या घटनांचा अन्वयार्थ लावण्यात माझा बराच काळ गेला. मनाची काहीशी द्विधावस्था निर्माण झाली होती. हिटलरची हुकुमशाही ही लोकशाही विचार आणि मानवता यांवर एक भंयकर संकट होतं, हे तर खरंच; परंतु दुस-या बाजूला ब्रिटिशांचा वसाहतवाद आणि हिटलरची हुकुमशाही यांत फरक करणंही कठीण जात होतं. अशा स्थितीत ब्रिटिशांना त्या युद्धात साहाय्य करावं, असं म्हणणं म्हणजे केवळ बौद्धिक कसरत करण्यासारखं होतं. या वैचारिक द्वंद्वात सापडल्यानंतर त्यावर खूप उलट-सुलट विचार करून शेवटी काँग्रेसच्या स्वातंत्र्य-सैनिकांबरोबरच राहण्याचा निर्णय मी मनात पक्का केला आणि रॉय यांच्या विचारांचं बोट सोडून दिलं. इतिहासानं रॉय यांची भूमिका खरी असल्याचं नंतर सिद्ध केलं, हा भाग वेगळा !
राजकीय चळवळीच्या दृष्टीनं वैचारिक संघर्षाच्या काळातून जात असतानाच मी महाविद्यालयीन शिक्षण घ्यावं, असा आग्रह माझे मित्र मला करीत होते. १९३४ साली तुरुंगातून मी बाहेर आलो, तो आपली राजकीय वाटचाल मनाशी निश्चित करूनच आलो होतो. एका निश्चित ध्येयासाठी आयुष्य समर्पण करायचं, हा विचार पक्का झाला होता. त्यामुळे मित्रांच्या आग्रहामुळे महाविद्यालयीन शिक्षण सुरू करायचं झालं, तरी सुद्धा ते मूळ ध्येय शाबूत ठेवून, त्या ध्येयासाठीच, असं ठरवलं. मॅट्रिकला असतानाच सामाजिक आणि शैक्षणिक जागृतीच्या कामास प्रारंभ झाला होता. कराडला आम्ही काही मित्रांनी हरिजनवाड्यात हरिजनांच्या मुलांसाठी एक शाळा सुरू केलीच होती. सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देण्याचं त्या काळात आम्हां तरूणांच्या हाती काही साधनच नव्हतं; पण म्हणून आपण थांबावं, याला मनाची म्हणण्यापेक्षा परिस्थितीची तयारी नव्हती. वर्षानुवर्ष ज्या समाजाला अक्षरओळख झालेली नाही आणि अज्ञानाच्या खोल गर्तेत जो अडकून पडला आहे, त्याला वर काढून, त्याच्या मनात स्वातंत्र्यप्रेमाची ज्योत प्रज्वलित करणं सहज शक्य होतं. कराडच्या टिळक हायस्कूलमधे - राष्ट्रीय शिक्षणाचे उद्गाते लोकमान्य टिळक यांचं नाव शिरोधार्य ठेवलेल्या हायस्कूलमध्ये शिकणारे आम्ही तरुण शिक्षणाच्या कार्यासाठी उसळी मारून उठलो नसतो, तरच नवल ! आम्ही ते कार्य सुरू केलं होतं; आणि त्याच वेळी मला महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोल्हापूरचा मार्ग धरावा लागला.
कोल्हापूरचं वातावरण त्या काळात शैक्षणिक दृष्ट्या भारलेलं होतं. समाजातील दुर्बल घटकांना, विशेषतः, शैक्षणिक क्षेत्र उपलब्ध करून देण्यासाठी कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू महाराज एका विशिष्ट ध्येयदृष्टीनं प्रेरित झाले होते. मला माझं शिक्षण कोल्हापुरातच करावं लागणार होतं. पण मनानं मी सातारा जिल्ह्याच्या राजकीय चळवळीशी पूर्णपणे समरस होऊन गेलो होतो. त्यामुळे शिक्षणासाठी म्हणून शरीरानं मी कोल्हापुरात पोचलो, तरी मनाने सातारा जिल्ह्यातच वावरत होतो. परिणाम असा झाला की, शिक्षण कोल्हापुरात आणि राजकीय जागृती करण्याचं काम सातारा जिल्ह्यात, असा दुहेरीपणा निर्माण झाला. महाविद्यालयातल्या माझ्या मित्रांचं मला त्या काळात अमाप साहाय्य झालं.
तेथील मित्रांनी महाविद्यालयात माझी आठवड्यातील चार दिवसांची हजेरी नोंदवायची आणि प्रत्यक्षात मी मात्र सातारा जिल्ह्यातील गावागावांतून सभा, भाषणं करीत हिंडत राहायचं, असा क्रम सुरू राहिला. कोल्हापूर-सातारा त्या वेळी मोटारीला एक रुपया भाडं होतं. कोल्हापुरात चार दिवस खानावळीत जेवण्यापेक्षा हे एक रुपया भाडं खर्च करणं परवडत असे. विचार करणारा एक कार्यकर्ता म्हणून सातारा जिल्ह्यातील तरुणांनी मला मान्य केलं होतं, कार्यकर्त्यांनी स्वीकारलं होतं. माझ्या संग्रही सांगण्यासारखं काही आहे, असं ते सर्वजण मानीत असत. याचा फायदा झाला. संघटना मजबूत करायचं काम होतं. त्याला गती मिळाली. हिंडत राहिल्यानं लहानमोठ्या गावांतून अनेकांच्या ओळखी झाल्या आणि माणसं समजण्याचं शिक्षणही या निमित्तानं मला मिळून गेलं. राजकीय जागृतीचं काम करायचं आणि शेवटच्या दोन महिन्यांत परीक्षेचा अभ्यास करायचा, या धावपळीतच १९३८ साली बी. ए. ची पदवी माझ्या पदरात पडली. १९३४ ते ३८ हे ख-या अर्थानं सातारा जिल्हा हे माझं कार्यक्षेत्र बनलं होतं. आत्माराम पाटील, ह. रा. महाजनी, लक्ष्मणशास्त्री जोशी, दामुअण्णा एकबोटे, किसन वीर, काशिनाथ देशमुख, राघूअण्णा लिमये, बाबूराव गोखले, दादासाहेब आळतेकर, दिनकरराव निकम इंदुलीकर, भाऊसाहेब सोमण अशी कितीतरी मंडळी त्यावेळी पक्षाच्या कार्यात मग्न होती. याच काळात विष्णु चितळे हे कम्युनिस्ट कार्यकर्ते कराडला होते. सातारा जिल्हा हा राजकीयदृष्ट्या अतिशय जागृत झाला होता. सभा, परिषदा, जनतासंपर्क, परस्पर मैत्री, सौहार्द, पक्षाकरिता राबणं असा तो काळ. जेवण मिळालं, न मिळालं, तरी त्याची पर्वा नव्हती, त्या काळात आत्तासारख्या मोटारी नव्हत्या. त्यामुळे प्रवास पायी किंवा बैलगाडीनं सुरू राहायचा. पण कष्टाची फिकीर नव्हती.