दुसरे साध्य समतेच्या भूमिकेवरून आर्थिक विकास, असे मी मानतो. हे साध्य महाराष्ट्रात लवकर साधले जाईल, असा माझा विश्वास आहे. आपली भूमी समाजवादाला अधिक अनुकूल आहे, असे मला वाटते. उदाहरण द्यावयाचे, तर स्वतंत्र पक्षाचे घ्या. या पक्षाला महाराष्ट्रात नाव घेता येईल, असा कोणीही नेता मिळाला नाही. महाराष्ट्रातील भौतिक परिस्थितीच (Objective Conditions) अशी आहे, की येथे समाजवाद अधिक लवकर रुजावा. महाराष्ट्रातील राजकीय जागृतीची पार्श्वभूमीही याला विशेष अनुकूल आहे. आज देशातील निरनिराळ्या समाजवादी विचारसरणीच्या पक्षांचे ठळक नेते महाराष्ट्रीय आहेत.
आमचा काँग्रेस पक्ष जुना आहे आणि काँग्रेसचा राजकीय पिंड तयार करण्यात महाराष्ट्राचे नेतृत्वच अग्रभागी होते. न्या. रानडे, लो. टिळक व श्री. गोखले यांनी ते काम केले. आजसुद्धा व्यक्ती म्हणून नेतृत्वाचा प्रश्न बाजूला ठेवला, तरी महाराष्ट्राची 'प्रोग्रॅमॅटिक लीडरशिप' आपण अखिल भारतात निर्माण करू शकू, असा माझा आत्मविश्वास आहे. नव्या महाराष्ट्र-राज्याचे ते एक वैशिष्ट्य ठरेल, असे वाटते.
महाराष्ट्रात विद्येच्या उपासनेची एक थोर जुनी परंपरा आहे. आपले शैक्षणिक जीवन समृद्ध आहे. अगदी अलीकडच्या इतिहासातसुद्धा अखिल भारताची राज्यघटना तयार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विद्येच्या उपासनेचा व बौद्धिक गुणवत्तेचा ध्वज फडकावला आहे. केवळ दुष्कीर्तीचे व अपयशाचे आसन ठरलेले केंद्रीय अर्थमंत्रीपद यशस्वीपणाने भूषविले, ते श्री. चिंतामणराव देशमुख यांनीच. त्यांच्या राजीनाम्यामुळे केवळ भारतातच हळहळ व्यक्त झाली, असे नाही, तर जगभर खेद व्यक्त झाला. मला वाटते, नव्या महाराष्ट्र राज्यासमोर विद्येच्या उपासनेचे हे आदर्श असावेत. अशा विद्येच्या उपासनेला आपण प्रोत्साहन द्यावे. थोर संशोधक व कल्पक तंत्रज्ञ पुरवून आपण भारताच्या विकासाला हातभार लावला पाहिजे.
विद्येची उपासना महाराष्ट्रात टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. उच्च शिक्षण देणा-या शिक्षणसंस्थांतील प्रवेशनिर्बंधाबाबत माझी भूमिका अगदी स्पष्ट आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या उपसमितीने दिलेल्या एका अहवालात कॉलेजमधील वाढत्या गर्दीबाबत उपाययोजना सुचविताना असेच प्रवेशनिर्बंध घालण्याची सूचना केली आहे. मी काँग्रेस कार्यकरिणीत या सूचनेचा विरोध केला. आपल्या देशात शिक्षणाच्या सोयी फार मोठ्या प्रमाणात वाढविण्याची आवश्यकता असताना, त्यासंबंधी काही करण्याऐवजी आपण उच्च शिक्षणाच्या सोयी मर्यादित करण्याची भाषा बोलता कामा नये, असे मला वाटते. शिक्षणाचे संस्कार करून घेण्यासाठी सिद्ध झालेल्या हजारो युवकांना शिक्षण नाकारण्याचा आपल्याला अधिकार काय? आर्थिक क्षेत्रात Rich gets richer ही प्रक्रिया जशी योग्य नाही, त्याचप्रमाणे Cultured gets more cultured अशी स्थितीही सामाजिक समतोलाच्या दृष्टीने होणे योग्य नाही. यामुळे शिक्षित आणि अशिक्षित यांच्यामध्ये पडलेले अंतर अधिकच वाढत जाते. सर्वसामान्यतः उच्च शिक्षणावरील निर्बंधाबाबतचे माझे हे विचार आहेत.