• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य ९५

२४

बाबू जगजीवनराम

भारताच्या राष्ट्रीय आंदोलनात आणि स्वतंत्र भारताच्या राज्यकारभारात व जडणघडणीत बाबू जगजीवनराम यांनी केलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे व मोलाचे आहे. आणखी एका दृष्टीने जगजीवनरामबाबूंचे कार्य वेगळे आहे. ते राष्ट्रीय चळवळीच्या प्रवाहात सामील झाले आणि देशाच्या मुक्तीतच दलितांची मुक्ती आहे, या श्रद्धेने त्यांनी कार्य केले. आपले विचार राष्ट्रीय नेत्यांपुढे सतत मांडून व आपल्या विचारांना अनुकूल अशा दलितांच्या विविध संस्थांत सहभागी होऊन त्यांनी या प्रश्नाची संघटनात्मक बाजू सांभाळली.

भारताच्या स्वातंत्र्य-चळवळीला असलेली सामाजिक बाजूही अत्यंत महत्त्वाची होती. सामाजिक समतेविना, आर्थिक न्यायाविना स्वातंत्र्याची चळवळ ही केवळ भावनात्मक चळवळ राहील, याची जाणीव गांधी-नेहरूंना होती. पण या अन्यायाची झळ ज्यांना पोहोचते, अशा हरिजनांतून तरुण नेतृत्व यावयास हवे होते. ते जगजीवनरामबाबूंच्या रूपाने आले. १९३७ मध्ये जगजीवनरामबाबूंनी बिहार प्रांतीय दलित जाती संघाच्या अधिवेशनात जे भाषण केले, त्यात 'आमचे नव्वद टक्के शेतमजूर गुलाम आहेत. नुसती जमिनदारी नष्ट करून ते गुलाम स्वतंत्र होणार नाहीत. जमिनीचे वाटप कसणार्‍यांतच व्हावयास हवे', ही घोषणा केली. यातच त्यांची आर्थिक-सामाजिक दृष्टी स्पष्ट होते.

१९३७ मध्ये जगजीवनराम बिहार काँग्रेस मंत्रिमंडळाचे संसदीय सचिव झाले आणि त्यानंतर पुढे १९४६ मध्ये केंद्रीय श्रममंत्री झाले. त्या वेळी ते केवळ अडतीस वर्षांचे तरुण होते. पण त्यांच्या कामातील कौशल्य व तडफ वाखाणण्यासारखी होती. बाबूजींची कर्मभूमी बिहार असल्यामुळे खाण कामगारांच्या शोषणाची त्यांना कल्पना होती. त्यांचे दुःख-कष्ट ते समजू शकत होते. यामुळे त्यांचे मन कष्टी होते. म्हणूनच श्रममंत्रिपदावर असताना कामगारांच्या हितासाठी त्यांनी अनेक कायदे केले. त्यांना न्याय दिला. श्रमिकांना एक सहकारी राष्ट्रकार्याचे भागीदार मानण्याची बाबूजींची दृष्टी समाजवादी समाजाकडे वाटचाल करणारी होती. बाबूजींनी आपल्या या कालावधीत स्वतंत्र भारतातील कामगारांच्या सर्वांगीण उन्नतीचा मार्ग आखला व त्या दृष्टीने पावले टाकली. कामगार-क्षेत्रातील त्यांच्या कार्याचे ॠण सर्वांना नेहमीच मान्य करावे लागेल.

१९५२ ते आजपर्यंतच्या कालावधीत बाबूजींनी संचार, रेल्वे, अन्न व कृषी आणि संरक्षण, आदी खाती सांभाळली. त्यांच्या अनुभवाचा व कार्यकुशलतेचा फायदा या खात्यांनी हाती घेतलेल्या योजनांना झाला. परंतु सर्वांत महत्त्वाची गोष्ट बाबूजींच्या कार्यात दिसून येते, ती ही, की प्रत्येक ठिकाणी देशाला स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी उचललेली पावले व त्या यशस्वी होण्यासाठी जिद्दीने व कौशल्याने केलेले प्रयत्‍न. त्यांच्याकडे जी जी खाती होती, त्यांत त्यांचा सुधारणेचा दृष्टिकोन होता. कार्यात व कार्यक्रमात तडफ होती.

स्वतंत्र भारताच्या सरकारात देशाच्या विकासासाठी, कामगारांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी कामे केली. परंतु हे करीत असताना हरिजनांना न्याय मिळेल, असे प्रयत्‍नही त्यांनी केले. एका अर्थाने शासकीय पातळीवर त्यांनी केलेले कार्य सामाजिक व आर्थिक सुधारणावादाचे प्रत्यक्ष कार्य आहे. ते करण्यासाठी लागणारी सामाजिक दृष्टी, तळमळ आणि प्रशासकीय कौशल्य त्यांच्याजवळ आहे, हे त्यांनी सिद्ध केले. १९६९ च्या काँग्रेस विभाजनानंतर त्याच वर्षी मुंबईत डिसेंबरमध्ये भरलेल्या ऐतिहासिक राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले मार्गदर्शन व १९७१ च्या बांगला देशाच्या स्वातंत्र्य-संग्रामाच्या वेळचे संरक्षणमंत्रिपद ही त्यांच्या जीवनातील दोन महत्त्वाची अभिमानस्थाने आहेत.

साधेपणा, बुद्धीची तीक्ष्णता, पण स्वभावातील गोडवा, ही बाबूजींच्या व्यक्तित्वाची लक्षणीय वैशिष्ट्ये आहेत. एका साहित्यिकाने त्यांची तुलना रानफुलाशी केली आहे. ती बोलकी आहे. त्यांच्या वाणीवर व भावपिंडावर संत वाङ्मयाचे संस्कार झालेले आहेत. पं. मदनमोहन मालवीय यांच्या तेजस्वी, पण शीतल अशा व्यक्तित्वाचा संस्कार त्यांच्यावर लहानपणी झाला. गांधीजींची महतीही त्यांनी तरुणपणी जाणली. गांधीजीही त्यांना 'अमूल्य रत्‍न' मानीत. या सर्वांचा बाबूजींच्या जीवनदृष्टीवर, विचारांवर, कृतीवर परिणाम झाला आहे.