• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ४६-२

मला काहीच कळेना. साहेब गोरेमोरे का झाले ? शेजारी ह. रा. महाजनींना चपापून मी प्रश्न केला. त्यांनी मला "आभाराचे भाषण ऐक" अशी खूण केली.

वेणूताई आणि साहेब उभयतांना माझ्या भाषणाचा असा परिणाम भोगावा लागला या विस्मयात मी चूर झालो. कुणाला विचारावे तर कुणी सांगेना ! आणि मी काय बोललो ते मलाच आठवेना.

टळटळीत दुपारी पुसदपासून जवळच असलेल्या वसंतरावजींच्या गहुली येथील बागेत सन्मान्य पाहुण्यांचा भोजनसमारंभ होता. सामिष आणि निरामिष या भोजनाची सोय होती. टेबलाच्या एका बाजूला सामिष आणि दुस-या बाजूला निरामिष पंगत बसली. खाण्यात मन घालता येईल इतके माझे मन ठिकाण्यावर नव्हते.

अगदी समोरच्याच पंगतीत माझ्यासमोर वेणूताई आणि साहेब बसले आणि मी पोचताच दोघांनीही हसून माझे स्वागत केले. हा दुसरा धक्का ! स्टेजवर गोरेमोरे होण्यात काही मुत्सद्देगिरी असेल काय, अशी क्षुद्र शंका ! पण तिचा परिणाम माझ्या मनावर होण्याअगोदर साहेब व वेणूताई वसंतरावांना उद्देशून म्हणाले, "वामनरावांचे गोष्टी सांगण्याचे, सामर्थ्य अद्भुत आहे ! तुला तर त्यांनी रडवलेच पण माझीही पंचाईत होऊन बसली ! वामनराव त्यावेळी मी तुमच्याशी हात मिळवणार होतो. ते जमले नाही. आता मात्र हात मिळवतो आणि शाब्बास म्हणतो !"

वसंतराव अभिमानाने म्हणाले, "दुपारी दोन वाजता उपाशी श्रोत्यांना पकडून खिळवून ठेवणे गंमत नव्हे?" आणि मग मात्र अशी भूक भडकली की, मला किती वाढले अन् मी किती खाल्ले, हा हिशेब उरला नाही. हे अद्भुत सामर्थ्य कोणते हे मला आठवेना. कारण सभेत बोलताना किस्सेबाजी ही माझी फार जुनी खोड. शब्दापेक्षा चित्र जिवाला अधिक भिडते ही श्रद्धा. माझ्या आईबद्दल मी बोललो. त्याच गोष्टीने साहेब गहिवरले असावेत ! कारण त्यांची मातृभक्ती मला ठाऊक होती. ते सगळे चित्र माझ्या डोळ्यासमोर तरंगत राहिले. ते शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न.

अध्यक्षीय भाषणाचा माझा विषय "मराठीचा वाचक दिवसेंदिवस कमी होत आहे" हा होता. त्याच्या अनेक कारणांपैकी मराठी भाषेचे आणि जीवनाचे कौतुकापोटी झालेले इंग्रजीकरण, हे होते त्यामुळे सामान्य मराठी समाज कसा बुचकळ्यात पडला आहे, हे स्पष्ट करण्यासाठी माझ्या आईचा दृष्टान्त मी दिला.

माझ्या घरची अशाच एक दुपार .... पत्नी कामावर गेलेली, मुले-मुली शाळा –कॉलेजात. घरी मी एकटा अन् माझी आई ! आई आमच्यात खातपीत नसे. तिची सगळी व्यवस्था तिच्या सोवळ्यानिशी वेगळी होती. तिची देवपूजा, दीडबुटलीचा स्वयंपाक आणि जेवणही आटोपले होते. जेवणाच्या टेबलावर ताटात सगळे पदार्थ वाढून मी जेवत होतो. मी कसा जेवतो, जेवतो की नाही हे पाहण्याची आईची खोड ! ती अशी यायची, हसत हसत उभी राहायची एखाद दुसरा शब्द टाकून आमच्या कामाला लागायची.

आणि पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची अशीच एक नेहमीसारखी कामसू दुपार... मी चार दोन घास घेतले होते.  आई आली. माझ्याकडे तिने बघितले. मीही हसून तिच्याकडे पाहिले. परतताना ती आपल्या खोलीकडे न जाता समोर दारी गेली, घरी कोणी आहे की काय, असा कानोसा तिने घेतला. मी नवल करीत असतानाच मी माझ्याजवळ येऊन उभी राहिली.

"का गे आई, तुझं जेवण अजून झालं नाही? माझ्याशी काही काम आहे का?"

"नाही रे, येरीच उभी आहे मी."

"नाही आई, असं तू कधी करत नाहीस. तुला काहीतरी बोलायचं आहे, काहीतरी सांगायचं आहे, तू बाहेर कानोसा घेऊन आलीस. घरी कुणीच नाही. आई तू आणि मी दोघेच. हाच तुझा "माणकोजी बोधला!" काही बिनसलं आहे का?"