• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य २३२

भारताच्या राजधानीतील भिन्नरुची समाजाचे अशा प्रकारे यथाशक्ति रंजन करणा-या मराठी रंगभूमीची परंपरा फार जुनी आहे. 'जैसें चेष्टें सूत्राधिन दारूयंत्र' या शब्दांत ज्ञानेश्वरांनी कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाचा निर्देश केला आहे. लळितांची परंपरा उत्तर भारतातील रामलीलेइतकीच जुनी आहे. स्वराज्याच्या उत्कर्षाच्या काळात होनाजी-बाळा, राम जोशी, अनंत फंदी, सगन, प्रभाकर, परशुराम यांच्यासारख्या शाहिरांनी लोकनाट्याच्या द्वारा जनतेचे व अधिकारी वर्गाचे खूपच रंजन केले. तंजावरास भोसले राजांनी मराठी नाटके लिहिली आणि करविली. १८४३ साली विष्णु अमृत भावे यांनी सांगलीकरांच्या प्रेरणेने पौराणिक नाटकांचा नवीनच प्रयोग करून दाखविला. यानंतर अनेक पौराणिक नाटक कंपन्या जन्माला आल्या. त्यांनी नाट्य व संगीत या दोहोंचाही विकास साधला. रंगभूमीवरील नाट्याची अशा प्रकारे लोकशाहिरांकडून जोपासना होत असतानाच शास्त्री मंडळी व इंग्रजी शिकलेले विद्वान लोक संस्कृत व इंग्रजीमधील उत्तमोत्तम नाटके भाषांतरित व रूपांतरित करून मराठी नाट्य-वाङ्‌मयात मोलाची भर घालीत होते. वि. ज. कीर्तने यांनी 'थोरले माधवराव पेशवे' हे ऐतिहासिक नाटक लिहिले व मराठी वाङ्‌मयात एक नवीनच दालन उघडले. संस्कृत नाटकातील कला व पौराणिक नाटकातील संगीत यांचा अपूर्व संगम अण्णासाहेब किर्लोस्करांनी 'सौभद्रा'त साधला.

हे नाटक रंगभूमीवर येऊन पाउणशे वर्षांच्यावर काल उलटून गेला आहे. पण आजही ते पहिल्या दिवसाइतकेच लोकप्रिय आहे. काळ बदलला, तंत्रविषयक कल्पनांत जमीनअस्मानाचा फरक पडला. गेल्या पाऊणशे वर्षांत अनेक प्रभावी नाटके रंगभूमीवर आली, पण 'सौभद्रा'चे स्थान अढळच राहिले. किर्लोस्करांच्या नाटकाची धाटणी पूर्णपणे पौर्वात्य आहे. ती धाटणी दीर्घकाल तशीच टिकणे शक्य नव्हते. पाश्चात्य राजकारण, पाश्चात्य वाङ्‌मय व पाश्चात्य तत्त्वज्ञान यांचा महाराष्ट्राच्या जीवनाशी संपर्क वाढत गेला. त्यामुळे एकीकडे किर्लोस्करांची 'सौभद्र' व 'शाकुंतल' ही संगीत नाटके रंगभूमीवर गाजत होती, तर दुसरीकडे आगरकरांसारखे समाजसुधारक 'हॅम्लेट' या जगप्रसिद्ध नाटकाचे रूपांतर करीत होते. शेक्सपियरची अशी अनेक नाटके पुढील दोन तपांत रंगभूमीवर आली. १९१० ते १९१५ पर्यंत यांपैकी काही नाटकांशी रंगभूमी अक्षरशः दुमदुमवून सोडली. 'हॅम्लेट' व 'त्राटिका' ही नाटके त्या वेळी लोकप्रियतेच्या शिखरावर होती. गणपतराव जोशी व बाळाभाऊ जोग या अभिनयसम्राटांची नावे या नाटकांबरोबरच घ्यावयास पाहिजेत. महाराष्ट्रात १८८२ ते १८९८ या सोळा वर्षांच्या अवधीत नाटकांची वाढ झपाट्याने झाली, याची गंगोत्री 'सौभद्र', 'शांकुतला' सारखी नाटके आणि वाङ्‌मयाची निर्मिती व प्रसार यांच्याविषयी महाराष्ट्राला वाटणारी आस्था, ही होय. 

गोविंद बल्लाळ देवळ हे या काळातील नाटककारांचे मुकुटमणी! त्यांच्या सात नाटकांपैकी 'झुंझारराव', 'मृच्छकटिक', 'शारदा' व 'संशयकल्लोळ' ही चार नाटके म्हणजे मराठी रंगभूमीवरील देदीप्यमान रतनेच. सर्वस्वी स्वतंत्र असे देवलांचे 'शारदा' हे एकच नाटक. यापूर्वीही सामाजिक नाटके लिहिण्याचा प्रयत्‍न झाला नाही, असे नाही. पौराणिक नाटकांच्या जोडीला रुचिपालट म्हणून सामाजिक प्रहसने करण्याचा प्रघात यापूर्वीच पडला होता. पण 'शारदा' हेच पहिलेवहिले सामर्थ्यशाली सामाजिक नाटक म्हणून मान्यता पावले. या नाटकाचा महाराष्ट्रावर इतका परिणाम झाला की, पुढे कित्येक वर्षे आपल्या मुलीचे नाव शारदा ठेवायला एकही माता धजली नाही. बालावृद्ध विवाहातील घोर अन्याय समाजाला देवलांनी 'शारदे'च्या रुपाने दाखविला. जिला वाचा नाही, अशा समाजातील अबलेची कहाणी देवलांची 'शारदा' रसाळ मुकेपणाने, मराठी मनाला, चिरंतन सांगत राहील.

देवलांच्या मागोमाग श्रीपाद कृष्ण कोल्हटकर व कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ह्या प्रतिभाशाली नाटककारांनी मराठी रंगभूमी गाजविली. कोल्हटकर म्हणजे मराठीतील विनोदाचा ओनामा! मराठी रंगभूमीला संगीत व विनोद यांची अगदी नव्या पद्धतीने जोड करून देणे हेच त्यांच्या प्रतिभेचे कार्य. १९०० ते १९१० या दशकात मराठी रसिकांनी कोल्हटकरांची 'वीरतनय', 'मूकनायक', 'गुप्तमंजूष', 'मतिविकार' ही नर्मविनोदाने नटलेली नाटके मोठ्या आवडीने पाहिली. एका हातात शेक्सपिअर आणि दुस-या हातात मोलिअर घेऊन त्यांनी अद्‍भुतरम्य कथानकांत हास्यरसाचा मनमुराद शिडकावा केला. कोल्हटकरांनी आपल्या नाटकांमधून सामाजिक समस्यांचे दर्शन घडविले, तर नाट्याचार्य खाडिलकरांनी आपली लेखणी आणि वाणीच नव्हे, तर प्रत्यक्ष जीवनही स्वातंत्र्याच्या चळवळीला वाहिले. साहजिकपणेच उत्कट देशभक्ती हा त्यांच्या नाट्यकृतींचा स्थायिभाव झाला.