• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य १२५

आबा जेलच्या बाहेर आले व त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या भूमिगत चळवळीचा एक वेगळा इतिहास घडत गेला. बेचाळीसच्या क्रांतीचा जेव्हा खरा इतिहास लिहिला जाईल. तेव्हा इतिहासकारांना कबूल करावे लागेल, की किसन वीरांनी ही येरवड्याच्या भिंतीवरून मारलेली साहसी उडी म्हणजे सातारा जिल्ह्यातील त्या चळवळीचे नवे पाऊल होते. जेलच्या बाहेर उडी घेतलेल्या त्या क्षणापासून तो स्वातंत्र्य-प्राप्तीपर्यंतच्या सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य-चळवळीत आबांचे एक स्वतंत्र असे स्थान आहे आणि हे स्थान निर्माण करीत असताना त्यांनी जो लोकसंग्रह केला, जे संघटनाचातुर्य दाखविले, जी तत्त्वनिष्ठा व वैयक्तिक धैर्याची पराकाष्ठा दाखविली, त्या गुणांमुळे माझ्या अंतःकरणात आबांचे एक निश्चित असे मोठे स्थान निर्माण झाले आणि ते स्थान आजही कायम आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात अनेक घडामोडी झाल्या. निवडणुका झाल्या. मंत्रिमंडळे बनली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली. काही निवडणुका ते हरले, तर काही जिंकले. मीही माझ्या राजकीय जीवनात क्रमाक्रमाने वाढत गेलो. कधी संकटात सापडलो व त्या संकटातून बाहेरही पडलो. हा जो अनेक घडामोडींचा संसार उभा राहिला, या सर्व घडामोडींच्या प्रपंचामध्ये मी ज्या थोड्या मित्रांवर निर्धास्तपणे अवलंबून होतो, त्यांमध्ये आबांचे स्थान फार वरचे आहे. त्यांनी जे मित्रप्रेम दिले, ते निव्वळ वैयक्तिक कारणाकरिता नाही. त्यामध्ये तत्त्वाची तपासणी होती. माझ्याशी आबा जेवढा वाद घालतात, तेवढा फार थोडी माणसे घालत असतील; परंतु त्या वाद घालण्यात प्रांजळपणा असतो. किती लोकांना माहीत आहे, की वरून दिसणारी कणखर मूर्ती हृदयाने कोमल आहे. मित्रांसाठी व गरिबांसाठी कारुण्याचे अश्रू त्यांच्या डोळ्यांत उभे राहतात. संग्रामातील साथी म्हणून व खासगी जीवनातील मित्र म्हणून शोधू गेलात, तरी किसन वीरांसारखा माणूस मिळणार नाही. माझे भाग्य एवढे, की त्यांची ही साथ व मैत्री कुठेही शोधण्यासाठी न जाता माझ्या जीवनाच्या प्रवासात मला सहजासहजी मिळाली.

सहकारी चळवळीत त्यांनी मनापासून भाग घेतला. सातारा जिल्हा सहकारी बँक उभारण्याच्या कामात पुढाकार घेऊन त्यांनी महत्त्वाचे काम केले. अनेक कार्यकर्त्या-सवंगड्यांना भोवती जमा केले व नव्या कामाच्या दिशेने प्रयत्‍न सुरू केले. राजकीय क्षेत्रातही सर्व प्रश्नांबाबत प्रांतिक पातळीपासून तालुक्याच्या पातळीपर्यंत आबा सदैव जागरूक असत. सर्वांशी चर्चा करीत असत. कार्यकर्त्यांचे विचार स्पष्ट असले पाहिजेत व त्यांच्यापुढे ध्येयवादी दृष्टी असली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. त्यासाठी त्यांनी सातारा जिल्ह्यात कार्यकर्त्यांची अनेक शिबिरे संघटित केली. पुणे, मुंबई येथून विद्वान माणसांशी संबंध ठेवून या शिबिरांमध्ये ते व्याख्यानासाठी त्यांना घेऊन येत. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे सहकार्य ते याबाबत नेहमी घेत असत. लहान शेतक-यांचे काम असो, हरिजनांचे काम असो, शिक्षणाचे काम असो, की इतर विकासासंबंधी काही काम असो, या सर्व कामांत त्यांनी पुढाकार घेतला, आणि ग्रामीण जीवनाची नवी बांधणी करण्याचा महाराष्ट्रात १९५० नंतर जो प्रयत्‍न झाला, त्यातील आबांचा हिस्सा जरूर कबूल करावा लागेल.