१२५. छायाचित्र – मनोहर दत्तात्रय तथा बाळ पुल्ली
माझे मामा चांगल्यापैकी फोटोग्राफर होते. त्यांच्यामुळे मला छायाचित्रकलेचे शिक्षण आपोआपच, सहजासहजी मिळाले. १९४८ मध्ये महात्मा गांधींच्या रक्षा पुण्यात आल्या होत्या. आळंदीला विसर्जन झाले. त्या वेळी तेथील कार्यक्रमाचे फोटो फक्त मीच एकट्याने घेतले आणि श्री.ठाकूर यांनी ते दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध केले. पत्रकार, छायाचित्रकार, म्हणून माझ्या जीवनाची सुरूवात अशी झाली.
या व्यवसायामुळे व पुणे देशातील महत्त्वाचे शहर असल्यामुळे पत्रकार, छायाचित्रकार म्हणून माझे बस्तान चांगले बसले. पं.नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लॉर्ड माऊंटबॅटन वगैरेंसारख्या फार मोठ्या नेत्यांच्याजवळ जाण्याचा योग येऊ लागला.
द्विभाषिक मुंबई प्रांत असताना पहिल्या व दुस-या पंचवार्षिक योजनांनी फार मोठी गती घेतली होती. आमदारांना या योजना दाखवाव्यात असे ठरले आणि त्यानुसार गुजराथचे आमदार कोयना पाहावयाला आले होते. प्रसिद्धी खात्याने माझ्याकडे त्यांच्याबरोबर जाण्याचे काम सोपविले.
कोयना पाहून आम्ही क-हाडला आलो आणि एका आमदाराला तेव्हाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे घर तेथे आहे याची आठवण झाली. मला त्याने ते घर दाखवावे ही विनंती केली. आणि मग त्याच्याबरोबर सारेच तयार झाले. त्यामध्ये नंतर गुजरातचे मुख्यमंत्री झालेले हितेंद्र देसाई हे ही असावेत असे वाटते. मला त्यांची विनंती नाकारता येईना, त्यांना ‘थांबा’ असे सांगून एका जीपने मी यशवंतरावांच्या घरी गेलो. घर जुनेच होते. शिवाय घरी फक्त त्यांची वृद्ध माता विठाबाई होत्या. दुसरे कोणीच नव्हते.
मी जाताच सारे शेजारी जमा झाले. त्यांना मी कशासाठी आलो आहे हे सांगताच ते सारे आनंदाने ‘घेऊन या आमदारांना’ असे म्हणाले. मी परत जाऊन बसमधून सा-यांना आणले. त्यांनी घर पाहिले. माता विठाबाईचे दर्शन घेतले. त्या गहिवरून गेल्या. आपला मुलगा केवढा मोठा झाला आहे याची कल्पना त्यांना होतीच. मी घेतलेले भावपूर्ण फोटो पुढे यशवंतरावांना मुंबईत दाखवले. तेव्हा दूरगावी असलेल्या आईच्या आठवणीने ते एकदम भारावून गेले. गद्गद्लेल्या आवाजात ते मला म्हणाले, ‘‘बाळ, पाहिजे ते पैसे माग व हे फोटो मला दे.’’
मी पैसे घेण्याचे नाकारताच ते दु:खी झाले. दुस-याच्या कष्टाचा मोबदला दिलाच पाहिजे ही त्यांची भावना दृढ होती. मला मात्र ती उमजत नव्हती. त्यांचे खाजगी चिटणीस श्री.श्रीपाद डोंगरे शंभराच्या दोन नोटा घेऊन पुढे आले आणि त्यांनी ते पैसे मला घ्यावयाला लावून मगच फोटो ठेवून घेतले.
पानशेत धरण फुटल्यावर ते पाणी माझ्या डेक्कन जिमखान्यावरील स्टुडिओत शिरून माझी अतोनात नुकसानी झाली. पानशेतनी केलेली नुकसानी पाहण्यास पुढे त्या वेळचे पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू आले होते. त्या वेळी यशवंतरावांनी रस्त्यावर त्यांची गाडी थांबवून माझी झालेली नुकसानी त्यांना सांगितली आणि पंडितजींनीही जेव्हा माझ्याबद्दल आपुलकीचे ‘बाळ फोटोग्राफर’ हे उद्गार काढले तेव्हा झालेला विध्वंस क्षुद्र वाटला. राज्याचा मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान आपल्या पाठीशी उभे आहेत या जाणिवेने ताठपणे उभा राहून पुन्हा कामाला लागलो.