अश्रूत बुडालेले हळवेपण
आमच्या खोलीतून बाहेर आलो की बैठकीची खोली. कधीही बाहेर यावं—साहेब कोचावर बसून वाट बघत असायचे.
‘‘या माधवी.’’ शेजारच्या कोचाकडे हात दाखवून म्हणायचे आणि सरीवर सरी कोसळाव्यात तसे वेणूतार्इंच्या आठवणीत हरवून जायचे. डोळ्यातून धारा लागलेल्या असायच्या. प्रत्येक खोलीत तार्इंचा चार हार घातलेला फोटो, समया जळत असायच्या. ते घर एक मंदिर बनलेलं होतं. दु:खाबद्दल माझा अनुभव असा आहे, दु:ख जितकं कुरवाळाल तेवढं ते जास्त वरचढ होतं. माणसाला हतबल करून टाकतं. सतत दिड वर्ष ते या दु:खातच गुरफटून गेले होते. त्यांना बाहेर कसं काढायचं? एक दिवशी धीर करून मी म्हणाले, ‘‘साहेब, प्रत्येक स्त्रीला वाटतं, की नव-याच्या आधी आपण जावं. ताई आधी गेल्या हेच बरोबर नव्हे का? हेच उलट झालं असतं तर त्यांना सोसवलं नसतं. अनेक संकटांना त्यांना तोंड देता आलं नसतं.’’ हसून ते म्हणाले, ‘‘तर्काच्या दृष्टीनं बरोबर आहे. मला समजतं. हळवेपणा सोडून दिला पाहिजे. प्रयत्न करतो आहे. पण जमत नाही.’’
मी म्हणाले, ‘‘तुम्ही कोवाडला आला होता ना ? त्यापूर्वी फक्त अठरा दिवसच आधी माझा मोठा भाऊ गेला होता. माझ्या जखमेवर घट्ट पट्टी बांधून मी सर्व कार्यक्रम पार पाडला. तुम्ही माझं कौतुक केलंत. माझ्या भाषणाचं, माझ्या कवितेचं, माझ्या समाजकार्याचं सोनं झालं. तुम्ही येऊन गेलात आणि खरंच माझ्या दु:खावर उतारा देऊन गेलात. स्वत: इतकं दु:खी असून आमचं दु:ख तुम्ही झेलताय. ’’
ते म्हणाले, ‘‘स्त्रीला मुळातच सहनशक्ती असते. पुरुष दिसतो कणखर, पण मुळांत दुबळा असतो. तुमचा गेलेला भाऊ माझ्या जागी बघायला शिका, तुमचं दु:ख आपोआप कमी होईल.’’
नवीन जाणीवांचे देणे
सकाळी ६।। ते ८ व संध्याकाळी ६।। ते ८ ते हिरवळीजवळच्या सिमेंटच्या छोट्या पायवाटेवरून फे-या घालत.
‘‘कुणीतरी सोबत असलं की फिरणं सोपं वाटतं’’ हे ऐकलं आणि सकाळी—संध्याकाळी त्यांना सोबत करण्याचं मी ठरवलं. ते सहा दिवस माझ्या जीवनाला अनेक वळणं देऊन गेले. नवीन जाणीव घेऊन मी स्वत: खूप शिकत होते. वेगळी दृष्टी घेऊन स्वत: बदलत होते.
‘‘साहेब, राजकारणात तुम्ही लोक भांडता, परत एक होता, खरंच मागचं वैर विसरता का?’’
‘‘साहेब, नको असलेला उमेदवार उभा असेल तर खरंच मत कुणाला द्यावं? मत द्यावं की वाया घालवावं?’’
एक ना अनेक बालीश प्रश्न मी विचारायची. नेहमीप्रमाणे हसायचे. म्हणायचे ‘‘फार चांगला प्रश्न विचारलात’’ ‘‘भालजींनी स्टुडिओ सोडला? अगदी भालजींचीच स्टाईल आहे ही.’’
‘‘सुलोचनाबार्इंचा अभिनय, काशिनाथ घाणेकरांचा संभाजी, लताबाईंचा आवाज, नरहर कुरूंदकरांची बुध्दिमत्ता, कुमार गंधर्वांचं गाणं, रणजित देसार्इंचे ‘राधेय’ एक ना अनेक विषय त्या सा-या दिवसांतून उजळून निघाले; एक अतूट धागा विणला जात होता. कलावंतांवर, साहित्यिकांवर, माणसावर, माझ्यासारख्या सामान्य स्त्रीवर जिवापाड हळवेपणाने प्रेम करणारे साहेब अचानक गेले. आभाळाला प्रचंड खिंडार पडलंय. जाणवतेय फक्त पोकळी—
प्रोत्साहन द्यायची वृत्ती दिल्लीला जाताना रिकाम्या हातानं कसं जायचं? मी खादीचे नॅपकिन्स आणून त्यावर रेशमानं भरतकाम केलं होतं, चष्म्यासाठी खादीचं कव्हर करून, त्यावर भरतकाम केलं होतं, मफलर विणला होता. देताना संकोचानं विचारलं होतं,
‘‘आपण वापराल का?’’
नेहमीप्रमाणे नुसते हास्य, ‘‘फार त्रास घेतलेत माधवी.’’ आणि दररोज त्यातलं एक नॅपकिन हातांत असे. चष्मा कव्हरमध्ये कधीच जाऊन बसला होता. साध्या साध्या गोष्टीतून दुस-या माणसाला ते जपत असत. स्वत: समाजासाठी इतके झिजले. देशासाठी सारं जीवन वाहिलं. पण माझं एवढंस कोवाडमधलं काम ते केवढं? पण त्यांनी त्याचं फार कौतुक केलं. ‘सह्याद्रीचे वारे’ हा त्यांच्या भाषणांचा संग्रह वाचावा. महाराष्ट्रावरचं त्यांचं प्रेम, त्यांच्या विचाराची नस त्या भाषणातून सापडते. प्रचंड वाचन, प्रचंड विचारक्षमता, अंतर्मुख होऊन स्वत:ला पडताळून बघण्याची सवय ही फार क्वचित सापडते. इतकं असून गर्व नाही. दुस-याचे गुण जाणून त्यांना ते प्रोत्साहन देत. इतकं कौतुक करायचे की आत्मविश्वास जागा व्हावा. माझं कोवाडचं भाषण, माझ्या कविता यांचं अपार कौतुक केलं. खरंच माझा आत्मविश्वास दुणावला होता.
‘‘माधवी, तुमची महत्त्वाकांक्षा काय आहे? कोण व्हावं असं वाटतं तुम्हांला? इंदिराजी?’’
‘‘मला मदर तेरेसा व्हायचंय’’ मी चटकन म्हणाले, आश्चर्यचकित होऊन ते म्हणाले, ‘‘तसं साधलं तर फार उदात्त जीवन जगता येईल. तुम्हाला ते जमेल.’’