• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य २४७

शिक्षणाचा अनिर्बंध प्रसार व्हावा, अशा मताचा मी होतो; आणि आजही आहे. शेकडो वर्षे निरक्षरतेच्या, अज्ञानाच्या अंधकारात चाचपडणा-या भारताला विज्ञानाचा प्रकाश लवकर दिसावा, ही त्यामागची तळमळ होती. ही विज्ञानाची कवाडे उघडली, प्रकाश आला, आणि त्यामुळे नवा, तंत्रज्ञांचा वर्ग निर्माण झाला. त्यातूनच बेकार तंत्रज्ञांची व शिक्षितांची समस्या आज आपल्यापुढे उभी आहे. एखाद्या वर्गाला पुढचे भवितव्य स्पष्ट दिसले नाही, की तो अस्वस्थ होतो. काही तरी नवा मार्ग शोधतो. शासन अशा वर्गाबाबत थंड व उदासीन राहिले, तर त्या वर्गाच्या असंतोषाला राजकीय स्वरूप येते. हा राजकीय असंतोष एका शैक्षणिक धोरणातून निर्माण झालेला आहे, असे लक्षात येते. समाजातील तंग परिस्थिती अशा अनेक कारणांमुळे निर्माण होते. मी फक्त एकच उदाहरण दिले. तेव्हा दुस-या दृष्टीने पाहिले, तर ही प्रगती नाही का ? तंत्रज्ञांची टंचाई असलेल्या या देशात त्यांची संख्या वाढावी, हे सुचिन्ह नाही काय?

दुसरे उदाहरण लोकशाहीतील राजकीय क्रांतीचे घेता येईल. आपण प्रौढ मतदानाचा अधिकार दिला. हा अधिकार देऊ नये, असे काही घटनापंडितांचे मत होते. यामुळे लोकशाही ही झुंडशाही होईल, असे त्यांना भय वाटत होते. तरीही गांधीजींनी प्रौढमताधिकाराचा आग्रह धरला. कारण आता जर हा अधिकार दिला नाही, तर तो गरिबांना मिळावयास अनेक वर्षे झगडा करावा लागेल, असे त्यांचे मत होते. ज्या वर्गाच्या हातांत मर्यादित मतदानाने सत्ता जाईल, तो वर्ग ती सत्ता दलितांच्या हाती जाऊ देणार नाही. त्यासाठी डावपेचांचे राजकारण करीत राहील. या प्रौढमतदानाने आमचे भारतीय लोकशाहीचे प्रचंड स्वरूप आपण पाहत आहोत. त्यामुळे काही समस्या निर्माण झाल्या आहेत. हे खरे; पण ती एक फार मोठी राजकीय क्रांती आपण केली आहे, असे का आपण मानीत नाही?

मला वाटते, भारतातील क्रांतीमुळे निर्माण झालेल्या नव्या शक्तींचा आपण पुरेसा अभ्यासच केलेला नाही. त्याबाबत आपण उदासीन राहिलो आहोत. आपल्या देशात सत्तांतर शांततापूर्व झाले, ही एक अभूतपर्व घटना होती. तसेच, ही क्रांतीही अपूर्व आहे, असे आपण मानले नाही. क्रांती आता सुव्यवस्थित व फलदायी करावयाची, असे आपल्याला वाटतच नाही. क्रांतीच्या स्वप्नरंजक तत्त्वज्ञानात वावरणा-यांना या क्रांतीचे महत्त्वच पटले नाही. झालेली क्रांती पूर्ण आहे, असे कोणीच मानत नाही. पण ती विधायक दृष्टीने राबवून शेवटच्या थरापर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्‍न अपुरे पडले. मला वाटते, आता हे औदासीन्य टाकून दिले पाहिजे, क्रांती पुरे करण्यासाठी पुरोगामी शक्तींनी काही नवे आग्रह धरले पाहिजेत. रूसून किंवा चिडून हे घडणार नाही. आजचे सारे वैफल्य या आपल्या उदासीनतेतून आले आहे. आजचे राजकारण समाजापासून दूर जात आहे. याचे कारणही हेच आहे. दिल्लीत मला दिसते, ते असे की, कोणताही पक्ष हे लोककारण करीत नाही. त्यांच्या राजकीय चळवळी डावपेचाच्या स्वरूपाच्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांत सातत्य नाही. नव्या शक्ती उदयास येत नाहीत. नवे नेतृत्व दिसत नाही. या देशाचे राजकारण अद्यापि जुन्या घोषणांवर, जुन्या पूर्वग्रहांवर आधारलेले आहे. गेल्या वीस वर्षांत काय घडले आहे, याचा ताळेबंद तयार न करता, नेमके आजचे लोकांचे प्रश्न काय आहेत, त्यांचा लोकांत जाऊन अभ्यास न करता काँग्रेसच्या नेतृत्वाविषयीचे जुने आकस विविध पक्षांच्या धोरणांवर प्रभाव पाडीत आहेत. असे नकारात्मक राजकारण फार काळ चालू राहिले, तर नवी पिढी आणि जुने नेते यांच्यांतील अंतर झपाट्याने वाढेल. नवी पिढी दिशाहीन होईल आणि त्यातून नवा राजकीय पेचप्रसंग उद्‍भवेल.