• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १३९-१

शिक्षणाचा प्रसार सर्वसामान्य जनतेत स्वस्त व सुलभरीत्या झाला पाहिजे. ज्ञानमंदिराचे दरवाजे सर्वांना खुले असल्याशिवाय सरस्वतीचे खरे दर्शन घडणार नाही. सरस्वतीदेवीच्या दर्शनाशिवाय ख-या माणुसकीचे कमळ उमलणार नाही. महात्मा फुले, महर्षी कर्वे, शाहू महाराज व कर्मवीर भाऊराव पाटील आदी महापुरुषांनी मोठ्या महत्प्रयासाने या ज्ञानमंदिराचे दरवाजे दगड-धोंड्याचे, शेणामातीचे मार खाऊन खाड्खाड् उघडले म्हणूनच या मंदिरात बहुजनसमाज शिरला. पण उंच उंच पाय-या, कठीण टप्पे आडवे असल्यामुळे झपझप, लवकर, चढणे कठीण झाले होते. यशवंतराव आणि बाळासाहेब देसाई यांनी अर्थकठिणाईच्या पाय-या, इमारत अभावाचे टप्पे तोडून-फोडून रु. १२००/- नंतर रु. १८००/- वगैरे उत्पन्नाच्या आतील पालकांच्या मुलामुलींना फी माफ करून सरस्वतीदेवीचे डोळे भरून ‘‘जवळून’’ दर्शन घेण्याची संधी प्राप्त करून दिली. दर्शनक्षणी त्या मातेने गुरे राखणा-या, कुळवातिफणीमागे जाणा-या अशा हजारो मुलामुलींमधून उत्तम डॉक्टर्स, इंजिनिअर्स, प्रोफेसर्स, कलेक्टर्स, मिनिस्टर्स तसेच कायदा घडविणारे एम. एल. ए., एम. पी. आदी लोकप्रतिनिधी तयार केले. त्यांचे सर्वसामान्य समाजाला दान केले एवढेच नव्हे तर त्याच गरीब, श्रमजिवी, शेतकरी, कामगारांच्या गावी, तालुक्यात, जिल्ह्यांत अनुक्रमे ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद देऊन स्वतंत्र स्वराज्य चालविण्यास भरपूर अधिकार व मुबलक पैसा दिला. हे ज्ञानगंगेचे पाचक-पाणी खालपर्यंत पोहोचविण्याचे खरे काम यशवंतराव चव्हाण यांनीच आपल्या सहकारी मित्रांच्या मदतीने केले आहे. या मित्रांत कर्मचा-यांपैकीही काही प्रमुख मंडळी आहेत, त्यात मुख्य म्हणजे त्या वेळचे सोलापूरचे कलेक्टर श्री. झुबेरी व कमिशनर कॅप्टन श्री. एस. पी. मोहिते हे होते. अशा त-हेचा ज्ञानाचा, विकेंद्रित सत्तेचा पर्जन्य महाराष्ट्राशिवाय दिसत नाही.

महाराष्ट्राचा राज्यकारभार भारतात नावलौकिकास येण्यास जी अनेक कारणे आहेत त्यात ना. यशवंतराव यांच्या महाराष्ट्रातील चोख राज्यकारभाराला प्राधान्य दिले पाहिजे.

‘‘स्टडी ग्रुप ऑफ सेफ्टी’’ या दिल्ली सरकारने नेमलेल्या कमिटीचा चेअरमन म्हणून दोन अडीच वर्षे मला भारतभर फिरून काम करण्याची संधी मिळाली होती. आमच्या स्टडी ग्रुपमध्ये तज्ज्ञ, इंजिनिअर्स, आय. जी., बॅरिस्टर वगैरे चांगल्या मंडळींचा समावेश होता. भारत देशातील रस्त्यावर इतर देशांच्या मानाने अपघात जास्त होतात, ते कमी कसे होतील, त्यासंबंधीच्या सूचना गोळा करणे, प्रत्यक्ष रस्ते पाहणे, लोकांशी व अधिका-यांशी चर्चा करणे वगैरेही कामे आम्ही केली. अनुभव असा आला की, महाराष्ट्र राज्याचे पोलिस खाते, पी. डब्ल्यू. डी. खाते आदींचे काम भारतातील इतर सर्व राज्यांपेक्षा पहिल्या प्रतीचे आहे. याचे श्रेय ना. यशवंतराव यांनी मुख्यमंत्री असताना घालून दिलेल्या कार्यपद्धतीला आणि त्यांच्या दक्ष कारभाराला आहे.

ज्या वेळी भारतावर चीनचा हल्ला झाला त्या वेळी दिल्ली सरकारमधील त्या खात्याचे संरक्षणमंत्री आदी संबंधित मंडळी कमी पडली. पंडितजींनी एवढ्या मोठ्या भारतात महाराष्ट्राकडे आशेने पाहून त्यातील सह्याद्री ना. यशवंतराव चव्हाण यांची संरक्षणमंत्री म्हणून निवड केली व परकीयांच्या हल्ल्यास तोंड देऊन देशाचे संरक्षण करण्यास हिमालयाच्या मदतीस बोलाविले. पंडितजींच्या या सन्माननीय आमंत्रणाचा स्वीकार करून महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाच्या मदतीस धावून गेला. श्री. यशवंतराव चव्हाणांनी मोठ्या धैर्याने, शिताफीने युद्धनीतीच्या खेळात पाकिस्तानचा चांगलाच पराभव केला व जगात भारत शांत पण तितकाच बलवान आहे हे सिद्ध करून दाखविले. यशवंतरावांना ज्या महाराष्ट्राने मोठे केले, त्यांचे कौतुक केले, ज्या महाराष्ट्राच्या शौर्यशाली बाण्याने ते देशात अधिक उजळ झाले, त्या महाराष्ट्राची जोपासना, वाढ व प्रगती होऊ देण्यास मोकळ्या मनाने व लोकशाही पद्धतीने ते हातभार लावत आणि महाराष्ट्राचा ज्वलंत अभिमान कार्यकर्त्यात निर्माण व्हावा म्हणून ते सतत प्रयत्नशील असत. असे देवदानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून विष व अमृत उत्पन्न झाले तसे समाजसुधारक व प्रतिगामी (सनातनी) यांच्या महाराष्ट्रमंथनातून अमृतरुपी यशवंतराव चव्हाण उत्पन्न झाले होते.

महाराष्ट्राने टिळक, आगरकर यांच्याशिवाय सर्वसामान्य जनतेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महर्षी शिंदे, शाहू महाराज, भाऊराव पाटील, जेधे, मोरे व यशवंतराव चव्हाण असे मोठमोठे सामाजिक, राजकीय पुढारी तयार केले. तीच टांकसाळ महाराष्ट्राने पुढे चालू ठेवावी असे वातावरण आपण सर्वांनी निर्माण केले पाहिजे. तरच यापुढे महाराष्ट्राची मान आहे त्यापेक्षा अधिक उंचावेल. सामुदायिक हितात वैयक्तिक हित आहे असा विचार महाराष्ट्रात फारच मोठ्या प्रमाणात वाढविला पाहिजे असे त्यांचे मत होते. शेतीप्रधान महाराष्ट्रास शेतीबरोबर कच्च्या शेती मालाचे रूपांतर इतर पक्क्या मालात करण्यासाठी उभ्या करावयाच्या कारखान्याची कल्पना व प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात यशवंतरावांनी चांगलेच यश मिळविले आहे. खेड्यातील आजचे सहकारी साखर कारखाने हे त्यांच्याच विचारांचे आणि प्रोत्साहनाचे प्रतीक आहेत. शेतीउद्योग प्रधान महाराष्ट्र झाला पाहिजे अशी त्यांची तळमळ वरचेवर दिसून येत होती.