• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १४१

१४१. सुंदर लेण्यांचा शिल्पकार –ना. प्रा. राम मेघे

 ‘‘प्राप्त काल हा विशाल भू-थर
सुंदर लेणी तयात खोदा,
निज नामे त्यावरती नोंदा
विक्रम काही करा चला तर.’’

आधुनिक मराठी काव्याचे जनक कवी केशवसुत तथा कृष्णाजी केशव दामले यांच्या ‘‘तुतारी’’ या क्रांतिकारक कवितेतील ह्या ओळी आहेत. महाराष्ट्र भाग्य-विधाते श्री. यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी मी जेव्हा जेव्हा विचार करतो, तेव्हा तेव्हा केशवसुतांच्या तुतारीची आणि विशेषेकरून ह्या चार ओळींची मला तीव्रतेने आठवण होते. श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनाचे सारे सार ह्यातून प्रतिबिंबित होते असे मला वाटते. प्राप्त परिस्थितीचे संधीत रूपांतर करून नव्या जीवनाची, नव्या आशा-आकांक्षांची शिल्पे त्यांनी निर्माण केली.

१९४२च्या ‘‘छोडो भारत’’ आंदोलनात त्यांनी सर्व प्रथम भाग घेतला आणि सातारा, कोल्हापूरचा सारा परिसर त्यांच्या चळवळीने भारावून गेला. घरा-घरांतून स्वातंत्र्याची तुतारी फुंकली गेली, स्वराज्याची गीते गायली जाऊ लागली आणि त्यातूनच यशवंतराव चव्हाण या कार्यकर्त्यांचा, कुशल संघटकाचा जन्म झाला. १९४६साली त्या वेळच्या मुंबई राज्याच्या गृहमंर्ताचे संसदीय सचिव (पार्लमेंटरी सेक्रेटरी) म्हणून त्यांनी प्रशासनक्षेत्रात पदार्पण केले. अन्न आणि नागरी पुरवठा, स्थानिक स्वराज्य, जंगल आणि विकास आदी खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे आली. ही जबाबदारी म्हणजे एक संधीच आहे असे मानून त्यांनी लोककल्याणाचे आणि जनहिताचे अनेक निर्णय घेतले. प्रभावीपणे त्यांची अंमलबजावणी केली, आणि कुशल, पुरोगामी विचारांचा प्रशासक म्हणून नावलौकिक मिळविला.

१९५७साली श्री. यशवंतराव चव्हाण यांच्यावर त्या वेळच्या द्विभाषिक मुंबई राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आली. तो काळ असा होता की, महाराष्ट्रातील सारे वातावरण संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाने भारावून गेलेले होते, आणि यशवंतरावजी तर महाराष्ट्राचे खंदे पुरस्कर्ते होते. पण भावनिक आंदोलनाच्या लाटेवर स्वार होऊन लोकप्रियता  मिळविण्यापेक्षा राष्ट्रीय प्रवाहाशी महाराष्ट्राची सांगड कायम राहावी म्हणून त्यांनी या भावनेवर विवेकाचे बंधन घातले आणि अतिशय नाजूक व कठीण परिस्थितीत द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारले.

श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या या अचूक आणि विवेकी निर्णयाने मी आणि माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांच्याजवळ आलो. त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन अमरावती, वर्धा जिल्ह्यात कामाला लागलो. त्या वेळी विदर्भावर भांडवलदारांचे वर्चस्व होते. ते कमी करून विदर्भाला समाजवादी विचाराकडे वळवावयाचे असेल तर तो महाराष्ट्राबरोबरच राहिला पाहिजे अशा विचारांची आम्ही अनेक तरुण मंडळी होतो. गावोगाव फिरून सभासंमेलनातून हे विचार हिरीरीने मांडत होतो. अशाच एका माझ्या सभेला श्री. यशवंतरावजी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यांच्या सहवासात राहण्याची, बरोबर काम करण्याची ही माझी पहिली संधी होती. त्यांच्या विचारांचा आणि वागणुकीचा फार मोठा परिणाम माझ्यावर झाला.

पुढे १९६० साली १मे रोजी विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्र यांचे एक सलग मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात आले आणि ह्या यशाचे शिल्पकार असलेल्या यशवंतरावांचीच मुख्यमंत्रीपदी एकमताने निवड झाली. भविष्याची भूमी फुलविण्याची आणखी एक संधी त्यांना मिळाली. अर्थात या पदावर यशवंतराव अवघी दोन अडीच वर्षे होते. पण या दोन वर्षांच्या अल्प काळातही त्यांनी अनेक क्षेत्रांत नवविचारांचे वारे निर्माण केले. मराठी भाषिकांच्या समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्राच्या जडणघडणीच्या अनेक योजना सुरू केल्या. गरीब मुलांसाठी फीमाफीची योजना, औद्योगिक वसाहतींची स्थापना, कसेल त्याची जमीन हा कायदा, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची निर्मिती करून संस्थेच्या विकेंद्रीकरणाला व ग्रामीण नेतृत्व जोपासण्याला त्यांनी गती दिली.

साहित्य, संगीत, कला, नाट्य, लोककला यांना ऊर्जितावस्था येण्यासाठी अनेक योजना त्यांनी हाती घेतल्या. या सा-या प्रयत्नातून एका नव्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, औद्योगिक परिवर्तनाला श्री. यशवंतरावांनी प्रारंभ केला. आज महाराष्ट्र राज्याचा रौप्य महोत्सव साजरा केला जातो आहे. या प्रसंगी मला वळून पाहिले की, यशवंतरावांनी लावलेल्या रोपट्याचे आज भरदार वृक्षात रूपान्तर झालेले दिसते.