११६. यशवंतराव चव्हाण आणि पत्रकार – श्री. कमलाकर कर्णिक
यशवंतरावांचे आजवरचे राजकारण, त्यांनी घेतलेल्या भूमिका यांचा ऊहापोह आजवर झाला असा तो पुढेही होईल. परंतु त्यांनी केलेला राजकारणप्रवेश हा विशेष संस्काराचा होता. विविध ज्ञानाच्या व्यासंगाने त्यांनी आपल्या मनांची मशागत केली होती. आधुनिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक विचारांचा मागोवा घेतल्यामुळे गांधीवादी कर्मकांडात यशवंतराव फारसे सापडले नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या क्रांतिकार्याचे महत्त्व त्यांना कमी वाटले नाही. स्वातंत्र्याबरोबरच यशवंतरावांचा प्रवास दीर्घकाळ सत्ताधारी या नात्याने महाराष्ट्राला परिचित होता. अशा या चौफेर टोलेबाजी करणा-या मुत्सद्दी राजकारणी यशवंतरावांचे आणि पत्रकारांचे संबंध अतिशय स्नेहाचे आणि सौहार्दाचे होते. हा एक त्यांच्या स्वभावाचा विशेष गुण होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या ऐन रणधुमाळीतही त्यांनी पत्रकारांशी अत्यंत सहकार्याचे संबंध ठेवले होते. विशेषत: यशवंतरावांच्या स्वभाववैशिष्ट्यामुळे सनदशीरतेच्या मर्यादा ओलांडल्या गेल्या नाहीत. तसे पाहिले तर, त्या वेळी देशातील सर्वांत तरूण मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. ते खरोखरच किमयागार ठरले. पोलिसांना शस्त्रे म्यान करून ठेवावयास सांगून त्यांनी जनतेतील असंतोषास युक्तीने तोंड दिले. श्री.चव्हाण यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत त्या वेळी तोंड दिले. कै.आचार्य अत्रे आणि अन्य पत्रकारांच्या जळजळीत लेखणीचा बॉम्ब गोळ्यांसारख्या लिखाणामुळे ते दु:खीकष्टी होत, परंतु त्यांनी आपल्या त्या कठीण काळात कुणाही पत्रकाराला उणेदुणे तर नाहीच उलट सौम्य आणि चोखंदळ मृदू शब्दांनी जिंकले. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर श्री.चव्हाण यांच्या कर्तबगारीस खरा बहर आला. या राज्याची सर्वोत्तम प्रगती करण्याचे प्रयत्न अक्षरश: विद्युत गतीने सुरू झाले. महाराष्ट्राचे ते अवघे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. परंतु या अल्पावधीत त्यांनी जेवढे निर्णय घेतले त्यांत त्यांना बहुसंख्य पत्रकारांनी साथ दिली. एवढेच नव्हे तर, सारा विरोध त्यांनी जिंकला होता. विकासाच्या दिशेने त्यांची घोडदौड सुरू झाली होती. पत्रकारांच्या अनेक अडचणी सोडविण्यास त्यांनी मदत केली होती. विशेषत: पत्रकारांच्या व साहित्यिकांच्या घराच्या समस्या त्यांनी शासकीय पातळीवरून सोडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला होता. महाराष्ट्रात असताना किंवा दिल्लीत गेल्यावर त्यांच्या या स्वभावात कधी फरक पडला नाही. निदान महाराष्ट्रातील कुठल्याही ठिकाणाच्या पत्रकाराचा तसा अनुभव खासच नाही. यशवंतरावांचा दरवाजा त्यास मोकळा असे. अर्थात प्रत्येकाच्या मनासारखे होणे कदापिही शक्य नाही. पण आपले मनोगत यशवंतरावांच्या कानावर घातले यातच अनेकांना मानसिक समाधान वाटत असे. लोकांच्या अडचणी अनेक असतात. त्यांना यशवंतराव आधुनिक काळातले धन्वंतरी वाटत हे मात्र खरे. किंबहुना यशवंतरावांनी स्वत:च आपल्या स्वभावाविषयी लिहिले आहे की, माझा एक स्वतंत्र स्वभाव आहे, मिळते घेऊन पुढे जाण्याचा व नेण्याचा. मुद्दाम दु:ख द्यावे, कोणाचा अपमान करावा हे माझ्या स्वभावात नाही. कोणी अवमान केला तरी, त्यासाठी उगाच शत्रुत्व करावे असे वाटत नाही. कटुता न ठेवणे आणि कटुता नसणारे वातावरण वाढविणे हा माझा स्वभावधर्म आहे. याच अर्थाने त्यांनी टिंगल टवाळी करणा-या साहित्यिक आणि पत्रकारांना सुद्धा सन्मानाने वागविले. मराठी भाषा तशी दणकट, काहीशी रांगडी पण ती मृदू मुलायम होऊ शकते हे महाराष्ट्रात आधुनिक काळात यशवंतरावांनी आपल्या उक्तीने आणि कृतीने सिद्ध केले आहे. साहित्य-संस्कृतीला वाव मिळावा; नव्या शास्त्रीय विचारांचा प्रसार व्हावा ही द्रष्टेपणाची भूमिका त्यांची होती. महाराष्ट्र राज्याची स्थापना ही मराठी मनाची स्वाभाविक सहज सुलभ प्रक्रिया होती. याचे स्वागत कुसुमाग्रजांनी आपल्या काव्य पंक्तीत केले आहे. ‘‘नव्या जीवनाचा नाद मला ऐकू येत आहे.’’ दै.केसरीचे माजी संपादक श्री.जयंतराव टिळकांना काँग्रेसमध्ये आणण्यात यशवंतरावांचा फार मोठा भाग होता. यात पत्रकारालासुद्धा आपल्या ध्येयधोरणात स्थान आहे, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केले आहे. पत्रकारसुद्धा समाजजीवनाचा महत्त्वाचा दुवा आणि धागा आहे, याची खूणगाठ त्यांनी मनात बाळगली होती.
प्रशासक हा शिस्तीचा असला तरी तो हृदयशून्यच असावा असा काही सामाजिक अथवा राजकीय मानदंड नाही हे यशवंतरावांनी आपल्या कृतीशील उदाहरणाने दाखविले आहे. पत्रकारांच्या हक्कावर त्यांनी कधीच आक्रमण केले नाही किंवा पत्रकारांना कुत्रे आदी शेलकी विशेषणे वापरली नाहीत. उलट त्यांच्या टीकेचे स्वागत करून आपल्या शासकीय धोरणात योग्य ते बदल घडवून आणण्यास त्याचा उपयोग करून घेतला. याचा इष्ट तो परिणाम त्यांनी शहरी आणि ग्रामीण या दोन्ही समाजाची पकड घेऊन आपला प्रभाव पाडला. यात ते पत्रकारांचा सिंहाचा वाटा असल्याचे मान्य करीत असत. त्यांच्याकडून मित्र-पत्रकारांच्या अपेक्षा होत्या त्या त्यांनी पु-या केल्या असे नव्हे, त्यामुळे वादाचे प्रसंग आले. पण हाही एक मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पण त्यातूनही त्यांनी देण्याघेण्याच्या विचारापलीकडे आपले वर्तन ठेवले. आज मराठी पत्रसृष्टीत डझनवारी पत्रकार असे आहेत की, ज्यांना यशवंतरावांनी आपल्या कृपादृष्टीचा हात देऊन डोंगराएवढे मोठे केले आहे. परिस्थितीच्या रेट्यापुढे त्यांना काही पत्रकारांच्या इच्छा पु-या करता आल्या नाहीत हे जरी खरे असले तरी, आपल्या जीवनात इतके सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व असलेला नेता यापुढे होणे शक्य नाही.