• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शैलीकार यशवंतराव ३

यशवंतराव चव्हाणांचा पिंडच मुळात एका दर्दी साहित्यिकाचा होता.  अमृताशी पैज लावू शकेल असे त्यांचे साहित्य आहे.  प्रकाश आणि माधुर्य यांचा सुरेख संगम त्यांच्या साहित्यात आढळतो.  सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वात प्रकाश व माधुर्याचे मीलन असते.  यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व सुसंस्कृत होते.  त्या व्यक्तिमत्त्वाला मोगर्‍याची उपमा देत येईल.  त्यांच्या शब्दाशब्दातून तो उमलला, फुलला व दरवळला आहे.

यशवंतरावांना शब्दांचा लळा लहानपणापासूनच लागलेला होता.  आई विठाईच्या जात्यावरील ओव्यांनी त्यांना शब्दसृष्टीत नकळत ओढले.  आई विठाई ही त्यांची गीताईच होती.  तिचे बोट धरून ते आयुष्याच्या वाटेवर चालत राहिले.  शाळेत असतानाच त्यांना वाचनाचा व लेखनाचा छंद जडला.  त्यांनी तो आयुष्यभर जपला.  शब्दांनी त्यांना साथ दिली आणि सामर्थ्यही दिले.

यशवंतराव चव्हाणांनी कथा-कविता-कादंबर्‍या लिहिल्या नाहीत.  ललित साहित्याची निर्मिती त्यांनी केली नाही.  त्यांच्या हातून निर्माण झाले ते वैचारिक साहित्य.  त्यांच्या हातून जो काही शब्दप्रपंच झाला तो वैचारिक व समीक्षात्मक स्वरूपाचा आहे.  त्यांची साहित्यसमक्षा ही 'आस्वादक समीक्षा' या सदराखाल मोडते.  कलाकृतीच्या आकलनाशिवाय तिचा आस्वाद घेता येत नाही.  समीक्षालेखन हे साहित्याचे रसग्रहण असते.  समीक्षकाच्या अंगी गुणग्राहकता असल्याशिवाय साहित्यकृतीचा आस्वाद कसा घेता येईल ?  साहित्याची रसवत्ता हीच त्याला वाङ्‌मयीन गुणवत्ता व अधिसत्ता प्राप्‍त करून देते.  त्याचेच रसग्रहण आस्वादक समीक्षक करीत असतो.  यशवंतरावांची वाङ्‌मयीन अभिरूची अभिजात स्वरूपाची होती.  साहित्यातले कांचनकण टिपण्याची सवय त्यांच्या डोळ्यांना लागली होती.  ललित साहित्याचे ते दर्दी वाचक होते.  साहित्य सोनियाच्या खनी त्यांनी आयुष्यभर धुंडाळल्या.

संवेदनशील वाचक हा लेखकाशी व त्याच्या कलाकृतीशी संवाद साधतो, तादाम्य पावतो.  लेखकाच्या वेव्हलेंथशी वाचकाची वेव्हलेंथ जुळली तरच त्याच्या कलाकृतीशी तो एकरूप होऊ शकतो.  वैचारिक तसेच भावनिक पातळीवर वाचकाला लेखकाशी समरस होता आले तरच त्याच्या कलाकृतीचा आस्वाद घेता येतो.  अभिरूचीसंपन्न वाचक हा साहित्य समीक्षक असतो.  

साहित्याने यशवंतराव चव्हाणांच्या व्यक्तिमत्त्वाची श्रीमंती वाढविली होती.  सर्वच साहित्य प्रकारातील उत्तमोत्तम ग्रंथ त्यांनी वाचले होते.  काही पुस्तके केवळ चवीसाठी असतात.  काही पुस्तके वैचारिक व भावनिक पोषणासाठी असतात.  माणसाचे वैचारिक व भावनिक जीवन परिपुष्ठ होते ते अशा ग्रंथावर.  अशा पौष्टिक ग्रंथांच्या संगतीत यशवंतरावांनी आपल्या कामाचा व्याप सांभाळून आपले आयुष्य घालविले.  इतिहासाचे त्यांना ज्ञान व भान होते.  ते नाटकवेडे होते.  काव्याचा आस्वाद त्यांनी घेतला.  चरित्रे व आत्मचरित्रे त्यांनी आस्थेने वाचली.  विविध क्षेत्रांतील व्यक्तींची चरित्रे व आत्मचरित्रे त्यांनी त्यांच्या अंतरंगात शिरून वाचली.  चरित्रांना व आत्मचरित्रांना इतिहासाचे मोल प्राप्‍त झालेले असते.  माणसाचे आकलन झाले की त्याच्या समाजाचे व संस्कृतीचे आकलन होते.  त्याच्या व्यक्तीमत्त्वाची जडणघडण कशी झाली ते लक्षात येते.  यशवंतरावांनी चरित्रवाङ्‌मय अतिशय आस्थेने वाचले.  स्वतः त्यांनी अनेक व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वावर जिव्हाळ्याने लिहिले देखील.  म. गांधी, लो. टिळक, पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, नाना पाटील, लालबहादूर शास्त्री, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन इ. महापुरुषांवर त्यांनी लिहिले.  भाऊसाहेब वर्तक, उद्धवराव पाटील, भाऊसाहेब बांदोडकर, एस. एम. जोशी, काकासाहेब गाडगीळ अशा राजकारणी मंडळींवर त्यांनी लिहिले.  वसंतराव नाईक, किसन वीर, यशवंतराव मोहिते, मधुकरराव चौधरी, वसंतदादा पाटील अशा सहकार्‍यांवर त्यांनी लिहिले.  तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, न. चि. केळकर, नाट्याचार्य काकासाहेब खाडिलकर, वि. स. खांडेकर, ह. न. जोशी. ग. दि. माडगुळकर, ग. त्र्यं. माडखोलकर. कवी यशवंत,  वा. सी. बेंद्रे अशा लेखक विचारवंतांवर त्यांनी लिहिले.  कर्मवीर भाऊराव पाटील. राजर्षी शाहू महाराज, म. विठ्ठल रामजी शिंदे, तुळशीदास जाधव, शंतनुराव किर्लोस्कर, धनंजयराव गाडगीळ अशा व्यक्तिमत्त्वांचाही त्यांनी वेध घेतला.