• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य ७५

राजर्षि शाहू महाराज हे ब्रिटिशांच्या राजवटीतील संस्थानिक होते आणि याच्या मर्यादा त्यांच्या काही धोरणांना पडणे स्वाभाविक होते. पण देश-काल-परिस्थितीच्या मर्यादा सर्वांनाच पडतात. त्यांपलीकडे जाऊन ज्यांचे कार्य दूरगामी परिणाम घडवून आणते, त्यांचे नाव इतिहासात अजरामर होते. शाहू महाराजांचे नाव या कारणास्तव अजरामर झाले. तसे पाहिले, तर संस्थानिक अनेक होते, पण शाहू महाराज हे केवळ संस्थानधिपती म्हणून मोठे ठरत नाहीत. त्यांच्या राजसत्तेला सामान्य जनतेच्या कळवळ्याचे लेणे चढले होते. कोल्हापूर संस्थानात त्यांनी विद्या, कला, व्यापार, उद्योग, इत्यादी क्षेत्रांत जे नवे चैतन्य निर्माण केले, ते स्वतःचा बडेजाव वाढविण्यासाठी नव्हे, तर या अनेकविध क्षेत्रांतील गुणिजनांना प्रोत्साहन देऊन, आपल्या राज्यात विद्या, कला, व्यापार, क्रीडा यांची भरभराट व्हावी आणि त्यायोगे आपल्या प्रजाजनांचे भले व्हावे, ही प्रेरणा त्यामागे होती, त्यामुळे गुणिजनांना, अनाथ व एकाकी लोकांना फार मोठा आधार होता.

राजर्षि शाहू महाराजांनी घडविलेल्या सामाजिक परिवर्तनाचे रहस्य आणि वैशिष्ट्य हे, की त्यांनी जे विविध उपक्रम केले, ते चिरस्थायी ठरतील, अशी त्यांची बांधणी केली. कित्येक वेळा मोठी माणसे काही उपक्रम सुरू करतात आणि त्यांच्यानंतर त्यांचे कार्य नष्ट होते. आपल्याकडे कोणत्याही कार्याला संस्थारूप देण्यात आपण अयशस्वी ठरतो. यामुळे ज्या व्यक्तीने एखादे कार्य उभारले, ती बाजूला झाली की, या कार्याचा मागमूस राहत नाही. ज्या समाजाचे संस्थात्मक जीवन भरभक्कम असते, तोच समाज पराक्रम गाजवू शकतो. शाहू महाराजांनी हे ओळखले होते. याबाबतीत त्यांची दृष्टी शास्त्रशुद्ध आणि आधुनिक होती.

एखाद्या व्यक्तीच्या गरजेतून एखादा उपक्रम शाहू महाराजांनी सुरू केला असेल, पण त्यालाही चिरस्थायी संस्थारूप देण्याची दक्षता त्यांनी घेतली. या संदर्भात मराठा वा इतर बोर्डिंगांची कल्पना उल्लेखनीय ठरेल. श्री. पी. सी. पाटील यांनी आपल्या आत्मचरित्रात मराठा बोर्डिंगची कल्पना कशी साकार झाली, याची हकीकत निवेदन केली आहे. पी. सी. पाटील हे कोल्हापूर संस्थानामधील मराठा समाजातील पहिले व वरच्या क्रमांकाने मॅट्रिकमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. महाराजांना हे कळताच त्यांनी पी. सी. पाटलांना बोलावणे धाडले आणि खानावळ कोठे होती, याची चौकशी केली. आपण व आपला मित्र असे एका ब्राह्मणाच्या खानावळीत जेवत होतो. पण आम्ही दोघे मराठा म्हणजे वेगळी पंगत असे आणि ताट-वाटी नंतर धुवावी लागे, म्हणू खोलीवरच जेवण करीत होतो, असे पी.सीं.नी सांगितले. लगेच महाराजांनी मराठाच नव्हे, तर निरनिराळ्या समाजांतील विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंगांची व्यवस्था केली, व्यक्तीच्या गरजेतून संस्थेचा जन्म झाला आणि कोल्हापूर संस्थानच्या या विद्यार्थी बोर्डिंगांनी फार मोठी कामगिरी बजाविली. बोर्डिंगाचा लाभ घेतलेले असंख्य विद्यार्थी आहेत.

शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि त्याचा लाभ सर्व जातींच्या लोकांना मिळावा, हा महाराजांचा कटाक्ष होता. म्हणून त्यांनी अनेक सोयी व सवलती उपलब्ध करून दिल्या. परंतु केवळ शाळा, महाविद्यालये, बोर्डिंग, शिष्यवृत्त्या एवढेच करून शाहू महाराज थांबले नाहीत. त्यांनी आपल्या महाविद्यालयात उत्तमोत्तम शिक्षकवर्ग प्रयत्‍नपूर्वक आणला. डॉ. बाळकृष्ण यांच्यासारख्या तज्ज्ञांची त्यांनी नेमणूक केली, हेही त्यांच्या गुणग्राहकतेचे उदाहरण म्हणून सांगता येईल. या बाबतीत त्यांनी कधी जातीपातीचा विचार केला नाही. त्यांनी कै. रानडे व कै.गोपाळ कृष्ण गोखले यांचा आदर्श ठेवला होता. १९१८ च्या नोव्हेंबरमध्ये मुंबईत ब्राह्मणेतर समाजापुढे भाषण करताना महाराज म्हणाले,

‘ज्यांच्या मृत्यूमुळे जनतेला अतिशय तळमळ लागून राहिली, असे माझे मित्र न्यायमूर्ती रानडे व गोपाळराव गोखले यांनी मागासलेल्या लोकांची सुधारणा करण्यासाठी प्रयत्‍न केले होते. मागासलेल्या लोकांमध्ये शिक्षणप्रसार करण्यासाठी महत्प्रयास केले पाहिजेत, ही गोष्ट प्रथम मी त्यांच्यापासून शिकलो.’