५६
नव्या प्रेरणांना साथ देऊ या
मुख्यमंत्री म्हणून दररोज मला अनेक माणसांना भेटायची संधी मिळते. काहीजण माझ्याकडे कामासाठी येतात; त्याचप्रमाणे समारंभाच्या, दौ-याच्या किंवा कामकाजाच्या निमित्ताने मीही लोकांच्या भेटीगाठी उत्सुकतेने घेत असतो. त्यामुळे महाराष्ट्रातील जिल्ह्या-जिल्ह्यांतून व लहानसहान खेड्यापाड्यांतून सध्या काय चालले आहे, हे विविध थरांतील नागरिकांकडून समक्ष ऐकण्याचा योग मला वारंवार येत असतो.
गेली सहा वर्षे किंवा थोडा अधिकच काळ हा क्रम अखंडितपणे चालला आहे. या काळात महाराष्ट्रातील शेकडो-हजारो बंधुभगिनींचे व माझे प्रत्यक्ष बोलणे होऊ शकले आहे. विविध थरांतील व विविध वयांचे हे नागरिक मजजवळ मनमोकळेपणे बोलले आहेत. आपली गा-हाणी, आपल्या अपेक्षा, आपल्या आशानिराशा त्यांनी मजपुढे मांडल्या आहेत. शासनाचा एक प्रतिनिधी या नात्याने मला जेवढे करता येईल, तेवढे त्यांच्यासाठी करण्याचा शक्यतो प्रयत्नही केला आहे. तथापि, येथेच त्यांचा माझा संबंध संपत नाही. ही मंडळी परत जाताना माझ्याजवळ काहीतरी मागे ठेवून जातात. एखादा बरा - वाईट अनुभव, एखादी भावना, ईर्ष्यायुक्त शब्द किंवा असेच काहीतरी मागे राहते आणि त्याचा माझ्या मनावरील संस्कार लवकर पुसला जात नाही.
तथापि, या प्रक्रियेतील एक फरक अलीकडेच माझ्या मनाला नव्यानेच जाणवू लागला आहे. विशेषतः, गेल्या एक-दोन वर्षांत तर त्याचा सुस्पष्टपणा अधिक लक्षात येऊ लागला आहे; आणि हा जो वेगळेपणा किंवा अनुभवांतील फरक मला जाणवू लागला आहे, त्याबद्दलचे माझे विचार किंवा माझे चिंतन म्हणा, या लेखात थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
हा वेगळेपणा निर्माण करणारी जी प्रमुख गोष्ट मला दिसते, ती अशी की, मराठी माणून नवमहाराष्ट्राच्या संस्थापनेमुळे निर्माण झालेल्या वेगळ्या प्रकारच्या प्रेरणांना अलीकडे विशेष उत्कटतेने साथ देऊ लागला आहे. महाराष्ट्रात या पिढीत आपण एक नवा इतिहास घडवीत आहोत, याची ईर्ष्यायुक्त जाणीव त्याच्या चेह-यावर दिसू लागली आहे; विशेषतः, तो जर तरुण असेल - चाळीशीच्या आत-बाहेर असेल, तर त्याच्या नजरेतून ती जाणीव अधिकच उत्कटतेने व्यक्त होऊ लागली आहे.
एखाद्या समाजात नवी ईर्ष्या निर्माण होणे ही अवघड गोष्ट समजण्यात येते. समाजातील सर्व थरांना जागृत करणारी, सा-या समाजाची अशी, सामुदायिक महत्त्वाकांक्षा किंवा ईर्ष्या निर्माण झाल्याशिवाय कोणताच समाज आपला उद्धार करून घेऊ शकत नाही. ब्रिटिशांशी झुंज देण्याच्या कालखंडात भारतभर समान प्रेरणा निर्माण करण्यासाठी त्या वेळच्या लोकाग्रणींना केवढे सायास पडले, हे आपल्याला माहीत आहे. केवळ राजकीय पुढा-यांना हे काम करता आले नसते. कादंबरीकार, नाटककार, कवी, शाहीर, इत्यादी कलाकारांनी नवे शब्द निर्माण केले व विविध क्षेत्रांतील कृतिवीरांनी त्या शब्दांमध्ये धृतीचा व कृतीचा नवा अर्थ ओतला. आज आपल्या देशात कशाची पुन्हा एकदा गरज असेल, तर ती अशा बलिष्ठ, शक्तिशाली इतिहास घडविणा-या नव्या समाजप्रेरणांची होय. आपला देश स्वतंत्र झाल्यापासून गेली पंधरा-सोळा वर्षे आपण ध्येयनिष्ठेने व चिकाटीने प्रगतीच्या रस्त्यावरून जी वाटचाल केली, ती जणू या प्रेरणांचीच निर्मिती करण्यासाठी होय. आतापर्यंतचा काळ हा एका प्रकारे जमिनीची मशागत करण्यात व योग्य त-हेचे बी-बीयाणे पेरण्यात गेला. परंतु आता नवप्रेरणांचे नवअंकुर फुटू लागलेले स्पष्टपणे दिसत आहेत.