• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ४७

४७. आठवणीतील यशवंतराव – सुधांशू

मला जीवनात ज्या मोठ्या माणसांचा स्नेह लाभला त्यात प्रमुख यशवंतरावजी चव्हाण. त्यांची किती वेळा भेट झाली, किती काळ आम्ही सुखदु:खे बोललो, किती रात्री जागवल्या, याला किती महत्त्व ! जेव्हा भेटलो तेव्हा जिव्हाळ्याचे भेटलो; आणि अंत:करणातले बोललो हे महत्त्वाचे. तसे मी त्यांना १९३९ सालीच प्रथम पाहिले. तासगाव येथे भरलेल्या काँग्रेसच्या राजकीय परिषदेच्यावेळी मानवेंद्रनाथ रॉय अध्यक्ष होते. रॉयवादाकडे सातारा काँग्रेसची काही मंडळी झुकत होती. विचारांचा संघर्ष वाढत होता. मीही रोज वर्तमान पत्रे वाचत होतो. माझ्या गावचे धुळाप्पा आण्णा नवले, तात्या सूर्यवंशी या कार्यकर्त्यांशी बोलत होतो. या परिषदेलाही मी गेलो होतो. राजाराम मास्तर, दत्ता पाटील अशी मित्रमंडळी बरोबर होती. सभेत सुरूवातीपासूनच संघर्षाचे वातावरण दिसले. शेवटी सभा उधळलीच गेली. निराशा आणि व्यथा घेऊन आम्ही परतलो. पण त्या वेळेला काही कार्यकर्ते नेते मंडळी पाहायला मिळाली. हा फार मोठा लाभ. या वेळी मी यशवंतरावांना प्रथम पाहिले. तरतरीत खादीधारी तरूण कार्यकर्ता म्हणून मला त्यांचे आकर्षण वाटले. हा तरूण कार्यकर्ता उद्या महाराष्ट्राचाच नव्हे तर भारताचा नेता होणार आहे याची त्या वेळेला कल्पना आली नाही, पण त्यांचे व्यक्तित्व मला आकर्षक वाटले एवढे खरे!

मध्यंतरी खूप वादळे, खूप वणवे निघाले. पण अंधारातून उषा उजळली. भारताच्या क्षितिजावर स्वातंर्ताचा सूर्य उगवला आणि शेवटी १९५० साली प्रजासत्ताकाची ध्वजा फडकली. महाराष्ट्राचे नवे मंत्रिमंडळ आले, त्यात यशवंतराव चव्हाण पुरवठा मंत्री झाले. १९५२ साली निमणी येथे तासगाव तालुका शेतकरी परिषद होती. त्यासाठी यशवंतरावजी येणार होते. मीही

परिषदेला गेलो होतो. तेथे यशवंतरावांची भेट झाली. त्या छोट्याशा तंबूत मी त्यांच्याशी पाचदहा मिनिटे बोललो. त्यांनी माझ्या नवीन कवितेसंबंधी विचारले. मी माझा दुसरा कविता संग्रह ‘विजयिनी’ त्यांना भेट दिला. त्यांनी तेथेच त्यातील काही कविता आधाशासारख्या वाचून काढल्या आणि म्हटले, ‘‘तुमची भेट झाली बरे झाले. ही कवितांची भेटही छान मिळाली. मला साहित्याची आवड आहे. आणखी काव्यात काय प्रगती?’’ मी सांगितले, ‘‘मुंबई आकाशवाणीने मला अधिकृत कवी म्हणून नुकतीच मान्यता दिली आहे. लवकरच कविता येऊ लागतील.’’ त्यांना फारच आनंद झाला. ते म्हणाले ‘‘मग आता तुम्ही मला वरचेवर भेटालच आकाशवाणीवर.’’ त्यांनी हस्तांदोलन करून माझे अभिनंदन केले. तो माझ्या दृष्टीने सोन्याचा क्षण!

पुढे मुंबईस गेल्यावर त्यांनी नभोवाणीकडे माझी कविता केव्हा लागेल याची चौकशी केली. आकाशवाणीने कळविल्याप्रमाणे त्यानी ‘दत्त दिगंबर दैवत माझे’ ही कविता ऐकली. आकाशवाणीला कविता फार आवडल्याचे कळविले आणि मलाही पत्र पाठवून माझे अभिनंदन केले. यशवंतरावांच्या या दक्षतेने, प्रेमाने माझे अंत:करण भरून आले.

पुढे १९५४ साली आम्हीच यशवंतरावजींना औदुंबरी आणले.

अंकलखोप विकास मंडळातर्फे औदुंबरी एक सुंदर धर्मशाळा (गेस्ट हाऊस) बांधली. त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचे यासाठी मीटिंग होती. ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष धुळाप्पा आण्णा नवले होते. मी या मंडळाचा सेक्रेटरी होतो. मी यशवंतरावजींचे नाव सुचविले. धुळाप्पा आण्णा यांनी जोरदार पाठिंबा दिला व सर्वानुमते यशवंतरावजींना निमंत्रण देण्याचे ठरले. यशवंतरावांनीही येण्याचे मान्य केले.

हा समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला. यशवंतरावजींची त्यावेळी अगदी जवळून भेट झाली. माझ्या ‘‘विजयिनी’’तील कवितांबद्दल ते विस्ताराने बोलले. समारंभानंतर माझ्या घरी चहासाठीही आले. त्यांच्या साहित्यिकांच्याबद्दलच्या प्रेमाचा हा अनोखा अनुभव होता.