• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ७६

७६- यशवंतरावांचे बोलणे – विनायकराव पाटील

साहेबांची भाषणे मी ते मुख्यमंत्री असल्यापासून ऐकत आलो आहे. पाचपन्नास मैलांच्या परिसरात कोठेही भाषण असले तरी मी हजर राहात आलो आहे. चांगले शब्द कानावरून जात. चांगले शब्द मला नेहमीच आकर्षित करीत आले आहेत. साहेब हे शब्दांचे जादूगार. त्यांनी केलेली भाषणे लक्षात राहात, व प्रयत्नपूर्वक मी ती ध्यानात ठेवीतही असे. ज्या ज्या वेळी मित्रमंडळी जमत असत त्या त्या वेळी त्यांच्या हावभावांची व उच्चारांची नक्कल मी करून दाखवी. त्याची पावती मित्रांकडून मिळत गेली. पुढे पुढे सार्वजनिक क्षेत्रातील कार्यकर्ते ‘साहेबांची नक्कल करून दाखव’ म्हणून कोठेही आग्रह करू लागले तर नक्कल हुबेहूब होते असे ते म्हणत असत, व मी सुखावत असे! त्याच त्या वाक्यांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नवीन वाक्यांच्या शोधात त्यांची भाषणे आवाजाच्या चढउतारांसह व लकबींसह मी तल्लीनतेने ऐकू लागलो. नंतर नक्कल हमखास होई. कार्यकर्ते, मित्र व मलाही प्रसिद्धी! संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी त्यांच्या भाषणाला प्रचंड गर्दी जमत असे. आजतागायत त्यात खंड नाही. त्या माणसाने बोलावे आणि लोकांनी ते आवडीने ऐकावे. त्या प्रचंड गर्दीतील एक श्रोता एवढीच माझी भूमिका.

सुरुवातीच्या चार-पाच वाक्यांतच श्रोत्यांना ताब्यात घेणारा हा जबरदस्त वक्ता होता. करंजवणे धरणाच्या पायाभरणीचा समारंभ मला आठवतो. पायाभरणीनंतर भाषण होते. त्याच जागेवर धरणग्रस्तांपुढे आपले सर्वस्व पाण्यात बुडवून उठणा-या ग्रामस्थांपुढे ! प्रसंग बाका होता. धरणग्रस्त प्रचंड संख्येने जमले होते. निषेधाच्या घोषणेपासून तो दंगलीपर्यंत काहीही घडणे शक्य होते.

साहेबांनी सुरुवात केली, ‘‘पिढ्यान्पिढ्या आपण राहात असलेली गावे सोडून जात असताना आपली कुलदैवते, वास्तू, आपण लावलेली झाडे, त्याभोवतालच्या वातावरणात रमलेले आपले मन काय म्हणत असेल? याचा विचार केला की, मन कष्टी होते. आपल्याला नवीन जागा मिळतील, जमिनी मिळतील, घरांची भरपाई मिळेल, परंतु पिढ्यान् पिढ्यांच्या सहवासानंतर होणारा दुरावा मोठा बेचैन करणारा असतो.’’ वातावरण भावविवश झाले. म्हाता-या कोता-या शेतक-यांनी उपरण्यांनी डोळे पुसले. साहेब बोलत होते. स्वत:चाच गाव सोडून, आपल्यालाच दुसरीकडे जाण्याची वेळ यावी या संवेदनेतून ते बोलत होते. त्यात ते धरणग्रस्तांच्या दु:खात सहभागी झाले होते. पण नकळत त्यांना आश्वासनही देत होते की, ‘‘तुम्हाला आम्ही नवीन घर देणार आहोत, नवीन शेतजमीन देणार आहोत, तुमचे पुनर्वसन करणे ही आमची जबाबदारी आहे व ती पुरी होईलच. कुणी राज्यकर्ता आपल्यावर आश्वासनांची खैरात करतो. असे न वाटता हा माझाच कुणीतरी सांत्वन करतोय असे शेतक-यांना वाटत होते. सभेत गोंधळ करण्याच्या तयारीने आलेले लोक या माणसाच्या राज्यात आपले वाईट होणार नाही या आत्मविश्वासाने परत गेले होते !

प्रसंगानुरूप आणि औचित्यपूर्ण हे त्यांच्या भाषणातील वैशिष्ट्य मला नेहमीच जाणवले आहे. त्यांची पाच मिनिटांत संपणा-या भाषणापासून ते तासभरापर्यंतची भाषणे मी ऐकली आहेत. साहेबांचा आवाज आर्जवी आहे. सातारच्या मातीतून आलेले काही आघात सोडले तर पुणेरी उच्चारात साहेब बोलतात. हो, बोलतात हेच खरे. कारण त्यांचे भाषण हे भाषणापेक्षाही हितगूजच वाटते. त्यांच्या गेल्या अनेक वर्षांच्या व्याख्यानांचा परिणाम म्हणून त्यांच्यासारखेच बोलण्याचा अनेक कार्यकर्ते प्रयत्न करू लागलेत. नेहमी ऐकणा-यांच्या हे लक्षात येत असे. अशाच एका वक्त्याच्या भाषणानंतर, ‘‘काय कसे काय झाले भाषण?’’ या खाजगीतल्या प्रश्नाला ‘‘गायकीत घराणी तशी भाषणात असती तर आपण चव्हाण घराण्यात बोललात!’’ या उत्तराने मी त्यांचा राग ओढवून घेतला होता. त्यांच्या शैलीचा स्वत:चे घराणे निर्माण करण्याइतका महाराष्ट्रातील कार्यकर्त्यावर परिणाम झाला आहे.