६४. असा मुख्यमंत्री पुन्हा नाही होणे – सौ. इंदिरा कुलकर्णी
आदरणीय यशवंतभाऊ आमच्या कराडचे, आमचे त्यांचे बहीण भावासारखे घनिष्ठ संबंध, अशी व्यक्ती महाराष्ट्राची मुख्यमंत्री झाली ही शुभ घटना आम्हा कराडकरांना मनापासून आनंद वाटावी अशीच. हे अत्युच्च पद भूषविणारा (आमच्या कराडच्या) एका गरीब शेतक-याचा मुलगा. ही केव्हाही अतिशय अभिमान वाटावा अशीच गोष्ट.
त्या वेळी आम्ही अमरावतीत होतो, मंत्रिमहाशय अमुक तारखेस अमरावतीस येणार असल्याची वार्ता कानी आली नि मी कराडकर भगिनी भावाची भेट होणार ह्या हर्षाने फुलून गेले. ह्या त्यांच्या मुक्कामात आपण त्यांना भेटायचे नि भावपूर्ण, मनापासून अभिनंदन करायचे हेही मनाशी पक्के ठरवून टाकले.
मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ वगैरे आधी न ठरविता भेट घेणे ही गोष्ट महादुर्लभ याची जाणीव नव्हती असे नाही. पण हे महानपद भूषविणा-या आपल्या यशवंतभाऊंना कसेही करून भेटायसाठी मन उत्सुक झाले होते.
भाऊ अमरावतीत येणार हे कळल्यापासून त्यांच्या मोठेपणा सांगणा-या अनेक गोष्टी, अनेक प्रसंग डोळ्यासमोरून सरकू लागले. अनेक गाठीभेटीचे प्रसंग ताजे झाले. तो त्यांचा टवटवीत, हसरा चेहरा, ते विनोद, तो मिष्कील भाव सारे सारे आठवले.
मी अधूनमधून कविता रचते. आता तर काय माझ्या काव्यगुणांना एक आवडीचाच विषय मिळाला. अन् क्षणार्धात ओळी पुढे ओळी तयार होऊ लागल्या. हां हां म्हणता एक यशवंतासाठी गुणगौरवपर काव्य तयारही झाले.
आज यशवंतरावजी येणार, नेहरू मैदानात सभा व्हायची. मैदान एवढे मोठ्ठे पण सर्व बाजूंनी सुरेख सजविले होते. भव्य, उंच व्यासपीठ मुद्दाम तयार केले होते.
आम्ही दोघे सभेच्या बराच वेळ आधी चांगली जरा जवळची जागा मिळावी म्हणजे भेट घेणे जरा सुलभ होईल ह्या हेतूने गेलो. पण पाहतो तर काय? सारे मैदान नुसते माणसांनी फुलून गेले होते. तिळभर जागा रिकामी नव्हती. तशाच गर्दीत मी हातात हाराची परडी, पेढ्याचा पुडा आणि कवितेची घडी सावरत जरा जरा पुढे घुसले नि बरी जागा मिळविली. मनाशी एक धाडसी विचारही केला. भाऊ आले की, धडक व्यासपीठावर जायचे, गाठ घ्यायची.
ठरलेल्या वेळेपेक्षा ब-याच उशिरा मंत्रिमहाशय येत असल्याचे लाऊडस्पीकर सांगू लागला. मग प्रत्येकजण उत्सुकता डोळ्यात साठवून मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी सज्ज झाला. तेवढ्यात सर्वांचे नमस्कार स्वीकारत सा-यांना आभिवादन करीत, यशवंतरावांची आनंदी, हसतमुख स्वारी तडफेने चालत व्यासपीठाकडे निघाली. सर्वच्या सर्व श्रोते आधी न उठण्याची ताकीद दिलेली असूनही उभे राहून आपल्या लाडक्या नेत्याचे माना उंचावून डोळे भरून दर्शन घेऊ लागले.
मुख्यमंत्री स्थानापन्न झाल्यावर गावचे पुढारी स्वागतगीत झाल्यावर प्रास्ताविक भाषण करू लागले. अन् तो क्षण मी पकडला, मला कुठून धाडस आले कोण जाणे. सपासप वाट काढीत मी व्यासपीठावर चढले. भाऊंना हार घातला, पेढे दिले. त्यांनाही मला पाहून खूप आनंद झाला. एवढ्या गडबडीतही त्यांनी माझी, माझ्या पतींची विशेष म्हणजे त्यांचा मित्र असलेला माझा भाऊ त्याचीही चौकशी केली. मी धन्य झाले. भरून पावले. भाऊंच्या हाती कागदाची घडी देत मी म्हटले, ‘‘भाऊ मी तुमच्यावर एक कविता केलीय ती स्वीकारावी.’’ त्यांनी कविता हातात घेतली नि म्हणाले,
‘‘ताई स्वीकारावी वगैरे भाषा बहिणीने करायची नसते हं! तुमच्या भेटीने मला खूप आनंद झाला. ही कवितेची सप्रेम भेट मला मोलाची वाटते. ही माझ्या मायेची भेट आहे. मात्र ताई, मी ती नागपुरास गेल्यावर स्वस्थपणे वाचून मग कळवीन हं!’’