आपल्या तारुण्यात, बालपणात आपल्याला बरंच काही वाईटही भोगायला लागलेलं असतं. प्रत्येकजण काही फुलांत वाढलेला नसतो. काट्याकुट्यांतच ब-याच जणांचं बालपण-तारुण्य गेलेलं असतं. परंतु मोठेपणी आपल्या मुलाबाळांच्याही वाट्याला तसे वाईट दिवस येऊ नयेत, आपण जे लहानपणी भोगलं, तसं मुलांना तरी भोगायला लागू नये, अशी कोणत्याही आईवडिलांची इच्छा असतेच ना! त्यासाठी कष्ट उपसायला त्यांची तयारी असतेच ना! तसंच इतरांच्याबद्दलही वाटायला हवं! आपण जे दुःखद अनुभव घेतले, आपल्याला त्या काळात समाजाकडून जो त्रास, मनस्ताप झाला, तो आता समाजातल्या इतरांना तरी होऊ नये, यासाठी आपण पुढं व्हायला हवं. ते समाजॠण फेडणं नाही का? ते जर फेडण्याची आपण चाळिशीला सुरुवात केली, तर खर्या अर्थानं आपण कृतार्थ जीवन जगत आहोत, असं म्हणता येईल. स्वतःबद्दलचा विचार बाजूला करून, आजूबाजूच्या दीनदुबळ्यांच्या प्रश्नाचा विचार करायची चाळिशीच्या उंबरठ्यावर सवय लावायला हवी. आता जर काही करायची इच्छा मनी आणली नाही तर पुढं काहीच करता येणार नाही. कौटुंबिक समस्या वाढत जातात. मुख्य म्हणजे, शरीर साथ देत नाही. त्यामुळं मनही वृद्ध होत जातं. वेळ टळून जाण्यापूर्वीच सुरुवात करायला हवी. विचारांना गती द्यायला हवी. समाजासाठी कोणत्या रीतीनं काय करू शकू, याचा वेध घ्यायला हवा, आणि तसं केलं, तर दोन गोष्टी साध्य करता येतील. नव्या-जुन्या पिढ्यांमधील दुरावा कमी होण्याचा मार्ग सुकर होईल. समाजात विश्वास, रस निर्माण होईल आणि त्याचबरोबर आपलं व्यक्तिमत्त्व फुलविण्याला, उर्वरित आयुष्यात चैतन्य निर्माण व्हायला मदत होईल ! आपण चाळीशीतही तरुण होऊ शकू. ही पुढल्या आयुष्याची शिदोरी आहे. आयुष्यातल्या संध्याकाळची एकाकी, दुःखी वृद्धावस्था टाळण्यासाठी या शिदोरीचा खूपच उपयोग होऊ शकेल.
यावर कोणी म्हणेल, संसाराचा वाढता व्याप सांभाळता-सांभाळता महागाईला तोंड देता-देता इथं माणसं बेजार होत आहेत, त्यांना जीव नकोसा होतोय्, सर्वत्र निराशा दिसते आहे. अशा वेळी समाजकार्य कसं होणार त्यांच्या हातून?
एका अर्थानं हे खरं आहे. पण हे झालं स्वतःच्या संसारापुरतं. समाजपुरुषाचा संसार चालविण्यासाठी, ज्यांना समाज आपला वाटतो, त्यांनी स्वतःच्या अडीअडचणी बाजूला ठेवून पुढं यायला नको का? अशी पुढं येणारी माणसंच समाज घडवू शकतात, राष्ट्र उभं करू शकतात, हे नाकारता येणार नाही.
आम्ही लहानपणापासूनच सामाजिक, राजकीय चळवळीत होतो, तेव्हा स्वातंत्र्यप्राप्ती हेच ध्येय होतं. आता ध्येय आहे सुराज्याचं, समाज बलशाली, एकसंध बनविण्याचं. यात तरुणांनी भाग जरूर घ्यावा. पण एवढं लक्षात ठेवावं, स्वतःचा पाया बळकट असायला हवा. आता आपल्याला विचारांचं आंदोलन उभं करायचं आहे आणि अशी वैचारिक आंदोलनं करण्यासाठी भक्कम वैचारिक बैठकही हवी असते.
माणसानं पस्तिशी ओलांडली, म्हणजेच असा नवा दृष्टिकोन तयार होतो, असंही नाही. तारुण्यातही त्याला खतपाणी मिळालेलं असतं. चाळिशीत व्यक्तीच्या विचारांमध्ये परिपक्वता येते. ती मॅच्युअर्ड होते. आवडीनिवडींविषयी तिची मतं पक्की होत जातात. हीच वेळ, हेच वय समाजाला काहीतरी देण्याचं असतं.
काही काही वेळी चाळिशीत नव्या पिढीला सतत नावं ठेवण्याची प्रवृत्ती दिसून येते. 'हल्लीची पोरं वाहवलीत.. त्यांना काहीच ताळतंत्र राहिलं नाही... त्यांना स्वतःपुढं दुसरं काहीच दिसत नाही... त्यांचे कपडे बघून लाज वाटते. ... आमच्या वेळी आईवडिलांबद्दल, गुरुजनांबद्दल आम्हांला आदर होता. आता मोठ्यांच्या समोर खुशाल तरुण पोरं सिगारेटी ओढतात, मित्रमैत्रिणींबरोबर गुलगुलू बोलतात ...' ही अशी वक्तव्यं ऐकली, की वाटतं, जगबुडी जवळ आली, की काय ! आपण कोणत्याही गोष्टीत पराचा कावळा करीत असतो. एखादं वाईट उदाहरण आपल्यासमोर आलं, की आपण 'सगळेच तसले' असे खुशाल म्हणत राहतो.