यशवंतरावांचे बालपण त्यांच्या आजोळीच व्यतीत झाले. जवळजवळ एक शतकापूर्वीचा जिवंत इतिहास अभ्यासून डॉ. देशमुख यांनी यशवंतरावांवर देवराष्ट्राचे कसे संस्कार झाले, तिथल्या माणसांशी, शिक्षकांशी तसेच कौटुंबिक नात्यातील व्यक्तींशी त्यांचे अनुबंध कसे होते हे मांडले आहे. कौटुंबिक नात्यात त्यांच्या आईचा प्रभाव विशेष दिसतो. बालपणातील विठाबाई यांची शिस्त आणि प्रेम ही पुढील आयुष्यात कशी कामी आली हे 'कृष्णाकाठ' मध्ये यशवंतरावांनी सांगितलेलेच आहे. शालेय जीवनाप्रमाणेच महाविद्यालयीन जीवनाचा व त्यातील महत्त्वाच्या प्रसंगांचा वेध लेखकाने घेतला आहे. कविवर्य माधव ज्युलियन, प्रा. ना. सी. फडके यांसारखे साहित्यिक त्यांना प्रोफेसर म्हणून लाभले. सत्यशोधकी चळवळीचा व छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा त्यांनी जवळून अनुभव घेतला. हीच प्ररेणा पुढील आयुष्यात त्यांना दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरली. हे लेखकाने नमूद केले आहे. वाङ्मयातून माणूस घडतो हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. त्यांनी थोरामोठ्यांची चरित्रे वाचली. कथा कादंबर्या, नाटके यांचे अध्ययन केले. छत्रपती शिवाजी, म. गांधी यांचे आदर्श त्यांनी अंगी बाणले. लेखकाने त्यांच्या कौटुंबिक स्थितीगतीचा घेतलेला वेध अत्यंत वेधक आहे.
यशवंतरावांनी आत्मनिष्ठ, चरित्रपर, स्फुट, व्यक्तिचित्रात्मक, प्रवास वर्णन, पत्रात्मक असे विविध प्रकार हाताळले. त्या सर्वांचा वाङ्मय निकषावर परामर्श घेण्याचे काम डॉ. देशमुख यांनी केले आहे.
यशवंतरावांच्या जीवनावर, कार्यावर प्रकाश टाकणारी असंख्य पुस्तके आजवर प्रकाशित झाली आहेत, होत आहेत, यापुढेही होती. परंतु त्यांच्या वाङ्मयीन उत्तुंगतेचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी व त्यांच्या जडणघडणीचा त्यांच्या वाङ्मय निर्मितीशी पौर्वापर्य जुळवून एक सुंदर अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रसिद्ध करण्याचे श्रेय डॉ. देशमुखांना द्यावेच लागेल. डॉ. देखमुख यांनी सादर केलेला हा अभ्यास कौतुकास्पद नव्हे, तर अनुकरणीय व अनुसरणीय आहे. एवढे नमूद करून या ग्रंथाचे रसिक अभ्यासक स्वागतच करतील असा पूर्ण विश्वास वाटतो. या ग्रंथाला आदरणीय माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या शुभेच्छा लाभल्यामुळे तर ग्रंथाचे मोल शतपटीने वाढले आहे, हे निराळे सांगण्याची गरज नाही.
यशवंतराव चव्हाण हे स्वयंभू साहित्यिक होते. त्यांची वाङ्मयीन अभिरुची व रसिकता, बहुश्रुतता व अभ्यास यामुळे परिणत झाली होती. 'सह्याद्रीचे वारे', 'कृष्णाकाठ', 'युगांतर', 'ॠणानुबंध', 'शिवनेरीच्या नौबती' इ. वाङ्मयीन कृतीतून त्यांचे साहित्यिक म्हणून असलेले मोल लक्षात येते.
डॉ. शिवाजी देशमुख यांनी यशवंतरावांच्या वाङ्मयनिर्मितीचे केलेले मूल्यमापन अत्यंत विलक्षण आहे. यशवंतरावांचे साहित्य हे आपल्या काळाशी व कालखंडातील परिस्थितीशी नाते सांगणारे आहे. त्यांना सभोवतालचे असणारे वास्तवभान, कालभान अत्यंत महत्त्वाचे आहे.
यशवंतरावांचे लेखन रंजक असू शकत नाही. कारण वाङ्मय निर्मितीची त्यांची भूमिका व समज ही समाजसापेक्ष आहे. समाजाचे हित व समाजासहित असे त्यांचे साहित्य शब्दाचे प्रतिपादन आहे. ललित साहित्यांची निर्मिती सामाजिक बांधिलकीतून झाली पाहिजे व तिने सामाजिक आशयच प्रतिपादन केला पाहिजे अशी ठाम भूमिका ते घेतात.
यशवंतरावांची प्रखर जीवननिष्ठा त्यांच्या लेखनातून प्रकटते. त्याचा शोध लेखकाने बारकाव्यासह घेतला आहे.
डॉ. देशमुख, त्यांचे प्राचार्य डॉ. रमेश दापके, मुद्रक सदाशिव जंगम व मित्र मंडळ व सौ. कौसल्याताई देशमुख वहिनी यांचे मनःपूर्वक आभार...
माझी या क्षेत्रात फारशी योग्यता नसतानाही केवळ योगायोग म्हणून मिळालेल्या मार्गदर्शकास डॉ. देशमुख यांनी गुरुस्थानी मानले, यात त्यांचाच मोठेपणा अधिक आहे. त्यांच्या आग्रहास्तव हे दोन शब्द लिहिले.
पुनश्च धन्यवाद व शुभेच्छा....
डॉ. विद्यासागर पाटंगणकर
उपप्राचार्य, प्रपाठक व मराठी विभाग प्रमुख
बलभीम महाविद्यालय, बीड.