• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शैलीकार यशवंतराव १८

यशवंतरावांचे चरित्रात्मक लेख आकाराने छोटे आहेत, पण त्यात अनेक गुण दडलेले आहेत.  या चरित्रांमधून त्यांच्या बुद्धीची असामान्य साहित्यिक चमक प्रत्ययास येते.  त्यांच्या भाषणात हे चरित्र लेखन ओघानेच येते.  त्या त्या व्यक्तीचे समग्र जीवन दर्शन घडवावे असे त्याचे स्वरूप नसून त्या व्यक्तीसंबंधीची माहिती आणि आठवणींचा उल्लेख करून त्या व्यक्तीच्या जीवनाचे अधोरेखन केले आहे.  एक-दोन मार्मिक वाक्यातून ते त्या व्यक्तीच्या गुणवैशिष्ट्यावर प्रकाश टाकतात.  त्यासाठी त्यांना वाक्यांचा आणि शब्दांचा डोलारा उभा करावा लागत नाही.  नेमक्या शब्दात एखाद्या व्यक्तीतील गुण हेरून ते सांगण्याची कला त्यांच्याकडे होती.  चरित्रात्मक लेखनातून त्यांनी विविध व्यक्तींचा त्यांच्या वैचारिक वैशिष्ट्यांसह मागोवा घेतला आहे.  उदा. छ. शिवाजी महाराज, छ. शाहू महाराज, लो. टिळक, रविंद्रनाथ टागोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, कृ. प्र. खाडिलकर, वि. स. खांडेकर, ग. त्र्यं. माडखोलकर, ग. दि. माडगूळकर आदींचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे.  चरित्र लेखनातून घटना प्रसंगांच्या सहाय्याने मोजक्या शब्दांच्या चरित्रामधील मानव्याचा शोध घेतला आहे.

यशवंतरावांनी आपल्या साहित्यात स्थलवर्णन, प्रसंगवर्णन, व्यक्तिचित्रण व चरित्रलेख यांचा समावेश केला आहे.  आई विठाबाई, आचार्य भागवत, कुलसुमदादी, कृष्णा धनगर, आत्माराम पाटील यांसारख्या अनेक उठावदार व्यक्तिचित्रांचा त्यात समावेश आहे.  त्यांच्या संपर्कात आलेल्या विविध व्यक्तींचे मनोज्ञ दर्शन त्यांनी घडविले आहे.  या सर्व व्यक्ती वास्तवातील असून त्यांचे शब्द, रूप, आविष्कार म्हणजेच यशवंतरावांची व्यक्तीचित्रे होय.  यशवंतरावांनी केलेल्या व्यक्तिचित्रणामध्ये लहानथोर असा भेदभाव नाही.  केवळ श्रेष्ठ व्यक्ती प्रमाण मानून त्यांनी त्यांची व्यक्तीचित्रे रेखाटली नाहीत.  तर सामान्य व्यक्तींचाही त्यात समावेश होतो.  व्यक्तिचित्रणामध्ये त्या व्यक्तींचे रागलोभ, स्वभाव इ. सह अनेक कंगोरे सूक्ष्मनिरीक्षणाने चित्रित केले आहेत.  

यशवंतरावांनी साहित्याच्या अनेक अंगांना आपल्या लेखणीने स्पर्श केला आहे.  त्याचप्रमाणे प्रवासवर्णन हे क्षेत्रही सुटलेले नाही.  'प्रवासवर्णन' या वाङ्‌मयप्रकाराची तत्वचिंतनात्मक बाजू वाढवून आपल्या प्रगल्भ व्यक्तिमत्वाचा आविष्कार त्यांनी जागोजागी केला आहे.  तसेच 'केल्याने देशाटन', 'शांतिचितेचे भस्म' या प्रवासवर्णनात्मक लेखातून त्यांचे जीवनचिंतन प्रकटते.  प्रवासवर्णनात्मक लेखामधून प्रदेश आणि प्रवृत्ती यांचा समन्वय साधून त्यांनी केलेले लेखन मोलाचे वाटते.  प्रवासवर्णनात त्यांची रसिकता, चिंतनशीलता दिसते.  'विदेशवर्णन' मधील त्यांचे लेखन पत्ररूपाच्या चौकटीमध्ये अधिक बसणारे आहे.  प्रवासवर्णनामध्ये राजकीय आशयाचे रंग भरण्याचा व साहित्यिक दृष्टीने प्रवासवर्णन लिहिण्याचा यशवंतरावांचा प्रयत्‍न लक्षणीय असाच आहे.  प्रवासवर्णनात राजकीय वृत्तात्‍नांचा ऊहापोह करणारी आणि आपल्या प्रवासवृत्ताला पत्ररूपाने उजळ करणारी त्यांची भाषाशैली त्यांचे वेगळेपण दर्शवून जाते.

यशवंतरावांच्या समग्र साहित्याचा अभ्यास करताना त्यांच्या पत्रात्मक लेखनाचा विचारही प्रस्तुत पुस्तकामध्ये केला आहे.  त्यांच्या पत्रांना साहित्यसृष्टीत व जनमानसात विशेष असे महत्त्व आहे.  त्यांच्या पत्रलेखनातून नितळ विचार, उत्कृष्ट पण विवेक नियंत्रित भावना, अंतःकरणातील जिव्हाळा, पुरोगामी विचारसरणी, त्यांचे निर्व्याज व निरागस मन, सौंदर्यदृष्टी, तत्कालीन राजकारणाबद्दलचे अल्पशब्दातील मत, एखाद्या हिडीस गोष्टीबद्दलची त्यांना वाटणारी चीड याचे प्रतिबिंब त्यांच्या पत्रलेखनात पाहावयास मिळते.  तसेच अंतरंगातील भावनांचाही प्रत्यय येतो.  त्यांनी खाजगी पत्रातून अनेक वाङ्‌मयीन चर्चा व मतमतांतरे व्यक्त केली आहेत.  यशवंतरावांसारखा एखादा रसिक वाचक जेव्हा एखाद्या प्रथितयश लेखकास वाङ्‌मयीन मते पत्राद्वारे कळवतो तेव्हा त्या पत्रांना वाङ्‌मयीन महत्त्व आपोआप प्राप्‍त होते.

यशवंतरावांचा पिंड ललित लेखकाचा होता.  त्यामुळे त्यांनी केलेले गद्यात्मक वैचारिक लेखन लालित्याचा धर्म घेऊन येते.  त्यांच्या वैचारिक गद्यलेखनात त्यांच्या सकस आणि संपन्न विचारांचे दर्शन घडते.  या वैचारिक लेखनामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विचारांचा समावेश होतो.  या लेखनाचे स्वरूप प्रामुख्याने गंभीर, वैचारिक आणि चिंतनपर असल्यामुळे त्यांच्या वैशिष्ट्यांचा स्वतंत्रपणे विचार करावा लागेल.  यशवंतरावांच्या वाङ्‌मयात एवढी विविधता आहे की कधी कधी हे वाङ्‌मयप्रकार परस्परात कधी मिसळून गेले हे कळत नाही.