यशवंतरावांच्या जीवनावर राष्ट्रीय सभेचे व्यापक संस्कार झाले होते. त्यांना जातीयवाद मान्य नव्हता. 'मराठा' किंवा 'ब्राह्मणेतर' म्हणून त्यांनी कधीच समाजकारण केले नाही. दलितांबद्दल त्यांना सहानुभूती होती. त्यांचा मित्र श्री. उथळे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत त्या समाजाची दुःखे त्यांना समजली. महार समाजातील श्री. उथळे या मित्राचे मनोगत व्यक्त करताना ते लिहितात, ''आमच्या समाजाची दुःखे तुम्ही समजता त्याच्यापेक्षा वेगळी आहेत. महात्मा गांधी, डॉ. आंबेडकरांना का बरोबर घेत नाहीत ? ते जर त्यांनी केले तर ही गोष्ट बदलून जाईल.'' हे ऐकूण यशवंतराव हतबल झाले. त्यांना खिन्नता वाटली. सामाजिक प्रश्न किती अवघड असतात याची त्यांना जाणीव झाली. त्यावेळी खेरांना भेटण्यासाठी एक मोठा मोर्चा आलेला चव्हाणांनी पाहिला. जमिनीवतन म्हणून पिढ्यान् पिढ्या गावगाड्याचे काम महार समाजाकडून करून घेतले जाई. पुढे त्यांनी त्यांच्या काळात महारवतन बिल मंजूर केले, असे हे यशवंतरावांचे समाजकारण होते. सत्ता ही लोकांच्या कल्याणासाठी असते असे ते सांगत. ग्रामीण नेतृत्व पुढे यावे म्हणून जिल्हा बोर्डाचे रूपांतर पंचायत राज्यात केले. ग्रामीण नेतृत्व पुढे आले. ही एक सामाजिक क्रांतीच होती. यशवंतरावांच्या भाषणांमुळे लोकांना सामाजिक शिक्षण मिळाले. बहुजन समाजाला राष्ट्रीय दृष्टी मिळाली. त्यांनी म.फुले, छ.शाहू महाराज, कर्मवीर शिंदे यांचा विचारप्रवाह पुढे व्यापक केला. उन्नत केला. भर घातली. फुल्यांचा मानवतावादी आशय पुढे येण्यास वातावरण निर्माण केले. एकूणच त्यांच्या समाजकारणात उमदेपण, उदारपण व जातिभेदापलीकडची मानवतावादी दृष्टी दिसते.
'कृष्णाकाठ'मधील लेखनशैली
यशवंतराव चव्हाण हे केवळ राजकारणी नव्हते, तर थोर विचारवंत, तत्त्वचिंतक आणि जीवनाचे रसिक अभ्यासकही होते. त्यांच्या आत्मचरित्रात आणि इतरत्र विखुरलेल्या लेखनात राजकारण, धर्मभावना, समाजसुधारणा, साहित्य, कला, सहकार, विकासाच्या दिशा, तरुणांपुढील कार्याची दिशा, आर्थिक प्रश्न, विविध चळवळी यांसारख्या विषयांवर त्यांचे कितीतरी विचार व्यक्त झाले आहेत. 'कृष्णाकाठ' हे त्यांचे उत्कृष्ट आत्मचरित्र आहे. आपण जे जगलो, जसे जगलो ते इतरांना कळावे एवढाच त्यांचा साधा व प्रामाणिक हेतू आहे. त्यांच्या लेखनात जसा साधेपणा आहे तशी तटस्थ अलिप्त वृत्तीही आहे. ज्या कुटुंबात यशवंतराव वाढले त्या कुटुंबात सुरुवातीस फारसे वाङ्मयीन वातावरण दिसत नाही. तरीपण विविध प्रकारच्या पुस्तकांचे आणि मासिकांचे वाचन, थोरामोठ्यांचा सहवास व पुढे साहित्यिकांचे सानिध्य या गोष्टी यशवंतरावांची लेखनशैली घडवण्यात काही अंशी कारणीभूत असाव्यात.
'कृष्णाकाठ'मध्ये यशवंतराव बालपणाच्या आठवणीत बरेच रमलेले दिसतात. गरिबीत त्यांच्या मनाचे उन्मेष जसे फुलले तसे त्यांचे बालपणाविषयीचे लेखनही रंगले. तसेच पुढे सामाजिक कार्यातील व राजकारणातील कटू-गोड अनुभव त्यांनी गिळले. परिणामतः 'कृष्णाकाठ'मध्ये त्यांच्या जीवनाच्या पूर्वार्धाचे चित्र स्पष्ट होत गेले. विचारांचा समातोल, सहृदयता, अंतर्मुख वृत्ती, निर्भयता आणि स्पष्टवत्तेफ्पणा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गुणविशेषही त्यांच्या लेखनातून उमटले आहेत. साधी, सोपी, जिव्हाळ्याची भाषा यामुळे या आत्मचरित्रातील लेखनाची पद्धती सहज बोलावे तशी घडत गेली. त्यामुळे त्यात आपोआपच सहजता आणि स्वाभाविकता आली आहे. आई विठाबाई, पत्नी सौ. वेणूताई, रावसाहेब पटवर्धन, आचार्य भागवत, श्री. निकम, राघुअण्णा लिमये, मानवेंद्रनाथ रॉय, यतिंद्रनाथ दास, आत्मारामबापू, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. राम मनोहर लोहिया, आनंदराव चव्हाण, श्री. बाळासाहेब देसाई, के.डी. पाटील आदी कौटुंबिक, सामाजिक, राजकीय चळवळींतील व्यक्तींची चित्रे सहजसुलभ भाषेने नटलेली आहेत. त्यातही आई विठाई व सौ. वेणूताई यांच्या व्यक्तिरेखेला काही वेगळी झळाळी आहे. यशवंतरावांना जेव्हा पहिली अटक झाली तेव्हा त्यांना दहा बाय बाराच्या खोलीत पोलिस कस्टडीत ठेवले. तेथे त्या खोलीत अगोदरच कृष्णा धनगर हा कैदी होता. त्याचे व्यक्तिचित्रण लेखक असे करतात. ''त्याचे व्यक्तिमत्त्व फार आकर्षक होते. उणापुरा सहा फूट उंच, गोरा पान, नाक-डोळे अतिशय तरतरीत, हनुवटीवर अणकुचीदार दिसणारी बरीच वाढवलेली दाढी, हातापायात खळखळ वाजणार्या त्याच्या बेड्या. हे त्याचे रूप पाहून माझी तब्येत मोठी खूश झाली. माझ्या मनात उगीचच विचार येऊन गेला की, राजसंन्यास नाटकाच्या शेवटच्या प्रवेशात बंदी असलेल्या संभाजीचे चित्र असेच काहीसे असले पाहिजे.'' अशा काही मोजक्या शब्दांत व प्रसंगानी ते एखाद्या व्यक्तीचे यथार्थ चित्रण करतात.