नाट्याचार्य काकासाहेब खाडिलकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त लिहिलेल्या लेखात खाडिलकरांच्या नाट्यकलेची व स्वभाववैशिष्ट्यांची नोंद करताना यशवंतरावांनी म्हटले आहे, ''खाडिलकर हे ध्येयवादी होते. उदात्त गुणांचे त्यांना आकर्षण होते. काही जीवनमूल्यांवर त्यांची निष्ठा होती. एक प्रकारे त्यांच्या मनाची घडण आध्यात्मिक होती. त्यांच्या नाटकातील अनेक पात्रे या गुणांचे दर्शन घडवितात. तसेच खाडिलकरांच्या सगळ्या नाटकात कै. तात्यासाहेब केळकरांनी म्हटल्याप्रमाणे 'ओज हा गुण आहे, त्यांचे शृंगार आणि करुण रससुद्धा ओज गुणान्वित असतात व त्यामुळे त्या रसाभोवती एक प्रकारचे उदात्त वातावरण निर्माण होते.'' या नाटककाराने मराठी रंगभूमीचे सौंदर्य आणि सामर्थ्य वाढवले. तसेच खाडिलकरांकडे अचूक नाट्यदृष्टी होती. नाटकासाठी सुटसुटीत व पूर्वपरिचित अशी कथानके त्यांनी निवडली. त्यांची पौराणिक, ऐतिहासिक व कल्पनारम्य अशी नाटके आहेत. पौराणिक कथानके निवडण्यातही खाडिलकरांची दृष्टी ध्येयदर्शी होती. मानवजातीला उपकारक असे उदात्त आदर्श या कथांच्या द्वारे त्यांनी दिले. सहेतुकता किंवा जनजागृती हा त्यांच्या लेखनाचा अविभाज्य घटक आहे. विशिष्ट गुणावगुणांबद्दल प्रीती किंवा अप्रीती निर्माण करणे, राष्ट्रनिष्ठा व प्रियत्वांचे दिग्दर्शन यांचा परिणाम साधणे हा त्यांच्या लेखनाचा हेतू होता. असे त्यांच्या नाट्यसेवेचे समीक्षण यशवंतराव करतात.
'सोन्याचा सोहळा' कवी यशवंत (य.दि.पेंढारकर) यांच्याविषयी यशवंतराव लिहितात, ''कवी यशवंत आणि मी एका जिल्ह्यातले आहेत. हे तर त्यांचे माझे एक नाते आहेच. पण त्यांचे माझे दुसरे नाते म्हणजे त्यांचे व माझे नाव एक आहे. त्यांच्या व माझ्या नावातले हे साम्य, त्या काळी माझ्या अभिमानाचा एक विषय होता. मला आठवते त्यांच्या कवितांमध्ये मनाला नित्य ओढ लावणार्या अशा कितीतरी कविता होत्या. मला चांगला आवाज असता तर त्यातल्या काही मी आज म्हणूनही दाखविल्या असत्या. आईवर प्रेम न करणारा माणूस दुनियेमध्ये कुठे सापडेल ? पण कवी यशवंतांना आईची आठवण झाली आणि घराघरातली आई जागी झाली. देशभक्तीवरही त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत. त्या वेळच्या संसारातल्या बारीकसारीक दुःखांची त्यांनी आपल्या कवितेतून इतक्या नाजूकपणे मांडणी केली आहे की, जणू काही या माणसाला आपले मन कळले होते की काय, तो आपलेच दुखणे रस्त्यावर मांडतो आहे की काय, आपली कहाणी त्याला कोणी जाऊन सांगितली की काय, असे घराघरातल्या स्त्री पुरुषांना वाटावे. जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेली अनेक अतिसुरेख चित्रे त्यांच्या कवितांमध्ये आपणास पाहावयास मिळतात.'' यशवंतरावांचा या कवींशी प्रत्यक्ष संबंध आला आहे त्यामुळे या कवींच्या काव्यावर अकृत्रिम जिव्हाळ्याने ते लिहितात, बोलतात. यशवंतरावांचे हे चरित्रलेखन वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे उठून दिसते, कारण या लेखातील लेखन आकर्षण आणि हृदयंगम आहे. यशवंतरावांनी आपल्या चरित्रलेखांना वेगळे रूप दिले. ते आपल्या साहित्यिक, राजकीय किंवा अन्य मित्रांची कुळकथा सांगत नाहीत. जन्मतारखा अथवा तत्सम कंटाळवाणा तपशील ते कटाक्षाने टाळतात. त्यांच्या चरित्रलेखात भावनेचा ओलावा असतो. वर्ण्य विषयाची वैशिष्ट्ये रेखीव शब्दांत ते अचूकपणे टिपतात. या चरित्रलेखामधील ह्या व्यक्ती भेटल्या केव्हा, स्नेह वाढीस लागला कसा, प्रभाव आणि परिणाम काय झाला, संबंधित व्यक्तीच्या कार्याचे, विचारांचे मोल काय, तत्कालीन परिस्थिती कशी होती अशा अनेक गोष्टींची चर्चा ह्यामध्ये आहे. माणूस, त्या माणसाचे मन, त्याचे कार्य, त्याचा प्रभाव आणि स्वतःशी असलेला त्या त्या संबंधित व्यक्तीचा संदर्भ हा अनुबंध यशवंतराव आवर्जून रेखाटतात. या चरित्रलेखातून यशवंतराव अनंत दिलखुलास गोष्टी, किस्से, चुटके, आठवणी, तत्त्वसूत्र इत्यादींचा खजिना उघडा करताना दिसतात.
यशवंतरावांच्या चरित्रलेखातील नायक हे तुलनेने अधिक भारतीय व महाराष्ट्रीय आहेत. या चरित्रनायकावर प्रसंगपरत्वे केलेल्या चरित्रलेखनातून कर्तृत्वसंपन्न चरित्रनायकाबद्दल यशवंतरावांच्या मनातील प्रेमाचे, भक्तीचे, अभिमानाचे आणि आदराचे उमाळे खळबळून उचंबळले आहेत. या चरित्रनायकांच्या प्रचंड कार्याचे आणि देशाच्या इतिहासामधल्या अमर कामगिरीचे त्यांनी योग्य शब्दांत मूल्यमापन केले आहे. या चरित्रनायकांनी सामाजिक विचारांत आणि तत्त्वज्ञानात घातलेली मोलाची भर विशद करून सांगितले आहे. यशवंतरावांचे हे छोटेखानी चरित्रलेखन हे या महापुरुषांचे दर्शन घडविणारे आहे. प्रसंगानुरूप लेखन झालेली ही चरित्रे मोठ्या चरित्रलेखनाची सुरेख रंगीत तालीमच आहे. कारण ही चरित्रे महापुरुषांच्या जीवनाचे उत्कट, भव्य, विचारपरिलुप्त आणि उदात्त चित्र शब्दांकित करणारी आहेत. चरित्रांच्या चौकटीत काटेकोरपणे बसणारी नसली तरी रम्य आहेत.