• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ५७

५७. यशवंतराव-एक ललित व्यक्तिमत्त्व – दिनकर साक्रीकर

साहित्याचे बाळकडूच घेऊन ते या काव्यरम्य प्रदेशात वावरले. जोतिबा फुल्यांच्या चरित्रापासूनच त्यांनी वाचनाला सुरुवात केली. त्यातून घेतलेला सामाजिक परिवर्तनाचा संदेश ते कधीच विसरले नाहीत. त्यांनी कवी गोविंद आणि कवी गोविंदाग्रजांच्या कविता वाचल्या. गडक-यांची नाटके वाचून ते इतके भारावून जात की, राजसंन्यासमधील कित्येक संवाद मुखोद्गत झाले होते. येरवड्याच्या तुरुंगात असताना त्यांची आचार्य भागवतांशी गाठ पडली. या गांधीवादी आचार्यांनी त्यांना कालिदास तर सांगितलाच, पण सावरकरांचे राजकारण काहीही असले तरी त्यांची कविता वाचली आणि त्यांना जाणवले की, गोविंद काय, गोविंदाग्रज काय, किंवा सावरकर काय, हे सर्व मराठी कवी ज्वलंत देशभक्तीची संधीच जणू देत आहेत.

कृष्णा खो-यातील निसर्गात

गोविंद-गोविंदाग्रजांच्या काव्याने यशवंतरावांचे साहित्यिक व्यक्तिमत्त्व घडवले, एवढेच नव्हे तर त्यांना साहित्यिक प्रेमांची जन्मभर पुरून उरणारी देणगी दिली. दिल्लीला गेल्यानंतरही त्यांचे या जमिनीशी, साहित्याशी असलेले नाते तुटले नाही अथवा दुरावलेले नाही.

भेटायला जाणा-या माणसाला त्यांच्या टेबलावर मराठीतील अगदी नवनवीन ग्रंथ दिसत. मराठीतील जवळजवळ सर्व प्रतिभाशाली साहित्यिक अभिमानाने त्यांना मित्र मानीत. अनंत काणेकर असोत वा पु.ल.देशपांडे असोत, माडगूळकर असोत वा महानोर असोत सर्वांना त्यांचा सहवास प्रिय असे. मराठी माणसाचे नाटकाचे वेडही त्यांच्या ठायी होतेच. शालेय दिवसांत जसे त्यांनी गडकरी वाचले तसेच महाराष्ट्राच्या लोककलांचीही त्यांनी अत्यंत प्रेमाने ओळख करून घेतली. पोवाडे, भजन, तमाशा यांच्या कार्यक्रमासाठी ते मित्रांबरोबर लांबलांब जात असत. महाराष्ट्राच्या शहरी रंगभूमी आणि महाराष्ट्राच्या शास्त्रीय गायकांइतकेच शाहीर व लावणी गायकही त्यांना प्रिय होते. महाराष्ट्राच्या शहरी व ग्रामीण संस्कृतीचा जणू उदात्त संगमच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला होता.

संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश त्यांनी आणला की आणखी कोणी आणला याबद्दल कदाचित वाद होऊ शकेल, पण महाराष्ट्र राज्याला मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण लाभले, हे या नवीन राज्याचे एक महत् भाग्य होते, याबद्दल कुणाला वाद घालता येणार नाही.

मराठी भाषा व मराठी साहित्य याबद्दल त्यांचे जे अफाट प्रेम होते, जो अभिमान होता, त्याचमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व व्यक्तींच्या आदरास ते पात्र झाले होते. वास्तविक संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आचार्य अत्रे हे त्यांच्या विरोधातील प्रमुख. पण आचार्य अत्र्यांना त्यांच्याबद्दल शेवटपर्यंत अतिशय प्रेमादर होता. केवळ त्यांचे साहित्यप्रेमच सांगून भागणार नाही, त्यांनी केलेले प्रत्यक्ष लेखन हे सुद्धा साहित्यगुणांनी युक्त असे आहे. या संदर्भात त्यांच्या आत्मचरित्राचा उल्लेख अपरिहार्य होतो. मराठी साहित्यात कायमचे स्थान मिळवून देईल, असा हा लेखनप्रपंच त्यांनी केला आहे.

१९६४ साली त्यांना पहिला साहित्यिक सन्मान मिळाला. त्या वर्षीच्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते आणि १९७५ साली म्हणजे आणीबाणीच्या प्रक्षुब्ध वातावरणात कराडच्या साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या दुर्गाबाई भागवत. वादळाचे गर्द ढग गोळा झालेले, संमेलन कसे पार पडते याची सर्वांना चिंता, पण अखेर कोणताही गैरप्रकार न घडता संमेलन यशस्वीरीत्या संपन्न झाले. श्रेय होते यशवंतरावांचेच. साहित्याच्या मांडवात आपण मंत्री नसून एक रसिक आहोत ही त्यांची भूमिका. म्हणूनच ‘‘मंत्री संमेलनात नकोत’’ या वादाचा त्यांना उपद्रव कधीच झाला नाही. इचलकरंजीच्या संमेलनात हा प्रश्न उपस्थित होईल असे वाटले होते, परंतु यशवंतरावांनी श्रोत्यांच्या रांगेत स्थान घेऊन पु.लं.चे अध्यक्षीय भाषण शांत चित्ताने ऐकले व साहित्यसंमेलनात साहित्यिकांचे अग्रस्थान एक प्रकारे मान्य केले.

राजकारण व साहित्य दोघांचेही माध्यम शब्द आहे. म्हणून राजकारणी हे साहित्यिकांचे शब्दबंधु असतात असे ते एका भाषणात म्हणाले होते. साहित्यिकांना शब्दबंधु म्हणणा-या यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व हे ललित व्यक्तिमत्त्व होते ते असे.

त्यांच्या आत्मचरित्राच्या पहिल्याच खंडाला ‘‘न.चिं.केळकर पारितोषिक’’ मिळाले आहे. त्याचे तिन्ही खंड प्रसिद्ध होतील तेव्हा महाराष्ट्राचा सामाजिक व राजकीय इतिहासच प्रत्यक्ष तो घडवणा-याकडूनच लिहिलेला, असा उपलब्ध होईल. पण दुर्दैवाने तसे घडले नाही तथापि. ‘‘मराठी साहित्यात घातलेली मोलाची भर’’ असेच या आत्मचरित्रांबद्दल म्हणावे लागेल. सर्जनशील साहित्य निर्माण करण्याची प्रतिभा त्यांचे ठायी होती हे मान्य करावे लागेल.

इतिहास घडविणारा साहित्यिक असे यशवंतरावांचे अनन्यसाधारण स्थान महाराष्ट्रात आहे व ते तसेच यापुढेही राहील.