• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य २२७

७४

मराठी विज्ञान परिषद
(७ डिसेंबर, १९६८)

मराठी विज्ञान परिषदेने दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात विज्ञानसेवा व विज्ञानप्रसार संघटितरीत्या करण्यासाठी जो उपक्रम सुरू केला, तो समक्ष पाहण्याची, परिषदेच्या कार्यकर्त्यांना भेटण्याची मला इच्छा होती. वेळेअभावी मला ते जमले नाही. पण त्या परिषदेचे विविध उपक्रम, तिचे आतापर्यंतचे कार्य यांची माहिती मला सतत मिळत होती. मराठी विज्ञान परिषदेचे हे कार्य अत्यंत मोलाचे आहे. काळाची आजची गरज ओळखून, ते व्यापक करण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्‍न आहे, हे पाहून मला समाधान वाटले. ते व्यक्त करण्यासाठी आणि आपणांला भेटून या विषयासंबंधी माझे काही विचार आपणांपुढे ठेवण्यासाठी मी आलो.

विज्ञानसेवेचा किंवा प्रसाराचा विचार करताना माझ्या मते त्याच्या दोन प्रमुख अंगांचा विचार केला पाहिजे. एक तर मानव जातीसमोर आज जी संकटांची परंपरा उभी आहे, ती नाहीशी करण्यासाठी, निसर्गाचे गूढ उकलून, मानवाला जास्तीत जास्त शक्ती प्राप्त करून देणारे संशोधन करणे आणि अशा प्रकारच्या संशोधनास प्रोत्साहन देणे. दुसरे, जे माझ्या मते जास्त व्यापक कार्य आहे, समाजात विज्ञान - विचाराचा प्रसार व प्रचार करून समाजच विज्ञाननिष्ठ बनविणे. हे काम करण्यासाठी मात्र आपणांस जास्त कष्ट घ्यावे लागतील, प्रयत्‍नांची पराकाष्ठा करावी लागेल. विज्ञानाचे मूळ स्वरूपच तर्कसंगत, बुद्धिसंमत विचार असे आहे. हा विचार जनतेच्या मनात दृढमूल झाल्यावरच आपण एक आधुनिक समाज निर्माण करू शकतो. जुन्या सनातन कल्पना समाजातून काढून टाकण्याचा हाच एक कार्यक्षम उपाय आहे. या दिशेने जितक्या जलद वाटचाल होईल, तितक्या लवकर आपला देश व समाज प्रगतिशील राष्ट्रांच्या मालिकेत जाऊन बसेल.

माझ्या या म्हणण्याचा अर्थ असा मात्र नाही, की विज्ञान परिषदा संशोधन - कार्यास उत्तेजन देण्याकरिता काही करू शकत नाहीत किंवा त्यांनी काही करू नये, या कार्यक्षेत्रात त्यांना भरीव कामगिरी करून दाखविता येईल. संशोधन-कार्यासाठी आर्थिक साहाय्य मिळवून देणे, या कार्यातील अडीअडचणी समजावून घेऊन, त्या समाजापुढे, शासनापुढे मांडणे, वेगवेगळ्या क्षेत्रांत इतर राज्यांमध्ये कार्य करणार्‍या व्यक्तींशी संपर्क ठेवून एकमेकांना मदत व सहकार्य करणे वगैरे अनेक कार्यक्रम संशोधकांना मदत म्हणून व त्यांच्या कार्यास उत्तेजन म्हणून विज्ञान परिषदा हाती घेऊ शकतात व त्यांनी हे कार्य हाती घेतले पाहिजे. विज्ञानसेवेस वाहिलेल्या परिषदा आज असताना जे कष्ट शं. बा. दीक्षित किंवा केरूनाना छत्रे यांना घ्यावे लागले, तसे कष्ट किंवा त्रास आजच्या संशोधकांना घ्यावा लागू नये. एवढेच नव्हे, तर त्यांनी अंगीकारलेले कार्य तडीस नेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या दृष्टीने विज्ञान परिषदेसारख्या संस्था भरीव कामगिरी करू शकतात व त्यांनी ती करावी.                                                                                                                           

आज आपले शास्त्रज्ञ देशांतर करीत आहेत, त्याचे कारण समाजाची अनास्था हेही आहे. मराठी विज्ञान परिषदेसारख्या संस्थेने शास्त्रज्ञांच्या या स्थितीची जाण दाखविली पाहिजे. दुसरे एक काम करण्यासारखे आहे. ते असे, की परदेशांत असलेले विविध शास्त्रांचे विद्यार्थी व संशोधक यांची जंत्री करून, त्यांच्याशी सतत संपर्क ठेवला, तर आपल्या संशोधन – कार्याशी आपल्या देशबांधवांचा संबंध आहे, त्यांना त्याबद्दल आस्था आहे, हे परदेशांतील संशोधकांना अशा उपक्रमामुळे समजेल. शास्त्रज्ञांचे देशांतर कमी करण्यासाठी अशा संपर्काचा जास्त उपयोग होईल. सरकारलाही अशा त-हेच्या उपक्रमापासून लाभ होईल. एवढ्या प्रचंड देशात, शेवटी स्वहिताची जपणूक करण्यासाठी अशा सामाजिक संस्थांनाच पुढाकार घ्यावा लागेल. शासन हे काही सर्वसाक्षी नाही किंवा सर्वज्ञही होऊ शकत नाही.