• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शैलीकार यशवंतराव ३१

लोकमान्य टिळक हायस्कूलमध्ये शिकत असताना लो. टिळकांचे चरित्र आणि विचार समजून घेण्यासाठी यशवंतरावांना पुस्तके वाचावीच लागत.  त्या हायस्कूलमध्ये दरवर्षी लो. टिळकांच्या जीवन आणि कार्यावर निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जात.  तेथील शिक्षक, मुख्याध्यापक राष्ट्रीय वृत्तीचे असल्यामुळे त्यांच्यात देशातील राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीसंबंधी चर्चा चालत असे.  तसेच त्यावेळी कराडमधील व्यापारी लाड यांच्या दुकानात 'विविध वृत्त व ज्ञानप्रकाश' यांसारखी वर्तमानपत्रे येत असत.  त्यामध्ये देशात घडत असलेल्या घटनांविषयी विस्ताराने माहिती मिळे.  त्यामुळे यशवंतरावांचा कल गंभीर वाचनाकडे वळला.  केळकरांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र तसेच शि. म. परांजपे यांचे 'काळ' मधील निबंध त्यांनी वाचून काढले.  एकाच वेळी चार पाच प्रकारच्या पुस्तकांचे ते वाचन करत.  ते म्हणतात, ''गंभीर, विचारप्रधान ग्रंथ, चरित्र वा आत्मचरित्रे, कथा-कवितासंग्रह आणि कादंबरी अशी या प्रवाहाची वाटणी प्रसंगानुसार असते.  गंभीर, विचारप्रधान ग्रंथात माझे आवडीचे विषय राजकारण आणि इतिहास हे आहेत.  चरित्रे व आत्मचरित्रे मी वाचतो.  अर्थात चरित्रनायक कोण आहे, याच्यावर निवड निश्चित अवलंबून असते.''  यशवंतरावांनी अगदी अलीकडच्या काळातील प्रकाशित झालेली आत्मचरित्रे वाचलेली दिसतात.  हंसा वाडकर, आनंदीबाई शिर्के, स्नेहप्रभा प्रधान, आनंदीबाई विजापुरे, आनंद साधले, गजानन जागिरदार इ काही उदाहरणे सांगता येतील.  पंडित जवाहरलाल नेहरूंचे आत्मचरित्र प्रकाशित होताच पाच-सहा मित्रांनी एकत्र येऊन वाचल्याचे ते सांगतात.  काकासाहेब गाडगीळांचे पथिक, आचार्य अत्रेंचे 'कर्‍हेचे पाणी', 'मी कसा झालो', ना. सी. फडके यांचे 'माझ्या साहित्य सेवेतील स्मृती' इ. आत्मचरित्रे वाचून त्यावर त्यांनी आपले अभिप्राय तर नोंदवलेच शिवाय आत्मचरित्र या वाङ्‌मयप्रकाराबद्दल आपल्या विचारांच्या काही नोंदीही केल्या आहेत.

साहित्याचे बाळकडू घेऊनच ते साहित्यक्षेत्रात आले.  फुल्यांच्या चरित्रापासून त्यांनी वाचनाला सुरूवात केली.  त्यांनी कवी गोविंद आणि कवी गोविंदाग्रजांच्या कविता वाचल्या.  गडकर्‍यांची नाटके वाचून ते भारावून जात.  'राजसंन्यास' या त्यांच्या नाटकातील काही संवाद त्यांना तोंडपाठ होते.  तुरुंगात असताना आचार्य भागवतांशी त्यांचा परिचय झाला.  गांधीवादी आचार्यांनी त्यांना कालिदास तर सांगितलाच पण सावरकरांचे राजकारण, त्यांच्या कविताही सांगितल्या.  सावरकरांचे 'कमला' व 'गोमान्तक' ही काव्ये वाचावयास सांगितली.  या वाचनाचा त्यांच्या मनावर परिणाम झाला.  त्यांचे मन संवेदनशील होते.  त्यामुळे वाचलेल्या साहित्यातील विचार ते लगेच आत्मसात करत असत.  यामधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार येत होता.  वाचनामध्ये आवडनिवड होत होती.  चांगले वाईट कळत होते.  फडके, खांडेकर, माडखोलकर यांच्या समकालीन काळात यशवंतरावांचे विद्यार्थिजीवन असल्याने साहित्य वाचनाचा छंदच त्यांना लागला.  या काळात मध्यमवर्गीयांचे चित्रण करणार्‍या अनेक कादंबर्‍या त्यांनी वाचल्या.  माडखोलकरांच्या कादंबरीने या काळात राजकीय कादंबरीला सुरुवात झालेली होती.  खांडेकरांची 'दोन ध्रुव' ही कादंबरी त्यांनी कोल्हापूरच्या भुसारी वाड्यात कशी वाचून काढली हे त्यांच्या शेवटपर्यंत स्मरणात होते.  महाविद्यालयीन जीवनामध्ये अभ्यासविषयक पुस्तकांपेक्षा इतर अधिक सखोल वाचन करण्याचा प्रयत्‍न केला.  मूलतः असलेली वाचनाची हौस अधिकच वाढली.  अभ्यासक्रमाने त्यांच्या वाचनाला शिस्त लावली.  विचारांची शुद्धता राखण्याची कला ते शिकले.  अभ्यासवाचन, सदैव ग्रंथ सहवास, आत्मविश्वास, आटोकाट प्रयत्‍न या त्यांच्या अंगभूत गुणांमुळेच पुढे त्यांनी नेत्याची भूमिका वठवली व त्यांचे कर्तृत्व फुलत गेले.

राजकारणाच्या रामरगाड्यात सारे आयुष्य वेचूनही यशवंतराव सुसंस्कृत, समंजस आणि अभ्यासकांचे सन्मित्र राहिले.  याचे सारे श्रेय त्यांच्या पुस्तक प्रेमाला द्यायला पाहिजे.  साहित्यावर त्यांचे मनापासून प्रेम होते.  भेटवस्तू म्हणून कोणी पुस्तक दिले तर त्यांना आवडायचे.  कुठलेही दैनिक, साप्ताहिक, नियतकालिक त्यांच्याकडे आले की त्यातील पुस्तक परीक्षणाचे सदर ते आवर्जून वाचत असत.  बहुचर्चित मराठी, इंग्रजी पुस्तके ते दरमहा आणून घेत.  त्यांच्या कागदपत्रांच्या बॅगेत नेहमी दोन-तीन पुस्तके असत.  प्रवासात ते भरपूर वाचायचे.  दिवसभर वाचन झाले नाही तर रात्री १२ नंतर वाचीत बसायचे.  यशवंतरावांच्या या वाचन छंदाबद्दल प्रसिद्ध समाजवादी कार्यकर्ते नानासाहेब गोरे लिहितात, ''यशवंतरावजी चव्हाणांना साहित्याची मनापासून आवड होती.  राजकारणाच्या घिसाडघाईत त्यांना फुरसत मिळाली असती तर त्यांनी भरपूर वैचारिक व ललितलेखन केले असते.  त्यांचा ग्रंथसंग्रह फार मोठा होता.  ते भरपूर वाचन करीत व वाचलेले विचार रवंथ करून आपली धोरणे ठरवीत.  त्यात दिखाऊपणाचा लवलेशही नव्हता.  कादंबरी असो, काव्य असो, इतर कोणतेही साहित्य असो त्यात ते अभ्यासपूर्वक रस घेत.''