• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १५४-१

राजकारणाच्या धबडग्यात यशवंतरावांनी आपले हे हळवे साहित्यिक मन अगदी प्रयत्नपूर्वक जपले. जिथे, जेव्हा आणि जितका वेळ मोकळा मिळाला, तितका त्यांनी तो साहित्याच्या आस्वादासाठीच खर्च केला. त्यांच्या दिल्लीच्या व मुंबईच्या निवासस्थानाला भेट देणा-या कोणाही रसिक व्यक्तीला, त्यांच्या ग्रंथसंग्रहाचे थक्क करणारे दर्शन घडे. इतर राजकीय नेत्यांच्या घरात ग्रंथ नसतात असे नव्हे. पण ते बहुधा संग्रहासाठीच असतात. त्यातले किती त्यांनी वाचलेले असतात कोण जाणे. गांधी-बुद्धाच्या पुतळ्यासारखेच शोभेच्या वस्तूचे स्थान ग्रंथानांही दिलेले असते. यशवंतराव याला अपवाद होते. त्यांच्या संग्रहातील प्रत्येक पुस्तक त्यांनी मन:पूर्वक वाचलेले असे, त्यावर चिंतन केलेले असे. त्यांच्याशी त्या विषयावर बोलणा-यांना याची प्रचिती आल्याशिवाय राहात नसे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील नाना प्रकारची पुस्तके यात होती आणि त्यात नित्य नवी भर पडत होती. राजकीय, आर्थिक, संरक्षणविषयक, सामाजिक प्रश्नावरील चरित्रे, आत्मचरित्रे याबरोबरच गाजलेल्या उत्तमोत्तम ललित कृतीही त्यात होत्या. मराठीतील अनेक नवी पुस्तके त्यांना भेट म्हणून मिळालेली असत, पण बहुसंख्य ग्रंथ त्यांनी विकत घेतलेले होते. भारतात व परदेशात कोठेही गेले तरी यशवंतराव कटाक्षाने एक गोष्ट करीत. तिथल्या ऐतिहासिक स्थळांना द्यावयाच्या भेटीच्या यादीत, नाट्यगृह व ग्रंथालय यांचा समावेश आहे हे पाहात. नाट्यगृहात शक्य तर नाटक पाहात आणि ग्रंथालयात ग्रंथ खरेदी करीत. ज्या ग्रंथाबद्दल ऐकले वा वाचले असेल त्याची चौकशी करीत. अहोरात्र देशाच्या कठीण प्रश्नांची चिंता वाहताना, या माणसाने हे साहित्यप्रेम कसे टिकवले असेल, त्यासाठी किती त्रास घेतला असेल, याची कल्पनाही करता येत नाही.

काव्यानंदाच्या मैफली

साहित्यात इतका रस, तर प्रत्यक्ष साहित्यिकांच्या भेटीत किती असेल? मराठीतल्या अनेक लेखक-कवींना याचा सुखद साक्षात्कार कित्येक वेळा झालेला आहे. ग.दि.माडगूळकर, ना.धो.महानोर हे त्यांच्या आवडत्या कवींपैकी. बैठकातील काव्यानंद, हा अत्तराच्या कुपीसारखा आपण आपल्या स्मरणात जपून ठेवला आहे. दिल्लीच्या धबडग्यातून यशवंतराव महाराष्ट्रात आले की, मूळचे मराठीपण त्यांच्यात संचारे. दिल्लीत अचकन आणि परदेशात सूटबूट घालणारे यशवंतराव विमानाने मुंबईत उतरले की, धोतर, सदरा, जाकीट आणि कोल्हापुरी वहाणा हा त्यांचा पेहराव सुरू होई. त्या वेशात मग पूर्वीसारखेच त्यांचे मराठमोळे दौरे, भेटीगाठी आणि चर्चा सुरू होत. या दौ-यातील सरकारी कार्यक्रमांतूनही वेळात वेळ काढून आपल्या साहित्यिक मित्रांच्या खाजगी भेटी ते आवर्जून घेत. साहित्यिक मित्रही ‘यशवंतराव गावात आहेत’ हे कळले की त्यांच्या भेटीसाठी आसुसलेलेच असत. कोल्हापुरात खांडेकर, पुण्यात ना.सी. फडके, ग.दि. माडगूळकर, मुंबईत तर अनेकजण ठरलेले असत. त्यांच्या कुठल्याही मुक्कामात साहित्यिकांना भेटीला मुक्तद्वार असे. मग ज्या बैठका रंगत त्यात यशवंतराव तासन तास रमून जात, राजकारणाचा शीण तितका वेळ विसरून जात आणि पुन्हा ताजेतवाने होत. माडगूळकरांच्या प्रत्येक भेटीत त्यांच्याकडून आग्रहपूर्वक ‘जोगिया’ ऐकत, तशीच महानोरांकडून त्यांची मळ्यावरची कविता. दिल्लीला गेलेल्या कोणीही साहित्यिकाने केव्हाही यशवंतरावांकडे जावे. आधी कळवले तर ते सरबराईसाठी स्वत: सज्ज असत. चिनी आक्रमणानंतर लडाखच्या सरहद्दीला भेट देण्यासाठी माडगुळकर, पु.भा.भावे व पु.ल.देशपांडे निघाले होते. जाताना यशवंतरावांच्या दिल्लीतील बंगल्यात रात्री गप्पांची मैफल जमली. ‘तिघांच्या प्रतिभाशाली संवादानी सुगंधित झालेली रात्र’ असे तिचे वर्णन यशवंतरावांनी केले आहे. वस्तुत: या तिघांपैकी माडगूळकर सोडल्यास इतर दोघांचे यशवंतरावांशी राजकीय विचारात कधीच जुळण्यासारखे नव्हते. पण ते सहित्यिक संवादाच्या आड आले नाही.

हीच गोष्ट आचार्य अत्रे यांच्या बाबतीत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात व महाराष्ट्र राज्य झाल्यावर विधानसभेतही यशवंतराव व अत्रे परस्परविरोधी भूमिकांत होते. जाहीर सभांतून एकमेकांवर तोफा डागत होते. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या घोषणेला उत्तर देताना एकदा यशवंतराव म्हणाले, ‘‘झाला पाहिजे हे मान्य, पण त्यात ‘च’ कशाला?’’ त्यावर अत्र्यांनी उत्तर दिले, ‘‘च फार महत्वाचा आहे. तुमच्या आडनावतला ‘च’ काढून टाकला तर काय राहील?’’

पण या चकमकी राजकारणापुरत्याच राहिल्या. दोघांच्या साहित्यिक स्नेहात त्याचा कधीही अडथळा आला नाही याचे श्रेय दोघांच्याही जाणकारीला आणि निखळ साहित्यिक दृष्टीला आहे.