राजकारणाचे मराठी कादंब-यांतील चित्रण अतिशय अपुरे व फसवे आहे. काही उदाहरणे सांगायची, तर अरुण साधूंच्या 'सिंहासन' या कादंबरीत मला प्रचाराचा वास येतो. राजकीय कादंब-या लिहिण्याचा साधूंचा प्रयत्न आहे. पण त्यांचा थाट प्रचारकी आहे. 'सिंहासन' कादंबरीपेक्षा 'रिपोर्टिंग' वाटते.
'जनांचा प्रवाहो चालिला...' हे पुस्तक निकृष्ट (थर्ड ग्रेड) आहे.
देशामधील राजकारणातील महत्त्वाच्या प्रेरणांबद्दल सहानुभूती नसलेले, जागतिक राजकारणातील वेगवेगळे प्रवाह ठाऊक नसलेले, केवळ आपले गाव किंवा आपली गल्ली यांतच रममाण होणारे, अशा लेखकांच्या ब-याचशा राजकीय कादंब-या या पूर्वग्रह व गैरसमज यांवर आधारलेल्या आहेत.
मराठीत राजकीय कादंब-या लिहायला कै. ग. त्र्यं. माडखोलकर यांनी सुरुवात केली. या संदर्भात त्यांच्या 'मुक्तात्मा' चा मी उल्लेख करीन. पण त्यांच्या सर्वच कादंब-यांत बांधिलकी आहे, असे मी म्हणणार नाही. जयवंत दळवी यांना बांधिलकी मंजूर आहे, की नाही, हे मला ठाऊक नाही. मला त्यांच्या नाटकांतून ही बांधिलकी अनुभवाला येते. विशेषतः, त्यांची बांधिलकी विशिष्ट असूनही, त्यांच्या कलेच्या आविष्कारात त्यामुळे न्यून आले आहे, असे म्हणता येणार नाही.
विजय तेंडुलकरांच्या नाटकांतही मला बांधिलकी दिसते. तर वसंत कानेटकर हे अत्यंत यशस्वी नाटककार, पण मला अभिप्रेत असलेली बांधिलकी त्यांच्या लिखाणात दिसत नाही. तेव्हा यशापयशाच्या कसोटीवर बांधिलकी अवलंबून नसते.
केशवसुतांच्या काळात बांधिलकी असावी, की नाही, असा काही वाद नव्हता. पण उत्स्फूर्त बांधिलकी असलेला मराठीतील तो पहिला आधुनिक कवी म्हणायला हवा. त्यांच्या कित्येक कवितांचे संदर्भ हे आजही नवे वाटतात, भावी काळातही वाटत राहतील. राजकारणात गटबाजीचा बुजबुजाट झाला आहे. त्याचे चित्रण कादंब-यांत येणारच, हे ठीक. पण गटबाजी ही केवळ राजकारणातच आहे, असे नाही. ती साहित्यिकांत आहे, प्रकाशकांत आहे, जीवनाच्या सर्व क्षेत्रांतच आहे. तेव्हा गटबाजीचे चित्रण दाखवायला माझी हरकत नाही, पण जीवन निव्वळ त्यानेच भरले आहे, असा संभ्रम निर्माण करणे म्हणजे साहित्याच्या मूळ प्रेरणाशी प्रतारणा होय.
बांधिलकीची माझी कल्पना अशी : कोणत्याही गटाला, राजकीय पक्षाला, व्यक्तीला बांधून घेणे म्हणजे बांधिलकी नव्हे. ते प्रचारवाङ्मय होते. हे साहित्यच नव्हे, असे मला वाटते. मार्क्सवाद, गांधीवाद, समाजवाद यांबद्दल लिहिले जाणारे वैचारिक वाङ्मय याची आवश्यकता आहे. मनाची प्रौढता, उंची वाढवण्यासाठी अशा वाङ्मयाची गरज आहे. पण त्याला आपण ज्या अर्थाने 'बांधिलकी' म्हणतो, त्याची कसोटी लावण्यात अर्थ नाही, कारण हे शेवटी प्रसारवाङ्मय आहे.
वैचारिक बांधिलकी ललित लेखकाच्या लिखाणातून उतरावीच, असा माझा आग्रह नाही. परंतु लेखकाची वैचारिक बांधिलकी खरीखुरी असेल, तिच्याशी तो प्रामाणिक असेल - चांगले साहित्य निर्माण करणारा स्वतःशी प्रामाणिक असतोच, तेव्हा ही बांधिलकी त्याच्या लिखाणात स्पष्ट रूपाने व्यक्त झाल्याशिवाय राहीलच कशी?