५४. महाराष्ट्राच्या भाळीचा टिळा - दिलीप जामदार
यशवंतरावजी साहित्यिक होते, राजकारणपटू होते, रसिक होते. गरिबांसाठी त्यांच्या ठायी माणुसकीचा गहिवर होता. त्यांची वाणी मधाळ होती. पण त्याहीपेक्षा त्यांचे डोळे स्नेहाळ होते. यशवंतरावांचा हात पाठीवर पडला की, त्यांच्या अनुयायांत उत्साहाचं वारं संचारत असे, तर विरोधकांचा विरोध विरघळत असे.
राजर्षी शाहू महाराज हे यशवंतरावजींचं एक श्रद्धास्थान होतं. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरात झालं. कोल्हापूरच्या वातावरणात सत्यशोधक समाज, दलित समाजाबद्दलची कणव, समाजसुधारणेची दूरदृष्टी, शिक्षणाची जागरुकता हे संस्कार घेऊन त्यांचं व्यक्तिमत्त्व आकारू लागलं. त्यांचा वाचनाचा व्यासंग वाढत होता. राजकारणाची गोडी त्यांना लागली होती. सळसळत्या रक्ताला झपाटून टाकणारं ४२ सालचं क्रांतियुद्ध सुरू झालं आणि यशवंतराव बावनकशी सोन्याप्रमाणं त्यातून तावून सुलाखून बाहेर पडले. विशाल मुंबई राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर जेव्हा ते आरुढ झाले तेव्हा त्यांच्या म्हाता-या आईच्या आणि त्यांच्यावर प्रेम करणा-या विराट जनतेच्या डोळ्याचं पारणं फिटलं.
तारीख आठवत नाही परंतु वर्ष होतं १९५६. आजच्या महाराष्ट्राचे समर्थ मुख्यमंत्री श्री.वसंत दादा पाटील हे मला घेऊन यशवंतरावजींच्याकडे गेले. त्या वेळी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान होते. ‘सह्याद्री’ बंगला. मुख्यमंत्र्यांच्या बसल्या जागेवरून अरबी समुद्र दिसायचा. मलबार हिलवरील हिरवळीबरोबर गुलमोरांच्या तांबड्या डहाळ्या चव-या ढाळायच्या. यशवंतरावजींबरोबर बोलणा-या व्यक्तीच्या डोक्यात षड्यंत्र फिरत असलं तरी ‘‘साहेबांची’’ दृष्टी आणि विचार, विशाल सागर आणि गुलमोहर यांच्या समन्वयाचे असत. माननीय दादांनी माझी ओळख करून दिली, मी रेखाटलेली काही जलरंगातली चित्रं त्यांना दाखवली. ‘‘साहेबांनी’’ एकवार मला न्याहाळलं. माझ्या पाठीवर कौतुकाचे थाप मारली. हा प्रसंग मी लागलीच ‘‘यशवंतराव चव्हाणांच्या सहवासातला एक क्षण’’ या शीर्षकाखाली कोल्हापूरच्या ‘सत्यवादी’ पत्रात लिहिला होता... आश्चर्याची गोष्ट अशी की, पुढे चार-पाच महिन्यांनी खास साहेबांच्या शिफारशीनं माझी जिल्हा माहिती अधिकारी, पुणे येथे नेमणूक झाल्याचा आदेश मला मिळाला. नोकरीवर रूजू होऊन दोन महिने होतात न होतात तोच भारत सरकारच्या माहिती आणि नभोवाणी विभागातील चित्रपट विभागात डेप्युटी डायरेक्टर म्हणून निवड झाली. साहेबांचा निरोप घ्यायला गेलो. तोच प्रेमळ हात पाठीवर, तीच ती विजेरी थाप आणि आशीर्वाद. ‘गो अहेड.’’