• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १२७-१

माझा व्यवसाय पत्रकारितेचा होता. दुय्यम, तिय्यम दर्जाच्या वृत्तपत्रातून मी नोकरी करीत असे. जीवन ओढग्रस्तीचे असे. ही जाणीव त्यांना होती पण ते ती गोष्ट कधीही दाखवून न देता ते माझ्याशी अशी काही जवळीक दाखवून वागत की त्यामुळे अधिकारी वर्ग, पक्षाची मंडळी, मालकवर्ग यांना माझ्याशी वागताना आपोआपच बदल करावा लागे. थोरांचे देणे हे असे अदृश्य असते.

भाऊसाहेब हिरे विरूद्ध मोरारजी देसाई या राजकारणात यशवंतरावांनी जी खेळी केली त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण नागरी नेतृत्वाकडून ग्रामीण नेतृत्वाकडे नेले हा इतिहास आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात द्वैभाषिकाचे मुख्यमंत्री असलेल्या यशवंतरावांची अवहेलना करण्यात सर्व पत्रकार आघाडीवर होते. समाजही सभेमध्ये टर उडवीत असे. पण यशवंतरावांनी वेळोवेळी, गावोगावी पत्रकार बैठकी घेऊन पत्रकाराचे स्थान जसे मानले तसेच विरोधी पक्षाचा वरचष्मा असलेल्या गावात पोलिसी-शासकीय साहाय्याचा वापर न करता सभा घेऊन जनता हे त्यांचे दैवत ही गोष्ट त्यांनी आचरणात आणली.

लोकप्रतिनिधिपदाचे पावित्र्य त्यांनी मनापासून मानले होते. त्यामुळेच शासकीय अधिकारपदावर असलेल्या काही बुद्धिमंतांना ते नकोसे वाटत. आपल्या खाजगी बैठकीत अगर कार्यालयात गावच्या पंचाचे आणि खासदाराचे गा-हाणे ऐकताना ते सारखेच अवधान ठेवत व त्याची दखल घेऊन त्या गा-हाण्याचे निराकरण करीत.

मुख्यमंत्रिपद प्रथम द्विभाषिकाचे व नंतर महाराष्ट्राचे स्वीकारल्यावर त्यांच्यावर कामाचा फार मोठा ताण पडला होता. केंद्र शासनात संरक्षणमंत्रिपदी ते गेल्यावर तो भार एकदम कमी झाला. आणि ते साहित्य संस्कृती वगैरे विषयांत रममाण होऊ लागले. दिल्लीला जाऊन स्थायिक व्हावे लागणार ही गोष्ट कदाचित त्यांना अगोदर जाणवली असावी. त्यामुळेच लखनौ-कानपूरकडील एक उर्दू शिक्षक त्यांनी हिंदी बोलीभाषा येण्यासाठी मुंबईत ठेवला होता. त्यामुळेच लोकसभा व राज्यसभेतील त्यांची भाषणे भाषासौष्ठव म्हणूनही सुंदर ठरली.

राजकारणातील ही व्यक्ती स्व-विचार, पक्ष, तत्त्वज्ञान, शासनाच्या जबाबदा-या या बाबतीत अविचलित होती. त्यांच्या बैठकीमध्ये अन्य राजकीय नेत्यांच्या बैठकीत जसे चर्चा-वाद याची झुंज लागे तसे होत नसे. जुन्या आठवणी, आजचे संदर्भ याचा उल्लेख होई आणि त्याला वादाचे स्वरूप येते आहे असे दिसताच विनोदाची कारंजी उडवून वेगळीच बगल बैठकीला लाभे. पुंरदर येथील एन.सी.सी.अकॅडमीच्या एका समारंभाला ते संरक्षणमंत्री या नात्याने आले होते. त्या वेळी कड्यावर आठ दिवसापूर्वी उभारलेली एक राहुटी सुसाट वा-याला न जुमानणा-या कापडाची आहे काय हे त्यांना तपासावयाचे होते. वाट बिकट होती. एका जीपमध्ये ते बसताच ड्रायव्हरने ती चालू केली. मागच्या जीपमध्ये अकॅडमीचे कमांडंट कर्नल गुणे ती जीप चालवायला बसताच त्यांच्या शेजारच्या मोकळ्या जागेवर मी बसलो. दोन्ही जीप बालेकिल्ल्यावरील पश्चिमेच्या ती राहुटी रोवलेल्या त्या टोकापाशी पोहचताच यशवंतराव व कर्नल गुणे खाली उतरले. यशवंतरावांच्या लष्करी ड्रायव्हरने आपल्या जीपचे तोंड परतीसाठी वळविण्यास सुरूवात केली व मलाही मी बसलेल्या जीपचे तोंड वळविण्यास सांगितले. त्या अपु-या जागेत ते मी वळविण्यात दहा मिनिटे तरी गेली असावीत. इतक्यात माझी दोन नंबरची जीप तोंड वळविल्याने पहिली झाली होती यशवंतराव माझ्या शेजारी बसले आणि ‘चला’ म्हणाले. मीही जीप चालू केली आणि पुरंदरचा तो बालेकिल्ला अगदी हळूहळू उतरत खाली आलो. तेव्हा तेथे जमलेल्या मंडळींनी टाळ्यांचा कडकडाट केला. तेव्हा त्यांचा हात हलवून स्वीकार करीत यशवंतराव मला म्हणाले, ‘‘कारेकर या टाळ्या माझ्यासाठी नाहीत. तुमच्या ड्रायव्हिंगबद्दल आहेत.’’

संरक्षणमंत्री असताना संरक्षण खात्याच्या जंगी जेट विमानाने ते सतत पुण्याला येत. त्या वेळी ग्लायडींग संबंधात माझे दिल्लीला काम होते. रजा-वेळ-अर्थकारण यामुळे मला दिल्लीला जाणे जमत नव्हते. तेव्हा यशवंतरावांना ‘मी येऊ का तुमच्याबरोबर?’’ असे विचारले. त्या वेळी डोंगरे खाजगी सेक्रेटरी, श्री.प्रधान हे शासकीय व एक तामिळ भाषिक खात्याचे सेक्रेटरी अशी मंडळी त्यांच्याबरोबर दौ-यात असत. माझ्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी यशवंतरावांनी मला दुपारच्या जेवणानंतर आठवण कर असे सांगितले.

त्या वेळी ते आणि तामिळ सचिव इंग्रजीत बोलत होते. तेव्हा मी ही त्यांना इंग्रजीतून ‘मला दिल्लीला येण्यासाठी लिफ्ट द्याल काय? ’ असे विचारले. त्यावर यशवंतराव इंग्रजीतूनच म्हणाले, ‘तुम्हाला मी दिल्लीत ड्रॉप करू काय?’ मी ‘होय’ म्हणताच ते ठीक म्हणाले. दुसरे दिवशी सकाळी ८ वाजताच पुणे ते दिल्ली हा माझा विमानप्रवास सुरू झाला. पालम विमानतळावरून त्या वेळी एक विमान उड्डाण करावयाचे होते म्हणून मग आमचे विमान दिल्लीला प्रदक्षिणा घालू लागले. तेव्हा यशवंतराव हाताचा ताल धरून म्हणू लागले, ‘‘कारेकर, दिल्ली देखो, दिल्ली देखो, ये बादशाहका महाल देखो. ये है...’ आणि मग एकदम आठवल्यासारखे करून इंग्रजीत बोलू लागले. ‘‘अहो, आपण कारेकरांना लिफ्ट द्यायचे कबूल केले होते. ते केले आहे. आता त्यांना ड्रॉप करावयाचे आहे ना? ’’ त्या वेळी ते एवढे मनापासून हसले की प्रवासाचा सारा शीण निघून गेला.