूंगात एकत्र राहण्याचा योग कधी आला नाही, परंतु महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा सरचिटणीस, खासदार व मध्यवर्ती शासनातील मंत्री म्हणून खूप काळ त्यांच्या सान्निध्यात जवळून काम करण्याची संधी मला मिळाली. मी यशवंतरावजींचा चाहता असलो तरी त्यांचा स्तुतिपाठक नव्हतो. कित्येकदा आमचे गंभीर स्वरूपाचे मतभेदही झाले. यातूनच आम्ही एकत्र आलो आणि आमचे मित्रत्वाचे संबंध सातत्याने वाढत गेले. त्या पंचवीस वर्षाच्या कालावधीत यशवंतरावजींच्या जीवनातील विविध पैलूंचे दर्शन मी जवळून घेऊ शकलो आणि त्यांच्याविषयी वाटणारा आदर अधिकच वृद्धिगंत झाला. यशवंतरावजी जाऊन एक वर्ष होऊन गेले. त्यांच्या सान्निध्यात काम करीत असताना घडलेल्या कित्येक घटना व स्मृती अधूनमधून नजरेसमोर येतात आणि कळत नकळत डोळे तरळून जातात.

१९६२ साली भाई भाई म्हणणा-या चीनने भारतावर आक्रमण केले आणि देशभर एकच हाहाकार उडाला. त्या वेळी कृष्ण मेनन हे भारताचे संरक्षण मंत्री होते. त्यांच्याच गलथानपणामुळे भारतावर पराभव पत्करण्याची अपमानकारक पाळी आली आणि हजारो चौरस मैल क्षेत्र देशाला गमवावे लागले. संरक्षणमंत्री पदावरून कृष्ण मेननना काढण्याची मागणी देशभर सुरू झाली. तसे करण्यास पंतप्रधान नेहरू सुरुवातीस तयार नव्हते. परंतु महावीर त्यागीसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ‘‘इंद्राय स्वाहा । तक्षकाय स्वाहा ’’ करणे क्रमप्राप्त ठरेल असा रोखठोक इशारा पंडितजींना दिला आणि संरक्षणमंत्री पदावरून कृष्ण मेननना त्यांना दूर करावे लागले. त्या वेळी संसदेमध्ये नावाजलेले काँग्रेसचे काही नेते होते. परंतु खचलेल्या भारतीय जनतेच्या आणि सेनेच्या मनात नवा विश्वास निर्माण करणारी व्यक्तीच संरक्षणमंत्री असली पाहिजे असा सर्वांचा आग्रह होता. त्या वेळी महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावजींचे नाव देशभर झालेले होते. त्यातच १९६२ च्या सर्वत्रिक निवडणुकांत त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला देदीप्यमान यश मिळाले होते. शिवाय महाराष्ट्राने देशाच्या कठीण काळात शिवछत्रपतींच्या काळात घडविलेला इतिहास सुप्तपणे कोठेतरी वावरत असावा. पंतप्रधानांसह सर्वांचेच लक्ष यशवंतरावजींकडे गेले. पंतप्रधानांनी संरक्षणमंत्रिपदावर यशवंतरावजींची अचूक निवड केली. त्या आव्हानात्मक निर्णयाचा यशवंतरावजींनीही तितक्याच तत्परतेने व आत्मविश्वासाने स्वीकार केला.

यशवंतरावजींचे संरक्षणमंत्री म्हणून नाव जाहीर होताच मरगळलेल्या भारतीय सेनेमध्ये आणि पराभूत भारतामध्ये नवा विश्वास निर्माण झाला. भारताच्या साहाय्यासाठी धावून जाणा-या सह्याद्रीचे सर्वत्र स्वागत झाले. सर्व महाराष्ट्रातही त्यांचे मनापासून कौतुक झाले. कारण तो केवळ यशवंतरावजींचा बहुमान नव्हता तर उभ्या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या तेजस्वी ऐतिहासिक परंपरेचा तो बहुमान होता. अर्थात देशाने केलेले स्वागत आणि महाराष्ट्राने केलेले कौतुक यामध्ये फार मोठे अंतर होते.