• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शैलीकार यशवंतराव ९७

प्रकरण १२ - भावलेल्या व्यक्ती

मराठी ललित गद्यामध्ये आणखी एक समाविष्ट केलेल्या वाङ्‌मय प्रकार म्हणजे व्यक्तिचित्रांचा.  हा वाङ्‌मयप्रकार मराठीमध्ये साधारणतः इ.स. १९३५-४० नंतरच पाहावयास मिळतो.  मराठीमध्ये लक्ष्मीबाई टिळकांच्या 'स्मृतिचित्रां'पासून व्यक्तिचित्रणास प्रारंभ झाला असे मानले जाते.  व्यक्तिचित्रासाठी शब्दचित्र, स्वभावचित्र इ. वेगवेगळे शब्द प्रचलित आहेत.  साहित्यामध्ये साहित्यिक जेव्हा नवनिर्मिती साधतो तेव्हा तो आपल्या अभिव्यक्तीसाठी वेगवेगळी माध्यमे शोधत असतो.  यामध्ये व्यक्तिचित्र किंवा शब्दचित्र हे एक प्रभावी असे माध्यम आहे.  कुमार रघुवीर यांचा 'हृदय' हा व्यक्तिचित्रसंग्रह.  व्यक्तिचित्रात शब्दांनी काढलेले चित्र हवे.  कथानक पार्श्वभूमीसारखे येते.  व्यक्ती व प्रसंग यांचे सूचक शब्दांत परिणामकारक व थोडक्यात काढलेले चित्र येते.  त्यामुळे अशी शब्दचित्रे भावगीतासारखी असतात.  रेखाचित्रामध्ये चित्रकार आपल्या पेन्सिलच्या उभ्या-आडव्या रेषांनी एखाद्या वस्तूचे किंवा व्यक्तीचे जिवंत चित्र उभे करतो.  त्याचप्रमाणे साहित्यकार शब्दांच्या साहाय्याने असे संपूर्ण व जिवंत चित्र साकार करतो.  म्हणून याला व्यक्तिचित्र किंवा शब्दचित्र असे म्हटले जाते.  ''व्यक्तिचित्र हे प्रथम शब्दांनी काढलेले चित्र असते.  नंतर ते कथानक वगैरेमुळे कदाचित लघुकथेतही मोडेल पण त्यात कथानक असले तरी किंवा नसले तरी ते अगदी गौण होय.  म्हणजेच कथानकाला व्यक्तिचित्रात पार्श्वभूमीचे स्थान असते.  एखादी व्यक्ती, एखादा प्रसंग किंवा एखादे दृश्य आणि त्यामुळे उद्भूत झालेले मनोविकार यांचे सूचक शब्दांत परिणामकारक व थोडक्यात काढलेले चित्र तेच व्यक्तिचित्र.''  असे व्यक्तिचित्राचे स्वरूप कुमार रघुवीर यांनी व्यक्त केले आहे.  व्यक्तिचित्रामध्ये व्यक्तीच्या स्वभावावर अधिक भर दिला जातो.  तसेच या वाङ्‌मयप्रकारात वास्तवाविष्काराला अधिक महत्त्व असते.  व्यक्तीच्या स्वभावाला आणि 'भाव' दर्शनाला महत्त्व असते.  'व्यक्तिचित्र' हे कथा व कादंबरी, नाटक, निबंध इ. प्रकारचे अल्प- विकसित रूप आहे.  कारण या वाङ्‌मयप्रकारात काल्पनिकताही असू शकते.  व्यक्तिचित्र हे इजिप्‍तच्या चित्रलिपीप्रमाणे आहे.  ते प्रभावशाली व सांकेतिक असते.  कारण त्याच्यामध्ये थोड्याशा शब्दात पुष्कळ काही सांगण्याची शक्ती असते.  कोणत्याही एका दृश्य चरित्र किंवा घटनेला प्रकट करणारी सरळ व सुघटित लघु रचना म्हणजे शब्दचित्र होय.  अशी शब्दचित्राची परिभाषा 'ए हँडबुक टू लिटरेचर' या ग्रंथात दिली आहे.  शब्दचित्र हा शब्द इंग्रजी 'स्केच' या शब्दाला पर्यायी म्हणून मराठीमध्ये रूढ झाला असावा.  हिंदीमध्य 'स्केच' साठी 'रेखाचित्रे' हा शब्द प्रचलित आहे.

स्वभावचित्रलेखन चरित्रलेखनापेक्षा कठीण काम आहे.  स्वभावचित्रासाठी लेखकाजवळ सूक्ष्म निरीक्षणशक्तीची आवश्यकता असते.  स्वभावचित्र चरित्रापेक्षा आकाराने छोटे असते.  याच्यामध्ये वस्तुनिष्ठतेबरोबर वैयक्तिकता महत्त्वाची असते.  ''शब्दचित्रात लेखक हा अधिक वस्तुनिष्ठ असतो.  आपली आत्मपरता तो त्यात सूचकतेने व्यक्त करतो हे खरे; पण लघुकथेने त्याच्या आत्मनिष्ठेला जेवढा अवसर मिळतो तेवढा तो शब्दचित्रात मिळू शकत नाही.  शब्दचित्रात वातावरणाला जात्याच महत्त्व प्राप्‍त झालेले असते आणि सभोवतालच्या परिस्थितीशी समरस होण्याची शक्ती ज्या लेखकात विशेष असेल तो अशी शब्दचित्रे उठावदार रीतीने लिहू शकतो.  लघुकथेला काव्य प्रकारातील भावगीत म्हटले तर शब्दचित्रे ही त्यातील नाट्यगीतेच होय.  असे आहे म्हणूनच एक प्रकारे लघुकथेपेक्षाही जिवंत शब्दचित्रे निर्माण करणे हे कलेच्या दृष्टीने अवघड काम आहे.''  असे व्यक्तिचित्राबाबत मराठीतील प्रसिद्ध समीक्षक डॉ. वामन भार्गव पाठक लिहितात.  व्यक्तिचित्रणामध्ये एखाद्या प्रसंगाचे, स्थळाचे किंवा व्यक्तीचे तटस्थपणे चित्रण केले जाते.  ''या वाङ्‌मयप्रकारात व्यक्ती, व्यक्तीचा लोकविलक्षण स्वभाव आणि तो स्वभाव व्यक्त करणारे मोजके पण प्रभावी प्रसंग, यांचीच विशेष गरज असते.  म्हणून हा वाङ्‌मयप्रकार म्हणजे कथेच्या पोटात सामावण्याची शक्यता असलेला प्रकार आहे.  म्हणून व्यक्तिचित्र कथेच्या धाकट्या भावंडासारखे असले तरी त्यात कथा संबोधता येणार नाही.''  मराठी साहित्यामध्ये व्यक्तिचित्र व कथा यांचा घनिष्ठ संबंध आहे.  व्यक्तिचित्राचा संबंध हा नेहमी वास्तव जीवनाशी असतो.  तसेच व्यक्तिचित्रणात व्यक्तीच्या जीवनातील चढ-उतारांचे चित्रण अधिक केले जाते.  व्यक्तिचित्रणामध्ये व्यक्ती, स्थान, घटना, दृश्य यांचे असे वस्तुगत वर्णन असते की ज्यामध्ये बाह्यवैशिष्ट्यांचा परिचय होतो.  व्यक्तिचित्रांचा आकार आणि स्वरूप असे संदिग्ध असते की त्यामध्ये कथा, निबंध, आठवणी, चरित्र, रिपोर्ट या सर्वांची झलक कमी अधिक प्रमाणात पाहावयास मिळते.  लेखकाच्या मनातील भावना ज्यावेळी शब्दांद्वारे लिखित स्वरूपात कागदावर उतरतात, त्यावेळी साहित्याची निर्मिती होते.  काव्य, कथा, कादंबरी, नाटक इ. अनेक प्रकारांतून या भावनांचा आविष्कार होत असतो.  पण काही भावना अशा असतात की त्यांच्या प्रकटीकरणासाठी वरीलपैकी कोणताही प्रकार योग्य वाटत नाही.  निर्मितीच्या तंत्रामध्ये भावना अडकून पडतात.  त्यामुळे त्यांच्या आविष्कारात प्रामाणिकपणा येईलच असे सांगता येत नाही.  त्या आविष्कारात कृत्रिमता येण्याची शक्यता असते.  म्हणूनच कोणतेही संस्करणाचे ओझे न घेता जे आहे तसे लिहावे, अशा विचारसरणीचा जन्म झाला.  त्यातूनच मराठीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यकारांनी हा वाङ्‌मयप्रकार मोठ्या कौशल्याने हाताळला असल्यामुळे त्याला अल्पावधीतच प्रतिष्ठा प्राप्‍त झाली आहे.