• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शैलीकार यशवंतराव ६

यशवंतरावांचे लेखन जितके आशयगर्भ व लालित्यपूर्ण आहे, तितकीच लालित्यपूर्ण व भावस्पर्शी त्यांची भाषणेही आहेत.  त्यापैकी अनेक भाषणे लिखित स्वरूपात आज उपलब्ध आहेत.  'सह्याद्रीचे वारे', 'युगांतर', 'भूमिका' आदी ग्रंथात ती संग्रहित आहेत.  त्यांचा टवटवीतपणा आजही कायम आहे.  ती वाङ्‌मयमूल्येप्रचूर आहेत.  रंग, रूप, रस व गंध यांनी ती अलंकृत आहेत.  खरे तर भाषण हा देखील स्वतंत्र असा एक वाङ्‌मयप्रकारच आहे.  त्याला तशी मान्यता मिळायला हवी.  यशवंतरावांच्या भाषणांमध्ये सौंदर्याचा प्रचूर प्रमाणात आविष्कार झालेला आढळतो.  त्यातले शब्दसौष्ठव लक्षवेधक आहे.  त्यातली रसवत्ता प्रत्ययकारी आहे.  त्यातली रंगछटा आजही विरलेली नाही.  ललित निबंधांचे स्वरूप त्यांना प्राप्‍त झालेले आहे.  ज्या ज्या वेळेस त्यांनी ती केली त्या त्या वेळेस त्यांनी श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला.  आजही ती वाचीत असताना वाचकांच्या मनाचा ठाव ती घेतात.  शब्दसामर्थ्यातून वक्तृत्व सिद्ध होते.  Rhetoric means words in action. यशवंतरावांच्या लेखनात अभिनिवेश नाही.  भावस्पर्शी उत्कटता मात्र त्यात आहे.  त्यांच्या भाषणातही अभिनिवेश नाही.  त्यात आशयगर्भ उत्कंठा मात्र आहे.  या हृदयाने त्या हृदयांशी केलेला तो अर्थपूर्ण संवाद आहे.  अशी भाषणे म्हणजे साहित्यच.  रससिद्धान्तातल्या निकषांवर ती उतरतात.  

यशवंतराव चव्हाणांची भाषणे जेवढी विचारप्रधान आहेत तेवढीच ती भावस्पर्शीही आहेत.  यशवंतराव हे रसिकाग्रणी होते.  त्यांचा पिंडच मुळात एका अभिजात साहित्यिकाचा होता.  मोहळातून मधाचे थेंब ठिबकावेत असे त्यांचे वक्तृत्व होते.  तो अनुभव मी घेतला आहे.  साहित्याच्या निकषांवर त्यांच्या भाषणांची समीक्षा केली पाहिजे.  'अभ्यासें प्रगट व्हावे' असा हितोपदेश समर्थ रामदासांनी केला आहे.  भाषण हे अशा प्रगटीकरणाचे माध्यम असते.  यशवंतरावांनी त्यांचा प्रभावीपणे वापर केला आहे.

पत्रलेखन हा देखील एक साहित्य प्रकारच !  यशवंतरावजींच्या पत्रलेखनाची त्यादृष्टीने समीक्षा करावी.  त्यांनी वेणुताईंना लिहिलेली पत्रे वाङ्‌मयीन मूल्यांनी परिपूर्ण आहेत.  'विदेश-दर्शन' हा त्या पत्रांचा संग्रह आहे.  देशाटन, पंडित मैत्री आणि भेत संचार या तीनही गोष्टींचा लाभ यशवंतरावांना झाला होता.  'नित्य नूतन हिंडावे । उदंड देशाटन करावे ।' समर्थांचा हाही हितोपदेश त्यांनी पाळला. 
'विदेश-दर्शन' हा प्रवासवर्णनात मोडणारा पत्र-संग्रह आहे.  देशाचे संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री व विदेशमंत्री या नात्यांनी यशवंतरावांना अनेक देशांचा प्रवास करावा लागला.  त्या त्या देशातील साहित्य, संस्कृती, लोकजीवन, राजकारण, निसर्ग, नाट्यकला आदी गोष्टी त्यांच्या अवलोकनात आल्या.  विविध देशातील शहरांमध्ये त्यांनी वास्तव्य केले.  शहरे ही संस्कृतीची केंद्रे असतात.  त्यातील वस्तुसंग्रहालये त्यांनी पाहिली.  ग्रंथालयांना भेटी दिल्या.  उत्तमोत्तम ग्रंथांची खरेदी केली.  त्या त्या देशातील इतिहासाचा मागोवा घेतला.  नाटके पाहिली.  राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या.  या सर्व गोष्टी वेणुताईंना लिहिलेल्या या पत्रांत आहेत.  ते बहुश्रुत, प्रज्ञावंत मुत्सद्दी होते.  रसिकमनाने त्यांनी अनुभव टिपले.  त्या अनुभवाचे प्रगटीकरण या पत्रांमध्ये आहे.  पती-पत्‍नीतले नाते हे अतिशय नाजूक !  त्याचा सुगंध या पत्रांना लाभला आहे.  

यशवंतराव चव्हाणांना मराठी भाषा व मराठी साहित्याचा खूप अभिमान होता.  माय मराठीनेच त्यांना एका संवेदनशील साहित्यिकाची अस्मिता दिली.  ती अस्मिता त्यांनी आपल्या शब्दांतून फुलवली.

'शैलीकार यशवंतराव' हे डॉ. शिवाजीराव देशमुख यांचे पुस्तक साहित्यिक यशवंतराव चव्हाण समजून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.  खरे तर हा ग्रंथ मुळातच त्यांच्या पीएच.डी. च्या संशोधन प्रबंधावर आधारलेला आहे.  तो सिद्ध करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले आहेत.  मराठी साहित्याच्या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना, प्राध्यापकांना, संशोधकांना आणि सर्वसामान्य वाचकांना हा ग्रंथ निश्चितच उपयोगी पडेल यात कसलीच शंका नाही.  डॉ. देशमुख अभिनंदनास पात्र आहेत.

मा. खा. डॉ. जनार्दन वाघमारे
माजी कुलगुरू स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड

लातूर, दि. २७ मार्च २००९