• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शब्दाचे सामर्थ्य ११०

३२

भाऊसाहेब वर्तक

गेल्या वीस वर्षांच्या काळात महाराष्ट्रात अपेक्षा निर्माण करणारे जे कार्यकर्ते उदयास आले, त्यांत श्री. भाऊसाहेब वर्तकांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. वयाच्या पस्तिसाव्या वर्षी भाऊसाहेब ठाणे जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत त्यांनी दाखविलेली धडाडी, जिद्द आणि स्वीकृत कार्याला वाहून घेण्याचा त्यांचा गुण या गोष्टी माझ्या नजरेत विशेष भरल्या. भाऊसाहेब हे अण्णासाहेब वर्तकांचे थोरले चिरंजीव. ठाणे जिल्ह्यातील काँग्रेसची संघटना एकसंध ठेवण्यात अण्णासाहेबांनी जे यश मिळविले व त्यासाठी त्यांनी जी कार्यपद्धती स्वीकारली, त्यातून एक कार्यपरंपरा निर्माण झाली. या कार्यपरंपरेचा वारसा भाऊसाहेबांना मिळाला. परंतु वारसा मिळणे निराळे आणि वारसा टिकवून त्यात भर घालणे निराळे. या वारसा पुढे चालविण्यासाठी लागणारा सुज्ञपणा आणि दूरदृष्टी भाऊसाहेबांत असल्याचे त्यांनी सिद्ध केलेच; परंतु जिल्हा लोकल बोर्डाच्या अध्यक्षपदावरून आपल्या अंगी असलेल्या आगळ्या कर्तृत्वाची झलकही त्यांनी दाखविली. कर्तृत्व हे माणसाला चिकटविता येत नाही. चिकटविलेले कर्तृत्व फार वेळ टिकत नाही. कर्तृत्व हे कार्यातून फुलावे लागते. ते तसे फुलत असल्याचा प्रत्यय यावा लागतो. भाऊसाहेबांच्या बाबतीत मला हा प्रत्यय प्रकर्षाने आला आणि महाराष्ट्रात एक जिद्दीचा, प्रखर कार्यनिष्ठा असलेला कार्यकर्ता उदयास येत आहे, अशी भाऊसाहेबांचे त्या वेळचे कार्य पाहून माझी खात्री झाली; आणि म्हणूनच गृहनिर्माण मंडळाच्या अध्यक्षपदाचे फार मोठे काम, भाऊसाहेबांना त्या क्षेत्रातला विशेष अनुभव नसतानाही, मी मोठ्या विश्वासाने त्यांच्याकडे सोपविले. अनुभव या कार्यातून मिळवावयाचा असतो. त्यासाठी मनाची एक विशिष्ट बैठक, तो ग्रहण करण्याची पात्रता व कार्यपद्धतीची निश्चित दिशा असावी लागते. या गुणांनी युक्त असलेले व्यक्तिमत्त्व मला भाऊसाहेबांत दिसले आणि त्यांच्यावर मी टाकलेला विश्वास अनाठायी नसल्याचे त्यांनी आपल्या कार्याने सिद्ध केले. गृहमंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी स्पृहणीय ठरलीच. परंतु विशेष म्हणजे, प्रशासकीय क्षेत्रात त्यांनी आपल्या कामगिरीने स्वतःचे असे एक विशिष्ट स्थान निर्माण केले. मंत्री म्हणून पुढे त्यांनी केलेले कार्य नजरेखालून घालताना पहिल्याने त्यांच्या कोणत्या गुणाचे दर्शन होत असेल, तर ते त्यांच्या त्या प्रशासकीय कौशल्याचेच. भाऊसाहेबांच्या शासकीय कामातील हीच त्याची मोठी ताकद आहे.

राजकीय क्षेत्रात कार्यकर्ता उभा राहू शकतो, तो पक्षसंघटनेच्या जोरावर आणि पक्षसंघटनेसाठी त्याने केलेल्या कार्यावर. पक्षसंघटनेचे काम हे कार्यकर्ते तयार करण्याचे काम आहे. कार्यकर्त्यांत विश्वास आणि निष्ठा निर्माण करूनच पक्षसंघटनेचे कार्य विस्तारत जाते. संघटनेच्या कार्यातील ही विधायक दृष्टी भाऊसाहेबांना असल्यामुळे ठाणे जिल्ह्यात ते प्रभावी पक्षसंघटना उभी करू शकले व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांनी केलेले कार्य मान्यता पावले. अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन असो अगर महाराष्ट्र प्रदेशचे एखादे शिबिर असो किंवा विधानसभा वा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असोत, त्यासाठी लागणारी यंत्रणा अल्पावधीत उभी करण्यात भाऊसाहेबांचे संघटना-चातुर्य कसोटीस लागले. सा-या जबाबदा-या त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने आणि धडाडीने पार पाडल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी अशीच उत्तम रीतीने सांभाळली आहे.