१२४. आई आणि पूजा – गजानन शं. खोले
साहेबांचे डोळे पाणावले. डोळ्याला त्यांनी रूमाल लावला, डोळे टिपले आणि म्हणाले, ‘‘आईच्या आठवणी सांगणं ही एक पूजाच आहे.’’
एक रेसकोर्स रोड, नवी दिल्ली या साहेबांच्या बंगल्यातील आठ वर्षांपूर्वी घडलेला हा प्रसंग आहे. त्या दिवशी पौर्णिमा होती. टिपूर चांदणं पडलं होतं. रात्रीचे बारा वाजून गेले होते. बंगल्यातील वरील दिवाणखान्यात साहेब, सौ.वेणूताई आणि मी आम्ही तिघेच होतो. त्या वेळी साहेबांच्या तोंडून अगदी सहजपणाने बाहेर पडलेले वाक्य आहे, ‘‘आईच्या आठवणी सांगणे ही एक पूजाच आहे.’’
वैधव्य आल्यानंतर प्रतिकूल परिस्थिती आणि गरिबी यांच्याशी मुकाबला करून ज्या मातांनी आपल्या मुलांना कर्तृत्वसंपन्न केलं, अशा मातांच्या जीवनगाथांवर मी ‘‘सात्विक समर्थ’’ या मासिकात लेखमाला लिहीत होतो. ग. दि.माडगूळकरांच्या मातोश्री बनूबाई-बिस्किटवाल्या आई सीताबाई साठे-पेपकोच्या जननी माईसाहेब पारखे, डॉ.खैर यांची माता बगूबाई-वेदप्रेमी जानकी आक्का घैसास वगैरे मातांवर माझे लेख प्रसिद्ध झाले होते.
श्री.यशवंतरावजी चव्हाण यांच्या मातोश्री विठाई यांच्यावरही अशाच स्वरूपाचा लेख लिहिण्याचे मी ठरवले. पुण्याच्या दैनिक ‘सकाळ’ चा मी वार्ताहर असल्याने साहेबांचा आणि माझा चांगला परिचय होता. दिल्लीहून ते पुण्याला आले होते. तेव्हा सर्कीट हाऊसवर जाऊन मी त्यांची या संदर्भात भेट घेतली. माझ्या विनंतीला त्यांनी बिलकूल आढेवेढे घेतले नाहीत, लागलीच ती मान्य केली व मला म्हणाले, ‘‘या विषयासाठी निवांत अशीच वेळ पाहिजे, तुम्ही रात्री दहा वाजता या.’’
त्यानुसार मोठ्या आनंदानं रात्री दहा वाजता मी सर्कीट हाऊसवर गेलो. गावातील कार्यक्रम संपवून साहेब नुकतेच सर्कीट हाऊसवर आले होते. हॉलमध्ये मी गेलो, क-हाड भागातील साठ सत्तर कार्यकर्ते तिथे बसले होते. तेवढ्यात आतून साहेब आले आणि सर्वांकडे पाहात स्मितहास्य करीत समोरच्या कोचावर बसले.
मी त्यांच्या समोरच बसलो होतो. मला त्यांनी हाताच्या खुणेने जवळ बोलावून घेतले आणि कोचावरच स्वत:च्या जवळ बसवून घेत अगदी हळू आवाजात म्हणाले, ‘‘खोले, सॉरी हं ! ही मंडळी गावाकडून अचानक आली आहेत. तास दीड तास तरी यांच्याशीच गप्पागोष्टी करण्यात जाईल. पंधरा दिवसांनी मी परत पुण्याला येणार आहे, तेव्हा आपण बसू या.’’ हे ऐकताच माझा चेहरा स्वाभाविकपणे काहीसा उदास झाला, ते त्यांना जाणवले असावे. माझ्या पाठीवर हात फिरवीत मला म्हणाले, ‘‘पंधरा दिवसांनी नक्की बसू या.’’ तेव्हा काहीशा खट्टू मनाने मी घरी परत आलो.
पंधरा दिवसांनी साहेब पुन्हा पुण्यास आले, त्यांना मी भेटलो, पुन्हा त्यांनी रात्री दहाची वेळ दिली. त्यानुसार सर्कीट हाऊसवर रात्री दहा वाजता मी गेलो, पहातो तो मागलाच प्रकार ! पुणे जिल्ह्यातील तीस-चाळीस कार्यकर्ते तेथे येऊन बसले होते. पुन्हा साहेबांनी मला जवळ बोलावून घेतले आणि मी परत नाराज होऊनच परतलो. असे आणखीही पुण्यात एकदोन वेळा झाले. हेतुपुरस्सर हे करीत नव्हते. पण आईच्या आठवणी सांगायला त्यांना मनापासून निवांत वेळ हवी होती, आणि ती पुण्यात मिळू शकली नव्हती. प्रभूला भक्तीचे वंदन, तसे कार्यकर्त्याच्या प्रेममय पडणा-या वर्तुळातून साहेब सुटू शकत नव्हते.
या सुमारास पुणे जिल्ह्याचे नेते अण्णासाहेब मगर लोकसभेवर निवडून गेलेले होते-खासदार झालेले होते. माझा आणि त्यांचा स्नेह होता. आमच्या घरी ते येत असत. असेच ते घरी आले असताना विठाईच्या लेखाबाबत पुण्यात घडलेली हकिकत मी सहज त्यांना सांगितली. ते मला म्हणाले, ‘‘दिल्ली, ही काही इंग्लंड अमेरिकेत नाही, तुम्ही याकरता दिल्लीला जा. साहेबांना पत्र पाठवा, दिवस आणि वेळ मागून घ्या. पुण्यात साहेब केव्हाही आले तरी कार्यकर्त्याचे मोहोळ त्यांच्याभोवती राहणारच.’’