• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य २३७

साहित्याप्रमाणेच इतर क्षेत्रांतील या जिल्ह्याची परंपरा थोर आहे. आगरकरांच्या सामाजिक सुधारणावादापासून ते कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी सुरू केलेल्या तपश्चर्येपर्यंत या सर्व परंपरेमध्ये सामाजिकतेचा एक अखंड प्रवाह आहे. राष्ट्रीय चळवळीत तर या जिल्ह्याचे सारे जीवनच स्वातंत्र्याच्या भावनेने मंतरलेले होते. संशोधन व अध्यात्म या क्षेत्रात ब्रह्मेंद्र स्वामी, गोंदवलेकर महाराज, स्वामी केवलानंद सरस्वती यांनी आपला अधिकार प्रस्थापित केला आहे. या जिल्ह्यात व सर्व परिसरात औद्योगिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रांत ज्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली, त्या सर्वांचा नामनिर्देश मी केलेला नाही, याची मला जाणीव आहे. पण त्यामुळे त्यांच्या कार्याचे महत्त्व कमी आहे, असे नाही. या सर्वांची या वेळी कृतज्ञतापूर्वक मनोमन आठवण मी करीत आहे.

मी साहित्यसमीक्षक नाही. एक रसिक मराठी भाषक साहित्यप्रेमी आहे. आजच्या विद्वान अध्यक्ष ललित व समीक्षात्मक साहित्याच्या श्रेष्ठ अधिकारी आहेत. तेव्हा साहित्यविषयक प्रश्नांचा ऊहापोह त्या करतीलच. पण साहित्यप्रेमी हाही आजच्या लोकशाही युगात एक नम्र समीक्षक असतोच; आणि त्या दृष्टीने काही विषयांना मी स्पर्श करणार आहे. प्रथमतः एक समीक्षा करण्यासारखी आहे, ती म्हणजे वैचारिक प्रवर्तन व प्रबोधनाच्या दृष्टीने मराठी साहित्यात काय झाले.

एका अर्थाने भारतीय प्रबोधनाची सुरुवात बंगालबरोबर महाराष्ट्रात झाली. काय घडले व काय घडावयास हवे, हेही पाहणे सयुक्तिक ठरेल. न्या. रानडे यांनी मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन १८७८ मध्ये पुण्यास भरविले. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय प्रबोधनास मराठी साहित्यिकांनी व पत्रकारांनी हातभार लावला. १९४७ मध्ये भारतीय समाजाचे स्वातंत्र्यपर्व सुरू झाले. आता रचनापर्व सुरू झाले आहे. भारतीय समाजाच्या जागृतीचा नवा काळ आला आहे. जे हक्क राज्यघटनेने आपल्या समाजातील उपेक्षितांना दिले आहेत, त्यांची जाण नव्या पिढीत आली आहे. तेव्हा ही स्वातंत्र्यजात नवी पिढी आता जुन्या समाजरचनेविरुद्ध बंड करून उठते आहे. एके काळच्या उपेक्षितांच्या अंतरंगांत असलेले भावनांचे कढ साहित्यात दिसू लागले आहेत.

साहित्य हे थर्मामीटरमधील पा-यासारखे संवेदनशील असते, निदान असावे. समाजाच्या मानसामध्ये जे असते, तेच साहित्यात अवतरते. मराठी साहित्याचा इतिहास हेच सांगतो. आधुनिक काळात जो राष्ट्रवाद आला, जी राष्ट्रीय अस्मिता जागृत झाली, जे स्वातंत्र्याचे नवे विचार आले, त्यांचे परिणाम साहित्यावर झाले. भारतीय समाजाच्या या रचनापर्वात नव्या विचारांची व सर्वांगीण ज्ञानाची बीजे टाकत राहणे हेही साहित्यिकाचे महत्त्वाचे कार्य आहे. कारण त्या विचारांनी प्रेरित झालेले व भारलेले राजकीय कार्यकर्ते समाजाला पुढे नेत असतात. यासाठी वैचारिक व चिंतनशील वाङ्‌मयाची महती नजेरआड करण्यासारखी नाही. मला वाटते, ही सामाजिकता, ही  सामाजिक जाणीव, आपल्या सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा असते. म्हणून आता नव्या सामाजिक प्रबोधनाचे चिंतन करणारे साहित्य हेच उद्याच्या मराठी साहित्याचे स्वरूप असणार, अशी माझी धारणा आहे.

गेल्या पन्नास वर्षांत भारतात जे व्यक्तिस्वातंत्र्यवादी, मार्क्सवादी व गांधीवादी विचार आले, त्या सर्वांनी आपले व्यकिमत्त्व घडविले आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही. निदान माझ्या पिढीपुरते मी हे निश्चित म्हणतो. साहित्य कोणत्याही रंगाचे असले, तरी चालेल, पण आजूबाजूच्या परिस्थितीचा डोळसपणे अभ्यास करून, समाजात सर्व थरांत निर्माण झालेल्या अस्वस्थतेची जाणीव असणारे समाजचिंतन त्यात असले पाहिजे. आचार्य विनोबा भावे यांनी एकदा म्हटले होते, की लोकशाही हे प्रज्ञेचे राज्य असते. ही प्रज्ञा समाजाभिमुख असली पाहिजे. तरच ती समाजाचे परिवर्तन घडवून आणील, त्याला मार्गदर्शन करीत राहील. बुद्धीची कुवत वाढविणे, मने व्यापक करणे, जगातील नव्या प्रवाहांची समीक्षा करणे, स्वतःच्या संस्कृतीचा व परंपरेचा बुद्धिनिष्ठ अभ्यास करून, नव्या परिस्थितीला सुसंगत अशा मूलभूत परिवर्तनासाठी जनमानसाला तयार करणे ही पुढच्या पिढीतील चिंतनशील साहित्याची उद्दिष्टे असू शकतात. गेल्या शतकात मार्क्सने इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी सांगून एक प्रचंड विचारप्रवाह सुरू केला. या शतकातील टॉयनबीसारख्या इतिहासपंडिताने मानवी संस्कृतीचा अभ्यास करून, सर्जनशील चिंतनाचा आणखी एक नमुना आपल्यापुढे ठेवला. आज समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र अशा अनेकविध ज्ञानशाखांचा उपयोग करून आपल्या इतिहासाचे, आपल्या समाजाचे पुनरध्ययन करणे शक्य आहे. मराठीमध्ये अशा अभ्यासाची गरज आहे.