• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शैलीकार यशवंतराव ९९

कुलसुमदादी मनाने प्रेमळ होती, पण वाईटाला वाईट म्हणून फटकारण्यास ती कमी करत नसे.  यशवंतराव लिहितात, ''माझी आजी तिला सांगायची, कुलसुम आपण गरीब माणसे, दुसर्‍याबद्दल असं कशाला बोलायचं ?  तर ती म्हणे, ''तो क्या हुआ ?  अगं आवई जे वंगाळ ते वंगाळच.''  आणि माझ्याकडे वळून म्हणायची, ''क्यू बेटे, अपनेकू किसका डर है ?''  आणि जशी यायची तशी वार्‍यासारखी निघून जायची.''  अशा प्रकारे यशवंतरावांनी कुलसुमदादीच्या बिनधास्त स्वभावावर प्रकाश टाकला आहे.  ती गेली तरी गावाकडे अजूनही तिचा आवाज घुमतो आहे, असे यशवंतरावांनी कुलसुमदादीच्या प्रेमाचे, जिव्हाळ्याचे, तिच्या फटकळ स्वभावाचे आणि यशवंतरावांतील तिच्या वात्सल्यपूर्ण प्रेमाचे हृदयस्पर्शी व्यक्तिचित्र रेखाटले आहे.  खेड्यातील माणसांचे एकमेकांबद्दल स्नेहाचे, प्रेमाचे, माणुसकीचे, आपुलकीचे संबंध, ना तेथे जात असते ना धर्म असतो.  फक्त जिव्हाळा.  यशवंतरावांनी तो नेमका चित्रित केला आहे.  या व्यक्तिचित्रणात करुणरम्य प्रसंग, उदात्त, उत्कट, माहितीच्या तपशीलांनी परिपूर्ण चित्रित केलेल्या घटना.  यामुळे हे निर्व्याज व निष्पाप व्यक्तिचित्र दीर्घकाळ स्मरणात राहणारे आहे.

यशवंतरावांच्या हातून इतर माध्यमातून जीवनानुभवाचे विचार मांडत असताना त्यांच्या जीवनात ज्या व्यक्ती आल्या त्यांचे चित्र रेखाटण्याचे प्रयत्‍न त्यांनी केले आहेत.  यशवंतरावांनी ज्या व्यक्ती साकार केल्या आहेत त्यांच्यापैकी पुष्कळांशी त्यांचा जवळचा संबंध आला आहे, काहींचा त्यांना सहवासही लाभला आहे, तर काही कुटुंबातील आहेत.  आई विठाबाई, सौ. वेणूताई, यतींद्रनाथ दास, अहमद कच्छी, श्री. निकम, राघुअण्णा लिमये, रावसाहेब पटवर्धन, आचार्य भागवत, मानवेंद्रनाथ रॉय, साने गुरुजी, श्री. आनंदराव चव्हाण, श्री बाळासाहेब देसाई, डॉ. देशपांडे, श्री. यशवंतराव पार्लेकर, राजाजी, के.डी. पाटील, श्री. भुस्कुटे, श्री. विठ्ठलराव पागे, व्यंकटराव ओगले, श्री. सदाशिवराव पेंढारकर, श्री. केशवराव पाटील, श्री. आत्माराम बापू, बंधू गणपतराव, कृष्णा धनगर या सर्वांची व्यक्तिरेखा अगदी मोजक्या शब्दात 'कृष्णाकाठ'मध्ये ते साकार करतात.  या व्यक्तींच्या जीवनातील 'काव्य' आणि 'नाट्य' स्पष्ट करतात.  यशवंतरावांना चिरपरिचित असलेल्या अनेक थोरामोठ्यांची शब्दचित्रे वा व्यक्तिचित्रे 'कृष्णाकाठ' मध्ये आत्मानुभव कथनाच्या माध्यमातून सहज येऊन जातात.  महाराष्ट्रातील राजकारणी स्त्री पुरुषांची स्वभावचित्रे सुबकपणे रेखाटलेली दिसतात.  एस. एम. जोशी, वसंतराव नाईक, तुळशीदास जाधव, रत्‍नाप्पा कुंभार, भाऊसाहेब वर्तक, उद्धवराव पाटील, भाऊसाहेब बांदोडकर, यशवंतराव मोहिते, मधुकरराव चौधरी, वसंतदादा पाठील, नरुभाऊ लिमये, विठ्ठलराव विखे पाटील, दादा उंडाळकर, शंतनुराव किर्लोस्कर, बाबूराव शेटे, ह.न.जोशी. कृ.भा. उर्फ अण्णासाहेब बाबर, डॉ. बिधनचंद्र रॉय, श्री. पुरुषोत्तम दास टंडन, श्री. लक्ष्मण गोविंद पाटील, भाऊसाहेब हिरे, सर रेजिनाल्ड स्पेन्स, श्री. एल.एन. भोईर, डॉ. एम.यू. मस्कोरेन्यास, डॉ. एस.बी.मांजरेकर, डॉ. सुब्बरायन, श्री. एम.टी. ठाकरे अशी राजकारण, पत्रकारिता, साहित्यिक इत्यादी विविध क्षेत्रांतील अतिशय वेधक अशी व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत.  व्यक्तींचा गुणगौरव, त्यांची एकसष्टी, त्यांचा सन्मान, त्यांची ध्येयपूर्ती अशा विविध निमित्तांनी यशवंतरावांनी ही व्यक्तिचित्रे लिहिली आहेत.  या व्यक्ती समाजातील विविध स्तरांतील आहेत.  ''सर्वांच्याच जीवनात अशा अनेक व्यक्ती येऊन जातात की ज्या फक्त येतात आणि जातात एवढेच नव्हे तर काही सांगून व काही देऊन जातात.  माझ्या जीवनात अशा अनेक अविस्मरणीय शक्ती आल्या आणि गेल्या.  त्यांची स्मृतिचित्रे रेखाटावी असे मनात होते आणि आहे.''  अशाच व्यक्तींच्या माध्यमातून लेखकाने मनुष्यस्वभावातील विविधता, विसंगती, स्वभाव, कर्तृत्व, दोष यावर प्रकाश टाकला आहे.  या व्यक्तींबद्दल त्यांच्या मनात जसा आदर आहे तसा जिव्हाळाही आहे.  यातील काही व्यक्ती वयाने त्यांच्यापेक्षा मोठ्या आहेत, काही समवयस्क आहेत, तर काही मरण पावलेल्या आहेत.  त्यामुळे या व्यक्तींच्या चित्रणात काही वेळा मित्रत्वाचा हक्क आणि सलगीही येऊन मिसळते तर केव्हा जुन्या आठवणींना उजाळा देणे आणि त्या व्यक्तींबद्दल आदरभार व्यक्त करणे एवढेच शिल्लक राहते.

यशवंतरावांच्या या व्यक्तिचित्रणांची भूमिका ही नानाविध स्वरूपाची आहे.  यशवंतरावांची ही व्यक्तिचित्रणे मानवी जीवनाचे दर्शन घडविणारी आहेत.  मानवी स्वभावांच्या विविध गुणदोषांचे आविष्कार करणारी आहेत.  त्यातील जटिलता प्रकट करणारी आहेत.  त्यामुळे त्यातून घडणारे चिरंतन जीवनमूल्य हे वाचकांच्या जीवन जाणिवा समृद्ध करावयास साहाय्यभूत अशाच स्वरूपाचे आहे.  यशवंतराव त्या त्या व्यक्तींच्या गुणांबरोबर त्यांचे दोष किंवा त्यांच्या मर्यादाही ओळखतात आणि तितक्याच स्पष्टपणे ते सांगतात.