पुढे पंढरपूरला १९५८ मध्ये सर्वोदय संमेलन झाले. विनोबांनी परधर्मीयांना घेऊन मंदिरप्रवेश केला म्हणून सनातनी संतापलेले होते. राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने यशवंतरावांनी चोख व्यवस्था ठेवली होती. साध्या वेशातील सी.आय.डी. पंढरपूरच्या परिसरात सर्वत्र पसरलेले होते. स्वत: यशवंतराव नम्रपणे पाहुण्यांना पाणी वाढीत होते. या काळात यशवंतरावांनी आपल्या सर्जनतेने प्रतिपक्षाची मने जिंकली. त्याचे एक उदाहरण रावसाहेब पटवर्धनांनी आम्हांला सांगितले होते. एका विरोधी आमदाराने सकाळच्या डाकेने पत्र पाठवले आणि संध्याकाळच्या डाकेने त्या आमदाराला यशवंतरावांचे उत्तर मिळाले. त्या काळात पोस्टाची लोकल डिलिव्हरी नुकतीच चालू झाली होती आणि ती कार्यक्षमतेने चालत होती ही गोष्ट वेगळी, परंतु यात यशवंतरावांची प्रतिपक्षाला नम्रतेने जिंकण्याची दक्षता दिसून येते.
यशवंतराव पत्राची उत्तरे तत्परतेने द्यायचे. महाराष्ट्रात महेंद्र कंपनीची वसाहत खोपोलीला यशवंतरावांनी लगेच उभारू दिली. अन्यथा तो कारखाना मद्रासला जायचा होता. मनात असे येते की, जर यशवंतराव दीर्घ काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते तर कदाचित ब-याच कटकटी टळल्या असत्या. पण हा ‘‘जर-तर’’ चा सवाल आहे. मी यशवंतरावांना पत्रात लिहिले, ‘‘समर्थ रामदासांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी मराठा तितुका मेळवावा असे सांगून ठेवले, परंतु महाराष्ट्रातले नेते अजूनही आपापसात भांडतच राहिले आहेत.’’ मला वाटले की, यशवंतराव या पत्राचे उत्तर पाठविणार नाहीत. पण त्यांचे चांगले उत्तर आले. त्यांनी आमच्या सर्वोदय साधनेविषयी लिहिले की, महाराष्ट्र सरकार तुम्हाला काय मदत करू शकते ते कळविल्यास मी माझा शब्द अवश्य खर्च करीन.
पण यशवंतरावांकडून फक्त प्रेमाचीच अपेक्षा होती, आर्थिक अपेक्षा असती तर आम्ही त्यांच्याजवळ गेलो नसतो. उलट यशवंतराव देखील प्रेमाचीच अपेक्षा इतरांकडून करीत असणार ! मी त्यांना उत्तरादाखल लिहिले, ‘‘आपले पत्र पाहून मला महाभारतातील एक गोष्ट आठवली, श्रीकृष्ण भगवंताच्या अवतारसमाप्तीचा काळ होता म्हणून ते आपल्या जुन्या सोबत्यांच्या शोधात निघाले. राजस्थानमध्ये उत्तंक नावाचा त्यांचा एक सोबती होता त्याच्याकडे जाऊन ते म्हणाले, ‘तुला काय हवे ते माझ्याकडे माग.’ उत्तंकाने भगवंताकडे पाणी मागितले. कारण राजस्थानमध्ये पाण्याचा दुष्काळ असतो, भगवंतांनी त्याला नखाने खोदून पाण्याची नदी दिली.
खरोखर उत्तंकाने श्रीकृष्णाला म्हणायला पाहिजे होते की, ‘तू आता अवतारकार्य संपवून निघाला आहेस. मला तुझे फक्त प्रेम दे, ‘उत्तंकाला याहूनही खाली उतरायचे असेल तर त्याने म्हणायला पाहिजे होते की, ‘‘मला काय हवे ते तूच आणून दे.’’ माझ्या या पत्राचेही उत्तर यशवंतरावांनी दिले. त्यांची आई विठाई यांच्यासंबंधी त्यांच्याच शब्दात एक लेख आम्ही छापला आणि तो छापल्याचे पत्र गेल्या शनिवारी दि.२४ नोव्हेंबर रोजी त्यांना लिहिले. शनिवारी रजा असल्याने ते सोमवारी पोस्टात टाकावयाचे होते. पण त्या पूर्वी रविवारी २५ नोव्हेंबर ८४ रोजी यशवंतरावांची इहयात्रा संपली. ते म्हणाले होते, ‘‘मुंबईत मला भेटत जा’’ पण मी आणि आमचा मित्र सुनील वागळे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी ‘‘सह्याद्री’’ या त्यांच्या एकेकाळच्या निवासस्थानी गेलो. २ ऑगस्ट रोजी त्यांनी आम्हाला प्रेमपूर्वक परतभेटीचे निमंत्रण दिले होते. पण ती परत भेटही अशी एकतर्फी झाली ! एक सामान्य शेतकरी मुलगा आपल्या शक्तीनुसार यशवंत कर्तृत्व गाजवून गेला, आणि आपल्या चिमुकल्या देवराष्ट्राचे नाव त्याने प्रकाशात आणले. त्यामुळे आई विठाईची कूस धान्य झाली !