• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य ८५

१९

संत नामदेव

सात शतके ओलांडूनही संत नामदेवांच्या टाळमृदंगाचा व हरिनामाचा गजर आजही उत्तर भारतात ऐकू येत आहे, हीच त्यांच्या अद्वितीय कार्याची जागती खूण आहे. मराठी संतांनी बांधलेल्या भक्तिमंदिराचा कळस खरा उत्तरेत आहे, म्हणून सातशे वर्षांनी श्रीनामदेवांचे पुण्य-स्मरण करताना पुन्हा त्या कालखंडाचे समाजचित्र डोळ्यांसमोर उभे राहते.

इ. स. १००० ते १६०० हा सगळा कालखंड एखाद्या भयाण, न संपणा-या रात्रीसारखा होता, इतिहासाला पडलेले ते एक दुःस्वप्न होते. समाजाचे समाजपण हरवले होते. जातिभेदांच्या अमानुष कुचंबणेत सगळा समाज जणू श्वास रोखून बसला होता. राजकीय अस्थिरता होती. भीषण वादळात स्वतःचे घरकुल सांभाळण्यासाठी माणसे धडपड करतात, तसे भयाकुल जीवन हा देश जगत होता. महाराष्ट्रात मराठी संतांनी याच कालखंडात आपले कार्य केले; समाजाला धीर दिला; हिंदू धर्माची मिरासदारी मिरवणा-या धर्मपंडितांनी देवांनाच बंदिवान करून ठेवले होते, त्या देवांना मुक्त केले. ज्ञानेश्वरांनी या ईश्वरी कार्याचा प्रांरभ केला आणि त्या भावंडांनी आपल्या जीवनात भोगलेल्या हालअपेष्टांनी व दिलेल्या नव्या विचारांनी समाजात नवी जागृती निर्माण केली. ज्ञानेश्वर ही ज्ञानाची मूर्ती होती, तर त्याचे समकालीन नामदेव ही मुमुक्षूंच्या आर्ततेची, भक्तांच्या व्याकुळतेची मूर्ती होती.

मराठी संतांच्या कार्याचा हा पाचशे वर्षांचा कालखंड राजकीयदृष्ट्या चैतन्यहीन वाटला, तरी संतांच्या कार्यामुळे भक्तिमार्गाच्या व सारस्वताच्या क्षेत्रात तो बहरलेला वाटतो. या काळाने कैवल्यवृक्षाचे अनेक बहर पाहिले. ज्ञानेश्वर-नामदेव ही याच कैवल्यवृक्षावरची उमललेली फुले होती.

नामदेवांच्या कार्याची दोन चिरस्मरणीय वैशिष्ट्ये मानता येतील. एक तर नामदेव आपला प्रदेश सोडून उत्तरेत आले. वाटेत सर्वत्र भक्तिमार्गाचा प्रचार करीत सुमारे वीस वर्षे पंजाबमध्ये राहिले. पंढरपूरपासून पंजाबपर्यंत त्यांनी केलेली ही भक्तियात्रा हे नामदेवांचे अलौकिक कार्य आहे. दळणवळणाची साधने नसताना, स्वतःची भाषा वेगळी असताना, जवळ कोणतेही साधन नसताना नामदेवांनी केलेले हे भक्तिमार्गाच्या प्रचाराचे कार्य उत्तरेतील कबीरांसारख्या संतांना प्रेरणादायक ठरले. उत्तर हिंदुस्थानात 'जवळिकीची सरोवरे' त्या काळात नामदेवांनी निर्माण केली. नामदेवांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, चोखामेळ्यासारख्या, समाजाने अस्पृश्य ठरविलेल्या भक्ताचा, शिष्य या नात्याने त्यांनी स्वीकार केला, हे होय. 'मज दूर दूर हो म्हणती । तुज भेटूं कवण्या रीती ॥ असे कळकळीने सांगणारा चोखामेळा हे त्या काळच्या मानवनिर्मित सामाजिक विषमतेच्या दुःखाचे आर्त रूप होते. नामदेवांचे पंजाबमधील शिष्यही वेगवेगळ्या जातींतील होते. यावरून नामदेवांचा सामाजिक समतेचा विचार हा केवळ अभंगांत आणि कीर्तनांत राहिला नाही; तर आपल्या नामसंकीर्तनात सगळ्या जातींना सहभागी करून घेण्याची दृष्टी त्यांनी व्यवहारात दाखविली. या दोन्ही दृष्टींनी नामदेवांचे कार्य हे अविस्मरणीय व अद्वितीय आहे. म्हणूनच सातशे वर्षांनी नामदेवांचे स्मरण करताना त्यांचा वारसा हा भारताच्या एकात्मतेचा वारसा आहे, हे विसरून चालणार नाही. नामदेवांनी सातशे वर्षांपूर्वी पुरस्कारलेले समतेचे तत्त्व अजूनही समाजात रुजलेले नाही. हे शल्य दूर करण्याच्या कामी नामदेवांची शिकवणूक निश्चितच शक्तिदायी ठरेल.

नामदेवांच्या वाङ्मयात भक्तिवेड्या मनाचे उसासे, उद्रेक आहेत. ज्ञानदेवांनीच 'परि नामयाचें बोलणें नव्हे हें कवित्व । हा रस अद्‍भुत निरुपम॥' असे त्यांच्याविषयी म्हटले होते. त्यांची शब्दकळा मनोहर होती. नामदेवांची ही वाङ्मयमूर्ती गोजिरी आहे. आपल्या अभंगवाणीने व टाळमृदंगांनी परमार्थक्षेत्रात सातशे वर्षांपूर्वी मुलूखगिरी करणा-या, नामामृताचा हा मेघ उत्तरेपर्यंत नेऊन, तेथे सहस्रधारांनी भक्तिरसाचा वर्षाव करणा-या नामदेवांची आठवण आज महाराष्ट्रच नव्हे, सारा भारत करीत आहे.