• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ५५-२

मराठी भाषा ही जिवंत भाषा आहे. ती उसासारखी वाढली पाहिजे, असे यशवंतराव म्हणत. जमिनीतली सत्त्वे आणि शक्ती शोषून ऊस वाढतो तसे मनातले सत्त्व आणि विचारातली शक्ती खेचून भाषा जोम पावते.

यशवंतरावांनी आपली मराठी अशीच जोपासली होती, वाढविली होती. त्यांचे बोलणे सतत ऐकत राहावे असे वाटे, झरा वाहात राहावा झुळझुळ असे वाटते ना तसेच ! ते भाषेला उगीचच नटवीत नसत. पण उत्तराला प्रत्युत्तर देण्यात अडतही नसत. एकदा एका व्यापा-यासोबत ते जेवत होते. व्यापारी शाकाहारी निघाला. जेवण मांसाहारी होते. त्यामुळे योजकांची थोडी धावपळ झाली. जेवताना व्यापारी म्हणाला, ‘‘जगातील सर्व शक्तिमान प्राणी शाकाहारी आहेत.‘‘ यशवंतरावांनी पुष्टी जोडली, ‘‘होय, जगातील सर्व उपयुक्त प्राणी शाकाहारी आहेत.’’ टेबलावर हशा पिकला. व्यापारी पुन: म्हणला, ‘‘हे सर्व प्राणी शक्तिमान आहेत कारण ते शाकाहारी आहेत.’’ तेव्हा हेका न सोडणा-या त्या व्यापा-यावर लीलया मात करीत यशवंतराव म्हणाले, ‘‘म्हणूनच त्यांच्यावर स्वार होणे सोपे आहे.’’ यशवंतराव बोलण्यात आपल्यावर केव्हाच स्वार होऊन बसलेत हे त्या स्वारीच्या ध्यानात येताच तो लाजला हे सांगणे न लगे.

यशवंतरावांच्या ज्वलंत आणि अनुभवी विचारांचे वाहन झालेली मायबोली कशी सरळ पण प्रभावशाली होती ह्याचे हे काही नमुने पाहावेत. ‘‘आपल्याला कदाचित कल्पना असेल की, कामाची व्याप्ती जितकी जास्त तितकी त्याची खोली कमी असते. निसर्गाचाच नियम आहे हा.’’ भावनांना व्यक्तीच्या जीवनात जितके महत्त्व असते तितके ते संस्थेच्या जीवनातही असते असे मात्र नाही. संस्थेच्या जीवनात भावनेपेक्षा कार्यालाच अधिक महत्त्व असते. ‘‘वर्तमानकाळ समजण्यासाठी इतिहासाचे सतत चिंतन करावे लागते. कारण वर्तमानकाळाशी झगडणा-या माणसाला भूतकाळ समजण्याची जर आवश्यकता नसेल तर वर्तमानकाळाशी तो फारसा झगडू शकणार नाही.’’ ‘‘कोणाही कार्यकर्ताने आंधळे असू नये, आंधळा दुनियेत हिंडू शकेल पण आंधळ्यांच्या मागे दुनिया जाऊ शकत नाही.’’

तेव्हा दिसेल की, यशवंतरावांच्या भाषेला तोल आणि ताल आहे, विचारांची जाण आणि अभिव्यक्तीचा जोम आहे. समाजहिताची सम सतत साधीत ती अखंड भारत आणि एकरूप भारताची बलशाली धु्रपद सदा आळवीत आहे. तिच्यात केवळ नादमाधुर्य नाही, केवळ शब्दलालित्य नाही, तर त्या आपोआप जुळणा-या मधुर शब्दामागे एकेक नवा सामथ्र्यवान संदेश देणारे मन आणि विचार आहे आणि म्हणूनच यशवंतराव हे पिंडाने कवी आहेत. कारण त्यांनी कवीची ही अशीच व्याख्या केलेली आहे. त्या ‘‘कवीला’’ माझे शतश: प्रणाम.