• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १३५

१३५. क-हाडचे मामा – श्री. न. वा. ढवळे

मामा प्रत्येकालाच असतात. किंबहुना प्रत्येकजण कुणा ना कुणाचा मामा असतो. पण यशवंतरावांसारखा जगावेगळा मामा फारच थोड्यांना मिळतो. अर्थात एका गरीब कुटुंबात जन्मलेला हा माणूस भारताच्या उपपंतप्रधान पदापर्यंत जाऊन पोहोचतो, म्हणून मी त्यांना मोठे म्हणत नाही. पण त्यांच्या वागण्या-बोलण्यातले बारकावे, जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी, त्यांची विचार करण्याची पद्धती... एक ना अनेक गोष्टी विचारात घेतल्या तर त्यांचे आगळेवेगळेपण नजरेला येईल.

‘‘मामांचं कृष्णाकाठावर विलक्षण प्रेम होतं. मी त्या वेळी पाच-सहा वर्षांचा असेन. घरची परिस्थिती अगदी गरिबीची होती. पण आल्यागेल्यांना चटणी-भाकर तरी दिल्याशिवाय आज्जीनं कधी सोडलं नाही. मामा एकटे कधीच नसत. हातात एखादं पुस्तक आणि भोवती माणसांचं कोंडाळं सतत असे. संध्याकाळी प्रीतिसंगमावर निघाले की, बरोबर ह.रा.महाजनी, राम कापसे, शांताराम इनामदार असे मित्र असत. जिथे आज त्यांचे दहन करण्यात आले तिथेच त्यांची बैठकीची जागा असे. त्या वेळी चावडी चौकात सार्वजनिक वाचनालयाची इमारत होती. मामांचा जीव जसा या कृष्णाकाठी गुंतलेला असे तसेच या वाचनालयातही त्यांचे दिवसाचे दोन-तीन तास जात. आम्हाला शाळेत घातले ते त्यांनीच हाताला धरुन. वरचेवर ते शाळेत यायचे. आमच्या अभ्यासाची चौकशी करायचे. आम्हाला इंग्रजी समजायचं नाही. तेव्हा चक्क मराठीत. ‘‘माय नेम इज बाबू’’ असं लिहून पाठ करुन घ्यायचे.

आमच्या घरची परिस्थिती बरी नव्हती. त्यामुळे मामांना आपले काही विचार आचारात आणताना अडचण पडे. तसे ते कधीच बोलून दाखवीत नसत. पण आपल्या घरातील माणसांनी वागावे कसे, बोलावे कसे, कपडे कसे

घालावेत, याबाबत त्यांचे काही ठाम विचार असत. मला आठवते, लहानपणी आम्ही चौकात उगाच टिंगल करीत असू. गुपचूप एखाद्याच्या शर्टाला चिंधी बांधून चेष्टा करीत असू. एकदा कुणीतरी माझ्याच शर्टाला चिंधी बांधली होती. मला ते ठाऊक नव्हते. मामा तेव्हा वकिली करीत. अशा अवस्थेत ते एकदा चौकातून कोर्टात चालले होते. मला पाहताच त्यांनी हाक मारली. ‘‘घरी असं असं कमी आहे ? वेणूला तेवढं नेऊन दे,’’ असे म्हणाले आणि त्यांचे माझ्या शर्टाकडे लक्ष गेले. ‘‘हे काय?’’ ते म्हणाले आणि ‘‘बाबू नेहमी चांगल्यांच्या संगतीत असावं.,’’ असे सांगून निघून गेले.

‘‘स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळातील मामा, शामराव खिंडीतून त्यांच्या खांद्यावर बसून केलेला प्रवास, कधी रेल्वेत आपण बाकावर आणि मामा बाकाखाली दडून असा प्रवास, त्यांचे मित्र मंडळ त्यांच्या वागण्यातील नम्रता, तितकाच वागण्यातील कठोरपणा, घरचे लोक, घरच्यांशी मामांचे संबंध अशा कितीतरी विषयांवरील आठवणींना बाबूराव उजाळा देत होते. देशभक्तीची त्यांची अंत:प्रेरणा, माणसे गोळा करण्याची हातोटी, हे केले पाहिजे, ते केले पाहिजे असा सारखा आग्रह.

‘‘आमच्या कुटुंबावर दु:खाचे अनेक प्रसंग ओढवले. पण त्यांना कधी रडताना मी पाहिलं नाही. दु:खाला फार संयमानं ते आवर घालीतं. १९४८ मध्ये माझे दुसरे मामा गणपतराव वारले. तेव्हा मी पुण्यात कॉलेजमध्ये शिकत होतो. टिळक रोडवरील लक्ष्मीसदनमध्ये राहात होतो. या घटनेनंतर मामा माझ्या खोलीवर आले नि पाच मिनिटं मोकळेपणानं रडत बसले. तसाच दुसरा प्रसंग आठवतो. तेव्हा मामा पार्लमेंटरी सेक्रेटरी होते. ते १८ नंबरच्या बंगल्यात राहात होते. त्या वेळी पार्लमेंटरी सेक्रेटरीला बंगला असला तर फोन किंवा गाडी नव्हती. १५ नंबरच्या बंगल्यात त्या वेळचे मंत्री गणपतराव तपासे राहात होते. तिथे फोन होता. मामांसाठी फोन आला तर तिथून निरोप येई व मामा फोन घ्यायला जात. या दोन बंगल्यातील अंतर सुमारे एक फर्लांग होते. एके दिवशी सकाळी जिल्हाधिका-यांचा फोन आला. तो घ्यायला ते गेले त्यांनी फोन घेतला आणि तिथेच हंबरडा फोडला ! ओक्साबोक्सी रडतच ते बंगल्यावर परतले. यशवंतराव का रडताहेत ? घरची सगळी माणसं आणि नोकरचाकर अवाक् झाले. पण त्यांना विचारायचं कुणी, तरीही भीतभीतच मी विचारले, त्यांचे एक जिवलग स्नेही के.डी.पाटील यांचा खून झाल्याचा तो फोन होता ! या घटनेला आता पंचवीस वर्षे झाली. तरीही त्यांची त्या कुटुंबावर पितृछाया होती. प्रत्येक अडीअडचणीला ते उभे राहिले. इतकंच काय के. डी. पाटील यांच्या मुलीचं लग्न झालं त्या वेळी तिचे यजमान साहेबांचे जावई म्हणूनच ओळखले जात.