• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य १४७

५१

वि. स. खांडेकर

मी आज कृतज्ञतेचे भाषण करणार आहे. ज्यांनी आमच्यावर काही संस्कार जर केले, विचार दिले आणि मराठी भाषेची थोर सेवा केली, अशा एका थोर विचारवंतासंबंधीची कृतज्ञता आहे. आज हा समारंभ पाहून मराठी माणसाबद्दल आणि मराठी भाषेबद्दलचा अभिमान पुन्हा अगदी उंचावून जातो. मराठी माणूस ज्या खुशीने आणि हौसेने खासबाग मैदानात कुस्ती बघतो, त्याच खासबाग मैदानामध्ये चांदण्याच्या आणि फुलांच्या कथा सांगणा-या श्री. भाऊसाहेब खांडेकरांचा हा मानसन्मानाचा समारंभ आज आपण अक्षरशः हजारोंच्या संख्येने एकत्र येऊन साजरा करीत आहोत, हे कुणालाही आनंद देणारे असे चित्र आहे. महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना मी सांगेन की, तुम्ही तुमच्या लेखणीच्या द्वारे आणि मराठी माउलीच्या द्वारे जी ज्ञानाची आणि सरस्वतीची सेवा करीत आहात, तिची पोच तुम्हां सर्वांना आज खासबाग मैदानावर जनतेने या सोहळ्याच्या रूपाने दिली आहे. या अर्थाने हा प्रातिनिधिक सत्कार-समारंभ आहे.

मी कृतज्ञतेचे भाषण करणार आहे, ते अशासाठी, की भाऊसाहेब हे गेली चाळीस-पन्नास वर्षे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या साहित्याच्या प्रकारांमध्ये लिहीत आलेत. मी लहानपणापासूनच, म्हणजे मराठी शाळेत जात असताना, मी परवा त्यांना त्याची दिल्लीला आठवण करून दिली होती - त्यांचे लेख वाचीत आलो आहे. ते शिरोड्याला असताना एका लहानशा साप्ताहिकात लिहीत असत. त्या साप्ताहिकाचे नाव होते 'वैनतेय' आणि आमच्या गावच्या लायब्ररीमध्ये जी छोटी पत्रे येत होती, त्या पत्रांमध्ये एकदा मी एक अनपेक्षित मथळा पाहिला. मथळ्याचे नाव होते : 'गाढवाची गीता' मी मनाशी म्हटले, 'गाढवाची गीता' लिहिणारा हा कोण माणूस आहे आणि खाली नाव पाहिले, तर वि. स. खांडेकर ! हे नाव प्रथम वाचले, ते तेव्हा, आणि ते मनात बसले. त्यानंतर 'किर्लोस्कर' मध्ये, 'यशवंत' मध्ये आणि इतर जी मासिके आहेत, त्यांत आपण अनेकांनी वाचल्या असतील, तशा मीही त्यांच्या कथा वाचीत आलो. कथांमागोमाग कांदब-या आल्या. टीकात्मक निबंध आले. सर्व काही आले. त्यांच्या शब्दचमत्कृती, त्यांच्या कल्पनाचमत्कृती यांच्यामुळे त्यांचे लिहिणे मला आकर्षित करीत होते. भाऊसाहेबांच्या कथा-कादंबरीतील नायकाला आठवण झाली, म्हणजे ती वा-याच्या झुळकीसारखी आल्हाददायक असायची. भाऊसाहेबांच्या नायिकेला भीती वाटली, तर ती भीती म्हणजे संध्याकाळच्या वेळी अंधारामध्ये जसे काहीसे विळविळले, म्हणजे वाटते, तशी ती भीती असायची. भाऊसाहेबांच्या नायकाने एखाद्या तरुणीच्या उजव्या गालावरची खळी पाहिली, म्हणजे आपण लहान असताना तळ्यात खडा मारल्यानंतर जे पाण्यात भोवरे फिरत-फिरत जातात, त्यांची त्यास आठवण व्हावयाची.

भाऊसाहेबांचे वाङ्मय वाचायला घेतले, म्हणजे बीजेची कोर आली नाही किंवा चवथीचे चांदणे आले नाही, असे कधी व्हायचे नाही. भाऊसाहेबांच्या वाङ्मयात निदान मी कधी अमावास्या पाहिली नाही. ती बीजेची कोर असेल किंवा चवथीचा चांद असेल किंवा अष्टमीचा चंद्रमा असेल, किंवा पुनवेचा चंद्र असेल. असा हा चांदण्याचा लेखक आहे. प्रकाशाचा लेखक आहे. सहृदय लेखक आहे. पण नुसता सहृदय लेखक नाही, तर भाऊसाहेबांच्या लेखामध्ये स्वप्नाळू सहृदयतेबरोबर निर्धारित क्रियाशीलताही आहे. भाऊसाहेबांना फुले व चांदणे फार आवडते. पण पुढे ते जसे जसे लिहीत गेले, तसे तसे त्यांचे वाढते वाङ्मय सातत्याने १९४० पर्यंत मी नियमाने वाचले.