• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य १०५

२९

वसंतराव नाईक

श्री. वसंतराव नाईकांच्या एकसष्टीनिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन करताना गेल्या दहा वर्षांत त्यांनी ज्या कौशल्याने, धीराने व कल्पकतेने महाराष्ट्र राज्याची धुरा वाहिली, त्याची आठवण साहजिकच होते. महाराष्ट्र शासनाचा लौकिक त्यांनी सांभाळला, एवढेच नव्हे, तर वाढविला, असे निश्चित म्हणता येईल. माझे सहकारी म्हणून व महाराष्ट्र शासनाचे प्रमुख म्हणून माझा जो निकटचा संबंध आला, त्या अनुभवावरून मी हे म्हणत आहे.

माझे स्नेही आणि सहकारी श्री. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्र राज्याची धुरा गेली बारा वर्षे अत्यंत कार्यक्षमतेने, समर्थपणे आणि शक्यतो सर्वांना बरोबर घेऊन यशस्वीपणे सांभाळली आहे. वसंतरावांच्या आजवरच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात देशावर आणि विशेषतः महाराष्ट्रावर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे आली, अगदी 'न भूतो' अशाही आपत्ती आणि विपत्ती आल्या. परंतु या सर्वांवर वसंतरावांनी झुंजारपणे, मोठ्या जिद्दीने व यशस्वीपणे मात केली आणि महाराष्ट्राला सुखरूपपणे त्यातून निभावून नेले.

एक यशस्वी शासनकर्ता या नात्याने आवश्यक असलेले गुण तर त्यांच्या अंगी आहेतच; पण शिवाय एक माणूस म्हणूनही त्यांच्या अंगी जी मनाची ॠजुता, सहृदयता, उमदेपणा, शौर्य, चिकाटी, जिद्द, व्यवहारी दृष्टी आणि कष्ट उपसण्याची तयारी आहे, त्या त्यांच्या गुणांचाही त्यांच्या शासकीय यशस्वितेत फार मोठा वाटा आहे, असे मला वाटते. वसंतरावांच्या लेखी सर्व राजकीय व सामाजिक सुधारणेचा केंद्रबिंदू मनुष्य हा राहिला आहे. म्हणूनच वसंतरावांनी महाराष्ट्रातील जनतेवर अपार प्रेम केले. या महाराष्ट्राचा, त्यातील जनतेचा वसंतरावांना अत्यंत सार्थ असा अभिमान आहे. ते एके प्रसंगी म्हणतात, 'महाराष्ट्रातील जनता, मग ती कुठल्याही भागातील असो, अत्यंत प्रेमळ आहे, अत्यंत कर्तृत्ववान आहे, देशभक्त आहे, अत्यंत स्वाभिमानी आहे आणि आलेल्या कोणत्याही संकटाशी आत्मविश्वासाने मुकाबला करण्यास समर्थ आहे.' महाराष्ट्राने आपली सर्व सुप्त शक्ती उपयोगात आणली, तर महाराष्ट्रासारखे संपन्न असे दुसरे कोणतेही राज्य राहू शकणार नाही, असा त्यांचा दुर्दम्य विश्वास आहे.

श्री. वसंतरावजींचा पिंड शेतक-याचा आहे. मातीचा सुगंध किंवा पिकांचा बहर त्यांना सर्वांत अधिक सुखद वाटतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सुज्ञता व समयज्ञता आहे. राजकारणातही त्यांच्या या गुणांचा उपयोग झाला आहे. उच्च शिक्षणाच्या संस्कारामुळे प्रशासनात लागणारी सफाई त्यांच्याजवळ आहे. ग्रामीण प्रश्नांची त्यांची जाणीव सखोल आहे. तसेच, नागरी जीवनाचे प्रश्नही ते चपखलतेने समजतात आणि सोडवितात. उत्तम गृहस्थ व शहाणा शासक या शब्दांनी मी त्यांचे व्यक्तिमत्त्व रेखाटेन. वसंतरावांमध्ये असलेली निरहंकारी वृत्ती, हाती घेतलेल्या कार्यासंबंधी त्यांना सदोदित लागून राहणारी तळमळ आणि कोणत्याही परिस्थितीत ते कार्य पार पाडण्यासाठी लागणारा मनाचा खंबीरपणा यांमुळे त्यांचा जनतेशी निकटचा संपर्क आहे; आणि या गुणांमुळे ते जनतेच्या सुखदुःखांशी किती समरस होतात, ते दुष्काळाचे वेळी प्रकर्षाने दिसून आले.