तुलनेने इतर सामान्य कार्यकर्त्यांची व नेत्यांची अधिक माहिती येते. सातारा जिल्ह्यातील जुन्या सहकार्यांचा फक्त एखाद्या वाक्यातच जरुरीपुरताच उल्लेख केला आहे. अधिक लिहिण्याचे टाळले आहे. म्हणूनच त्यांना काटेकोरपणा व तटस्थपणा पाळता आला नाही, असे म्हणता येईल. या संदर्भात गंगाधर पानतावणे लिहितात, ''दूरच्या रत्नागिरीला गेल्यावर सावरकरांची भेट घेण्यासाठी त्यांची जी अनावर उत्सुकता दिसते, ती क्रांतिसिंह नाना पाटील किंवा ब्राह्मणेतर चळवळीतील नेत्यांविषयी दिसत नाही. ते मनाने राष्ट्रीय चळवळीशी बांधले गेले आणि पं. लक्ष्मणशास्त्री जोशी, काकासाहेब गाडगीळ यांच्यासारख्यांच्या देशभक्तिपर भाषणांनी अधिक प्रभावित झाले असे दिसून येते. एका अर्थी फुले की टिळक या संभ्रमातून त्यांची सुटका झाली असेच म्हणता येईल.'' पानतावणेसरांचा अभिप्राय अतिशय बोलका आहे. 'कृष्णाकाठ'मध्ये यशवंतरावांनी तरीही खर्या गोष्टी सरळ सहज पद्धतीने तपशीलवार सादर केल्या आहेत. याशिवाय त्यांच्या मनात ज्यांच्याविषयी मतभेद आहेत, दुराग्रह आहेत. ज्यांच्याविषयी स्वच्छ मत नाही अशा काही व्यक्तिचित्रणावर फारसे विवेचन येत नाही. उदा. क्रांतिसिंह नाना पाटील, वसंतदादा पाटील, जी. डी. लाड वगैरे समकालीन व्यक्तींवर लेखकाने अस्पष्ट भाष्य केले आहे.
'कृष्णाकाठ'मध्ये यशवंतरावांनी माणूस म्हणून स्वतःचे गुण दोष समतोलपणे चितारले आहेत. आपल्या जीवनाशी निगडित असलेल्या प्रसंगास अथवा एखाद्या दोषावर मात करण्यासाठी पदोपदी तटस्थपणाची, मूल्यदृष्टीची गरज असते. या कसोटीवर 'कृष्णाकाठ' पुरेपूर उतरले आहे. यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू आपणास येथे पाहावयास मिळतात. संस्कारक्षम कृतीतून जडणघडण, जिद्द चौकसपणा, धाडस, धडपड, वास्तवाचे भान, अपरिमित देशभक्ती, उपक्रमशीलता, माणुसकीचा ओलावा, संयमशीलता, ध्येयवाद, आपल्या वाणीने विरोधकांवर विजय मिळविण्याची कृती, समाजाचे गुणदोष ओळखायची कृती, साहित्य-कलाविषयी अभिरुची, निरपेक्ष मैत्री, दूरदर्शीपणा, चिंतनशीलता, प्रभावी वक्तृत्व, कुशाग्र बुद्धिमत्ता, महत्त्वाकांक्षा, मातृभक्ती, विकासाचा ध्यास, नीतिमूल्यावर श्रद्धा, गुणपूजकता, वाङ्मयप्रेम यासारखे अनेक व्यक्तित्वगुण आपणाला पाहावयास मिळतात. शिवाय रसिक यशवंतराव व माणूस यशवंतराव यांचा एकात्म साक्षात्कार होतो.
या आत्मचरित्रात बालपणापासून संस्कार, जडणघडण, वैचारिक आंदोलन, आदर्श व्यक्ती, कौटुंबिक जीवन, रसिकता यांसारख्या अनेक घटनांचा, प्रसंगांचा, विचारांचा नेमकेपणाने उल्लेख केलेला आहे. याचबरोबर राजकीय क्षेत्रात प्रवेश केल्यापासून अत्युच्च पदाला पोहोचेपर्यंत त्यांनी केलेली धडपड, प्रयत्न यांचे सुंदर चित्रण वाचकांस भुरळ घालणारे आहे. स्तिमित करून टाकणारे आहे. म्हणून एक वाङ्मयीन आत्मकथन म्हणून 'कृष्णाकाठ'ला मराठी साहित्यात महत्त्वाचे स्थान आहे.
'कृष्णाकाठ'मधून तत्कालीन रीतीरिवाज, त्या काळातील वाङ्मयीन अभिरुची, समाजव्यवस्था, सांस्कृतिक जीवन, महाराष्ट्र चळवळी, राजकीय इतिहास इत्यादींच्या विशेष नोंदी, उल्लेख आल्याने या आत्मचरित्रास ऐतिहासिक मूल्यही प्राप्त होते. तसेच भूतकाळातील घटना, प्रसंग त्यांनी शक्यतो कालक्रमानिष्ठ व चढत्या क्रमाने मांडले आहेत. आणि या सर्व मांडणीतून यशवंतरावांनी व्यक्तिविकास साधलेला आहे. त्याचबरोबर स्वानुभवातील नाट्य, त्यांनी केलेला मूल्यसंघर्ष, त्यांनी घेतलेला सत्याचा ध्यास, त्यांची भावनात्मक अवस्था, त्या त्या वेळची त्यांची वैचारिक मनःस्थिती, त्यांना लाभलेल्या यश-अपयशाच्या वेळची मनःस्थिती, संभाव्य ध्येये किंवा साध्य यांच्याविषयीची मनातील व्याकुळता, मधूनच मनात येणारे मोहाचे, स्वार्थाचे, आकर्षण या व यासारख्या कितीतर प्रसंगांची मांडणी त्यांनी अतिशय चैतन्यपूर्ण केली आहे. त्यामुळे 'कृष्णाकाठ'मधील घटना, प्रसंग, अनुभव आणि व्यक्ती जिवंत साकारल्या आहेत. 'कृष्णाकाठ'मधील यशवंतरावांची आत्मशोधकाची आणि जीवनसत्यशोधकाची वृत्ती आणि कलात्मकता येथे पूर्णपणे पणाला लागली आहे. या सर्व गुणसमृद्धतेमुळे 'कृष्णाकाठ'ला वाङ्मयीन मूल्यात्मकता प्राप्त झाली आहे, असेच म्हणावे लागेल.