• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ९०-१

त्याच दिवशी संध्याकाळच्या विराट सभेत पंडितजींनी पुढे ‘औरंगाबादची घोषणा’ म्हणून प्रसिद्ध झाले ते भाषण केले. प्रकृती बरी नसल्याने साहेब त्या सभेत नव्हते पण दुसरे दिवशी सकाळीच संभाषणाची टेप आम्ही त्यांना ऐकवली. ‘मराठी लोकांना महाराष्ट्र राज्य व्हावे असे खरेच वाटत असेल तर महाराष्ट्र होईलही’ अशी पंडितजींनी त्या सभेत घोषणा केली होती. ते ऐकून मात्र साहेब एकदम प्रसन्न चित्त झाल्याचे दिसले व पडल्यापडल्याच आता तुम्ही तुमच्या महाराष्ट्राच्या संदर्भात कामाची आखणी करायला लागा असे आम्हा सर्वांना सांगू लागले. महाराष्ट्र राज्य निर्माण होण्यास त्यानंतर तब्बल तीन वर्षे लागली पण ती घटना लवकरच घडेल असे आशावादी वातावरण मात्र औरंगाबादच्या या घोषणेनंतर निर्माण होत गेले हे खरे आहे.

ग्रामीण विकासासाठी जिल्ह्यात एक सरकार नियुक्त मंडळ बनवायचे होते त्यासाठी आम्ही काही प्रस्ताव पाठविले होते. त्यासंबंधी एका भेटीत आपणहून म्हणाले की, सर्व प्रस्ताव चांगले आहेत व सरकार ते जसेच्या तसे मंजूर करणार आहे. उपाध्यक्षांच्या बाबतीत मात्र दैनंदिन येणा-या कारभाराच्या अडचणीचा तुम्ही विचार केलेला दिसत नाही म्हणून तो प्रस्ताव मात्र सरकार स्वीकारणार नाही. एवढे स्पष्टीकरण साहेब स्वत: माझ्यासारख्या एका ज्युनियर अधिका-यास देत आहेत याचे मला तेव्हा फार हायसे वाटले.

ग्रामीण विकासासाठीही एक विभागीय मंडळ बनवले होते व श्री. बाबासाहेब सावतेकरांची त्या मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून नेमणूक झाली होती. त्या वेळी ते मराठवाडा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही होते. त्या मंडळाच्या कार्याच्या उद्घाटनासाठी श्री. यशवंतरावजी आले होते. मराठवाड्यासाठी स्वत:ची हाडे उगाळून लावली तरी त्याची दखलही कुणी घेणार नाही असे साहेब कुणाजवळ तरी बोलल्याचे मी ऐकले होते. असे साहेबांना वाटणे योग्य होणार नाही असे मी आदले दिवशी श्री. सावतेकरांकडे बोललो होतो. त्यानाही त्या वेळी तसेच वाटले असावे, म्हणून समारंभाच्या स्वागताच्या भाषणात त्यांनी साहेबांच्या कर्तृत्वाची व थोड्या काळात केलेल्या भरीव कार्याची तोंड भरून स्तुती केली. समारंभ संपवून सुभेदारीस परत जाताना साहेबांनी विचारले की, आज बाबासाहेबांनी कधी नव्हे असा नवाच सूर कसा लावला होता? मी म्हणालो की, साहेब, आता परभणी सोडून औरंगाबादला आले आहेत. एवढे ऐकून साहेब मात्र मोकळेपणाने हासत राहिले. परस्परांच्या मनात काय आहे ते आम्हा दोघांनाही कळले होते. अन् लहानसे का असेना चांगले काम कुणी केले तर त्याचे कौतुक करायचेच असे साहेबांचे नेहमीचेच वागणे होते.

१९५८ साली मराठवाडा विद्यापीठ स्थापन झाले तेव्हा मराठवाड्यात केवळ पाच सहाच महाविद्यालये होती. नवे विद्यापीठ स्थापन करायला द्विभाषिक राज्याचे शिक्षण मंत्री व अन्य काही मंत्रांचा विरोध होता, पण श्री. यशवंतरावजींनी मराठवाड्यातील शैक्षणिक मागासलेपणा दूर करण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ आवश्यक असल्याचे आग्रहाने सांगितले व विद्यापीठ कायम केले. नव्या विद्यापीठासाठी आम्ही स्थानिक अधिका-यानी ५।६ शे एकर जागा निवडली होती ती (मी औरंगाबादेस तेव्हा जिल्हाधिकारी होतो ) त्यांना बघावीशी वाटली म्हणून त्या परिसरात हिंडत असताना मी त्यांना विचारले की या विद्यापीठाचे जन्मदाते व सांभाळकर्ते असे आपले नित्याचे स्थान आहे असे मराठवाड्यातील लोक म्हणतात ते आपल्या कानावर असेलच, तर ते म्हणाले की हे बघा, मला या विद्यापीठाचा खरा मित्र म्हणून समजलात तरी पुरे आहे.